दिन-विशेष-लेख-जागतिक हवामान दिन

Started by Atul Kaviraje, March 23, 2023, 09:54:30 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                   "दिन-विशेष-लेख"
                                "जागतिक हवामान दिन"
                               ----------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-२३.०३.२०२३-गुरुवार आहे, मार्च २३ हा दिवस "जागतिक हवामान दिन" म्हणूनही ओळखला जातो. वाचूया, तर या दिवसाचे महत्त्व, आजच्या या "दिन-विशेष-लेख" या शीर्षकI-अंतर्गत. .

प्रश्न – जागतिक हवामान दिन कधी साजरा केला जातो?
उत्तर – २३ मार्च.

पृथ्वीवर दरवर्षी हवामान सातत्याने बदलत असल्याने सजीवसृष्टी अस्तित्वात आहे. ऊन, पाऊस आणि थंडी अशा प्रत्येक प्रकारचे हवामान तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी आवश्यक आहे. त्यामुळे हवामानाचे महत्त्व कळून येण्यासाठी जागतिक हवामान दिन (World Meteorological Day) साजरा करण्यात येतो.

                     जागतिक हवामान दिन माहिती –

             हवामान दिनाचे महत्त्व –

• प्रत्येक देशात होणारे नैसर्गिक बदल हे जागतिक हवामान बदलाला कारणीभूत असल्याने जागतिक व राष्ट्रीय पातळीवर हवामान बदलाच्या नोंदी ठेवणे गरजेचे वाटू लागले.

• हवामान बदलाच्या सर्व नोंदी ठेवण्यासाठी व नैसर्गिक घडामोडी नियंत्रित करण्यासाठी १९५० साली जागतिक हवामान संघटना स्थापन झाली. सुरुवातीला भारत आणि अन्य देश असे मिळून एकूण ३१ देशांनी ही संघटना स्थापन होण्यासाठी पुढाकार घेतला होता.

• हवामानातील बिघाडामुळे मानवी जीवन आणि इतर साधनसंपत्ती कशी काय संपुष्टात येते आणि नियमित हवामानातील बदलामुळे मानवी जीवन कसे काय सुरक्षित राहू शकते या दोन्ही शक्यतांविषयी माहिती सर्वांना व्हावी तसेच हवामानाचे महत्त्व जागतिक स्तरावर सर्वांना कळून येण्यासाठी २३ मार्च हा दिवस "जागतिक हवामान दिन" म्हणून साजरा केला जातो.

• २३ मार्च १९५० रोजी जागतिक हवामान संघटनेची स्थापना झाल्याने २३ मार्च या दिवशीच जागतिक हवामान दिन साजरा केला जातो. हवामानविषयक जनजागृती होण्यासाठी हा हवामान दिन अत्यंत महत्त्वपूर्ण आहे.

                जागतिक हवामान दिन कसा साजरा केला जातो?--

• प्रत्येक देशाच्या हवामान खात्यातर्फे आणि जागतिक स्तरावर हवामान संस्थेतर्फे २३ मार्च हा दिवस अत्यंत उत्साहात साजरा करण्यात येतो. त्यानिमित्ताने हवामान दिनाचे शुभेच्छा संदेश सर्व देशांतील लोक एकमेकांना पाठवतात.

• भविष्यात होणारे आणि सध्या होत असलेले हवामानातील बदल याबद्दल जनजागृती केली जाते. त्यासाठी प्रसारमाध्यमे, सोशल मीडिया यांचा वापर केला जातो. विविध प्रकारचे होर्डिंग्ज, ऑनलाईन व्हिडिओज आणि फोटोज् यांमार्फत लोकांना हवामानाचे महत्त्व पटवून दिले जाते.

• हवामान अंदाज देणे हे होणारे नुकसान टाळण्यासाठी अत्यंत आवश्यक ठरते त्यासाठी हवामान खात्याचे काम हे अत्यंत महत्त्वपूर्ण मानले जाते. त्यामुळे या दिवसाची नोंद जगभरातून सर्व राष्ट्रीय व राजकीय स्तरावर घेतली जाते.

                 हवामान बदलाविषयीची जागरूकता –

• जेवढा औद्योगिक आणि तंत्रज्ञान विकास झालेला आहे तेवढेच निसर्गावर मानवाने आक्रमण केलेले आहे. त्याचा परिणाम म्हणून आपल्याला हवामानातील अनेक बदल आणि अनियमितता पाहायला मिळते. त्यामुळे अतिवृष्टी, पूर, भूकंप, दुष्काळ, त्सुनामी, तापमानवाढ अशा अनेक नैसर्गिक आपत्तींचा सामना मानवाला करायला लागतो.

• मानवाने अत्यंत जागरूकतेने मानवी विकासासाठी पाऊले उचलली नाहीत तर आपल्याला त्याची भारी किंमत चुकवावी लागेल. त्यामुळे हवामानविषयक जनजागृती अत्यंत आवश्यक बाब आहे. प्रत्येकाने याबाबतीत विचार करणे गरजेचे ठरेल.

• हवामान बदल झाल्याने अनेक प्रकारचे सजीव लोप पावत आहेत. जीवित व वित्तहानी होत आहे. तसेच नैसर्गिक व मानवी साधन संपत्ती नष्ट होत आहे. त्यामुळे जीवनाची एक योग्य दिशा ठरवून फक्त आर्थिक विकास न पाहता निसर्गाचे होणारे नुकसान देखील पाहिले पाहिजे.

• वरील सर्व पर्यावरणीय मुद्द्यांचा गांभीर्याने विचार होणे गरजेचे आहे. वैयक्तिक, सामाजिक आणि राष्ट्रीय पातळीवर स्वच्छ हवामान व हवामानाची नियमितता याबाबतीत अंमलबजावणी होणे अपेक्षित आहे. अशा सर्व बाबी आपण जागतिक हवामान दिनानिमित्त जाणून घ्यायला हव्यात.

     जागतिक हवामान दिन (Jagatik Havaman Din Mahiti Marathi) हा संपूर्ण लेख वाचण्यासाठी आपला बहुमूल्य वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद!

--मराठी ब्लॉगर
(March 23, 2022)
--------------------

                    (साभार आणि सौजन्य-संदर्भ-महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
                   --------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-23.03.2023-गुरुवार.
=========================================