दिन-विशेष-लेख-जागतिक क्षयरोग निवारण दिन

Started by Atul Kaviraje, March 24, 2023, 10:14:48 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje


                                    "दिन-विशेष-लेख"
                              "जागतिक क्षयरोग निवारण दिन"
                             -----------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-२४.०३.२०२३-शुक्रवार आहे, मार्च २४ हा दिवस "जागतिक क्षयरोग निवारण दिन" म्हणूनही ओळखला जातो. वाचूया, तर या दिवसाचे महत्त्व, आजच्या या "दिन-विशेष-लेख" या शीर्षकI-अंतर्गत.

                   जागतिक क्षयरोग दिन--

     क्षयरोग हा एक जिवाणूजन्य आजार आहे. क्षयरोग हा पूर्ण बरा होणारा आजार आहे. एके काळी हा रोग दुर्धर समजला जाई. सामान्यतः या आजाराला टीबी (ट्युुबरक्युलॉसिस) म्हणून ओळखले जाते. हा आजार 'मायकोबॅक्टेरिया' या प्रकारच्या जिवाणूंमुळे होत असतो. त्यातील मुख्यत्वे 'मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलॉसिस' या प्रकारामुळे माणसाला क्षयरोग होतो. यात मुख्यतः ७५ टक्के रुग्णांमध्ये फुफ्फुसांना बाधा होत असते. काही रुग्णांमध्ये फुफ्फुसेतर अवयवांनाही बाधा होत असते. साधारण ३५ टक्के वा जास्त लोकांच्या शरीरात क्षयरोगाचे जंतू वास्तव्य करून असतात.

     पण या सर्वांनाच क्षयरोग होत नाही. कारण, हे जंतू निद्रिस्त अवस्थेत असतात. पण शरीरातील प्रतिकारशक्ती कमी झाल्यास हे झोपी गेलेले जंतू जागे होतात. क्षयरोग हा मायक्रोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसीस नावाच्या जंतूमुळे होणारा अत्यंत संसर्गजन्य असा रोग आहे. इ.स.१८८२ साली डॉ.रॉबर्ट कॉक यांनी क्षयरोगाच्या जिवाणूंचा शोध लावला. त्यांचा प्रबंध जागतिक शास्त्रज्ञांच्या परिषदेत मांडला व त्यास दिनांक २४ मार्च रोजी मान्यता मिळाली. म्हणून दरवर्षी २४ मार्च हा दिवस जागतिक क्षयरोग दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. ज्या व्यक्तीला क्षयरोग (टी.बी.) असेल तो माणूस बोलला, थुंकला किंवा शिंकला तरी त्याच्या शरीरातील क्षयाचे जंतू बाहेर पडतात आणि हवेद्वारे जवळ असलेल्या निरोगी व्यक्तीच्या शरीरात प्रवेश करतात व त्या निरोगी व्यक्तीला क्षय जंतूंचा संसर्ग होतो.

     संसर्ग झालेल्या व्यक्तीची रोग प्रतिकारशक्ती कमी झाल्यास अशा व्यक्तींना क्षयरोगाची लागण होते. एखाद्या व्यक्तीला सतत दोन आठवड्यांपेक्षा जास्त काळ खोकला असणे, वजन कमी होणे, भूक मंदावणे, हलकासा परंतु संध्याकाळी वाढणारा ताप, छातीत दुखणे, रात्री घाम येणे इत्यादी लक्षणे असल्यास त्याच्या कफाची तपासणी करून घेणे आवश्यक आहे. फुफ्फुसांशिवाय इतर अवयवांमध्ये क्षयरोग होतो. उदा. हाडे सांध्याचा क्षयरोग, लसीकाग्रंथीचा क्षयरोग, मज्जासंस्थेचा क्षयरोग, आतड्यांचा क्षयरोग इत्यादी. हा रोग पूर्णपणे बरा होण्यासाठी ६ महिने अथवा अधिक काळ उपचार घेणे गरजेचे असून जर उपचार मधेच बंद केले तर क्षयरोग परत उलटण्याची शक्यता असते. रुग्णांचा compliance (औषधांना चिकटून रहाणे) ही गोष्ट क्षयरोगाच्या उपचारांत अतिशय आवश्यक आहे.

     भारत सरकारचे क्षयरोग नियंत्रणासाठी युद्धपातळीवर प्रयत्न चालू आहेत. डॉट्स या उपक्रमात मोफत तपासणी व पूर्ण कालावधीसाठी मोफत उपचार सरकारी इस्पितळात केले जातात. पूर्ण उपचार आरोग्य सेवकांच्या निरीक्षणासाठी दिले जातात. त्यामुळे उपचार अर्धवट, अनियमित घेणे या शक्यता राहात नाहीत. रुग्ण पूर्ण बरा होतोच,'रेझिस्टंट टी.बी.'ची शक्यताही कमी होते. सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत डॉट्स म्हणजे डायरेक्टली ऑब्जर्व्ह ट्रीटमेंट वूईथ शॉर्टटर्म केमोथेरपी नावाचा औषधोपचार क्षयरोगावर केला जातो. सहा महिने व आठ महिने असा हा उपचाराचा कालावधी असून नवीन क्षयरोग्यांनी सुरुवातीचे सहा महिने डॉट्सची औषधी व्यवस्थित घेऊन त्याची तपासणी दिलेल्या वेळेत केल्यास हा आजार १०० टक्के पूर्ण बरा होतो.

-- महानगर टीम
---------------

                    (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मIय महानगर.कॉम)
                   --------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-24.03.2023-शुक्रवार.
=========================================