दिन-विशेष-लेख-जागतिक मादक पदार्थ विरोधी दिन-A

Started by Atul Kaviraje, June 26, 2023, 07:14:18 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                    "दिन-विशेष-लेख"
                           "जागतिक मादक पदार्थ विरोधी दिन"
                          ---------------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-26.06.2023-सोमवार आहे. २६ जून हा दिवस "जागतिक मादक पदार्थ विरोधी दिन" म्हणूनही ओळखला जातो. वाचूया, तर या दिवसाचे महत्त्व, आजच्या या "दिन-विशेष-लेख" या शीर्षकI-अंतर्गत.

     दरवर्षी २६ जून हा दिवस जगभर जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिन म्हणून विविध विधायक उपक्रमांच्या स्वरूपात साजरा केला जातो. युनोने १९८८ साली याची घोषणा केली.

=========================================
जागतिक अमली पदार्थ विरोधी दिन--
प्रस्तावना
अमली पदार्थ
पुरवठा कोठून होतो ?
व्यसनांची लक्षणे
यावर उपाय
तज्ज्ञ म्हणतात...
युवकांना सल्ला
=========================================

                        प्रस्तावना--

     तरूणांना अमली पदार्थाचा विळखा...अमली पदार्थाची विक्री करताना टोळीला अटक...रेल्वे फूटपाथवर चालतो अमली पदार्थाचा धंदा... अमली पदार्थाच्या सेवनाने दोघांचा मृत्यू...विमानतळावर तीन कोटींचे ड्रग्ज सापडले...दोघांना अटक...अशा आशयाच्या बातम्या आपण रोज वर्तमानपत्रात व न्यूज चॅनेलवर वाचतो..ऐकतो. आजची बहुसंख्य तरुण पिढी अमली पदार्थांच्या विळख्यात सापडली आहे. आपल्या देशाच्या हद्दी अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या देशाला लागून असल्यामुळे याचे प्रमाण वाढत आहे. पालकांना तरूणांना यापासून रोखण्याची समस्या सतावत आहे. शासनाने अशा पदार्थांवर बंदी घातलेली आहे. दरवर्षी 26 जून हा जागतिक अमली पदार्थ विरोधी दिन म्हणून साजरा केला जातो. याविषयी थोडंस...

     भावी तरूण पिढीला वाचविण्यासाठी शासनच सरसावले आहे. राज्यघटनेतील अनुच्छेद 47 मध्ये सार्वजनिक आरोग्य आणि जनतेच्या आरोग्य रक्षणासाठी (औषधीय प्रयोजनाव्यतिरिक्त) मादक पदार्थावरील बंदीची मार्गदर्शक तत्वे समाविष्ट करण्यात आली आहेत. त्यानुसार राज्याचे व्यसनमुक्ती धोरण निश्चित करण्यात आले असून या विभागाच्या दिनांक 17 ऑगस्ट 2011 च्या शासन निर्णयान्वये महाराष्ट्र राज्याचे व्यसनमुक्ती धोरण जाहीर करण्यात आले आहे.

     संयुक्त राष्ट्राने सन 1987 पासून अमली पदार्थ हा विषय महत्वाचा मानला आहे. भारतात नार्कोटिक ड्रग्स ॲण्ड सायकोट्रॉपिक सबटंन्स ॲक्ट 1985 (एनडीपीएस) हा अंमली पदार्थ विरोधी कायदा आहे. मालद्वीप सरकारने संयुक्त राष्ट्रांना मादक पदार्थांच्या संबंधित संमेलनासाठी अनुमोदन दिले आणि पहिले अंमली पदार्थावर आधारित संमेलन १९६१ झाले. दुसरे संमेलन १९७१ मध्ये अवैध सायकोट्रापिक पदार्थ यावर झाले. गैरकानुनी धंद्याच्या विरोधात १९८८ मध्ये तिसरे संमेलन झाले.

     या कायद्यांतर्गत अमली वस्तू किंवा औषधाचे उत्पादन, वितरण, सेवन, विक्री, वाहतूक, साठा, वापर, आयात-निर्यात यावर देशात बंदी आहे. प्रत्येक व्यक्ती, मुले, मुली यांच्यामध्ये जनजागृती व्हावी, यासाठी राज्य शासनाच्या सामाजिक व विशेष सहाय विभागाने उपक्रम राबविण्याचे ठरविले आहे. राज्यात जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, सामाजिक न्याय विभागाचे अधिकारी यांनी 26 जून या दिवशी आपल्या परिसरातील शाळा व स्वयंसेवी संस्थांमार्फत विविध कार्यक्रमाचे आयोजन करायचे आहे. गावात/शाळामधून अमली पदार्थ विरोधी फेरी काढणे, अमली पदार्थावर बंदी याविषयी निबंध स्पर्धा आयोजित करणे, व्यसनमुक्ती हीच राष्ट्रभक्ती याविषयी वक्तृत्व स्पर्धा आयोजित करणे, अमली पदार्थावर पथनाट्याचे आयोजन करणे, अमली पदार्थ विरोधी जनजागृती करणे, अमली पदार्थाच्या सवयी सोडविण्यासाठी या दिवशी निर्धार प्रतिज्ञा देणे आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.

     शिवाय अमली पदार्थाच्या विरोधी काम करणाऱ्या व्यक्ती, सामाजिक संस्था, संघटना यांना आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी अधिकाऱ्यांनी मदत करावयाची आहे, याबाबतचे शासन परिपत्रक 19 जूनला पारित झाले आहे.

--धोंडिराम अर्जुन
(माहिती स्रोत: महान्युज)
---------------------

                     (साभार आणि सौजन्य-संदर्भ-mr.विकासपीडिया.इन)
                     ---------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-26.06.2023-सोमवार.
=========================================