दिन-विशेष-लेख-जागतिक मादक पदार्थ विरोधी दिन-B

Started by Atul Kaviraje, June 26, 2023, 07:15:51 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                    "दिन-विशेष-लेख"
                            "जागतिक मादक पदार्थ विरोधी दिन"
                           ---------------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-26.06.2023-सोमवार आहे. २६ जून हा दिवस "जागतिक मादक पदार्थ विरोधी दिन" म्हणूनही ओळखला जातो. वाचूया, तर या दिवसाचे महत्त्व, आजच्या या "दिन-विशेष-लेख" या शीर्षकI-अंतर्गत.

                       अमली पदार्थ--

     ज्या पदार्थांच्या सेवनाने माणसाला विशिष्ट प्रकारची सुस्ती, नशा, तार किंवा धुंदी येते. त्यांना रुढार्थाने मादक पदार्थ किंवा अमली पदार्थ म्हणतात. अफू व त्यापासून तयार केलेले मॉर्फीन, हेरॉईन इ. पदार्थ, कोकेन, भांग, गांजा, चरस (हशिश) वगैरे पदार्थाचा मादक पदार्थात समावेश केला जातो. ब्राऊन शुगर, झंडूबाम रुमालावर टाकून त्याचा नाकाद्वारे वास घेतात. यातून त्यांना नशा येते. स्पिरीटचाही नशेसाठी अशाचप्रकारे वापर केला जात आहे. यापुढेही जाऊन श्रीमंत लोक सिंथेटीक अमली पदार्थ आणि आता घातक जीवघेणा एमडीचा (मेफेड्रॉन) वापर होऊ लागला आहे. शिवाय मॅजिक मश्रूम, एलसीडी, मारिजुआना, म्याव-म्याव, डॅरनेक्स, शिलावती, वेदनाशामक गोळ्या, व्हाईटनर ते औषधे याचाही वापर नशेसाठी केला जाऊ लागला आहे.

     भारतात एनडीपीएस ॲक्टनुसार (नार्कोटिक ड्रग्ज ॲन्ड सायकोट्राफिक सब्सटंन्सेस ॲक्ट-१९८५) नशीले पदार्थ वापरणे गुन्हा आहे. ड्रग्ज तुम्ही तुमच्यासाठी वापरा किंवा दुसऱ्या कामासाठी वापरा, तो गुन्हाच आहे. त्याला दंड हा ड्रग्स किती प्रमाणात वापरतो याच्यावर अवलंबून असते. जर एखाद्याला ड्रग्स बाळगण्यासाठी किंवा सेवन केल्यामुळे शिक्षा झाली असेल आणि त्याची सुधारायची इच्छा असेल तर तो एखाद्या डी-ॲडिक्शन सेंटरमध्ये उपचार घेऊ शकतो. त्याने उपचार मध्येच थांबवले आणि परत व्यसनाकडे वळाला तर त्याला परत शिक्षा होऊ शकते.

     ग्रामीण भागात अमली पदार्थ सेवनाचे प्रमाण कमी आहे. मात्र शहरांच्या ठिकाणी याचे प्रमाण वाढत आहे. हे चिंताजनक आहे. मुंबईत ग्रँट रोड स्टेशन, दाणाबंदरला जाणारा ब्रीज, डॉकयार्ड कॉलनीतल्या वस्त्या, माहीम कोळीवाड्याकडे जाणारा ब्रीज, कुर्ला-सांताक्रुझ जोडमार्गाच्या समोरील गल्ल्या, मानखुर्द, शिवाजीनगर, गोवंडी आदी ठिकाणच्या झोपडपट्ट्या, खाडीच्या किनारीलगतच्या झोपडपट्ट्या इथं नशा करणारी टोळकी आपल्याला दिसतात. त्यांना आपण 'गर्दुले' म्हणतो. हे गर्दुले आपली नशा भागविण्यासाठी कोणत्याही थराला जावून गुन्हेगारीकडे वळतात. चोरी, लुटमार, मोबाईल चोर, महिलांच्या गळ्यातील दागिने यातून ते पैसे मिळवून नशा करतात. शिवाय बलात्कार, मारामारी, खून करण्याची त्यांची प्रवृत्ती वाढत आहे.

     केवळ जिज्ञासेपोटी अमली पदार्थांची चव चाखणारे आज या गर्तेत आपोआपच सापडले जात आहेत. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांबरोबरच उच्चभ्रू वर्गातील लोकही यात गुरफटू लागले आहेत. सुरुवातीला कोणीही अमली पदार्थ व्यसनाधीन होण्यासाठी सेवन करीत नाही. काही विद्यार्थी अभ्यास करताना झोप येऊ नये म्हणून सुरुवातीला अमली पदार्थाचे सेवन करतात. मुलीही अमली पदार्थाच्या विळख्यात अडकू लागल्या आहेत. बाजारात नशा आणणारे अनेक पदार्थ मिळतात. काही औषधांनीही नशा येते. काहीजण अमली पदार्थ शरीरात टोचून घेतात, पण कोणताही अमली पदार्थ हा शरीरासाठी घातकच आहे. या विळख्यात गटांगळ्या खाणाऱ्यांना अमली पदार्थांच्या दुष्परिणामाविषयी जागृती करण्यासाठी 26 जून या दिवसाचे महत्त्व आहे. अनेक कार्यक्रमांनिमित्त याविषयी जनजागृती आणि या पदार्थांपासून दूर कसे राहावे, तसेच आपल्या प्रकृतीविषयी गंभीर राहण्याविषयी सावध केले जाते. शैक्षणिक संस्थांबरोबरच इतर सेवाभावी संस्थाही या कामात पुढाकार घेत आहेत. यात आता सामान्य माणसांचाही सहभाग असणे अपरिहार्य बनले आहे. इतकी ही समस्या जटील बनली आहे.

                    पुरवठा कोठून होतो ?--

     आपल्या बॉलिवूडमध्ये नुकताच 'उडता पंजाब' हा चित्रपट येवून गेला. यात पंजाबमध्ये पाकिस्तान सीमेवरून अमली पदार्थाची तस्करी केली जात असल्याचे दाखविले आहे. याचा अर्थ आपल्या शेजारील देशातून म्हणजेच पाकिस्तान, नेपाळ, बांग्लादेश, अफगाणिस्तान, भूतान येथून अमली पदार्थ आपल्या देशात येतात. याची किंमतही लाखो रूपयात असते. याची खरेदी-विक्रीही सांकेतिक चिन्हे, खुना व भाषांच्या माध्यमातून होते.

     'हशीश'सारखे अंमली पदार्थ नेपाळमधून पुरविले जातात. नायजेरियनांकडून भारतात मोठ्या प्रमाणात अमली पदार्थांची तस्करी केली जाते. नायजेरियन विद्यार्थी वा कपड्यांचे व्यापारी या माध्यमातून ही तस्करी केली जाते. नायजेरिया देशातील नागरिक किनारी भागात मोठ्या प्रमाणात वावरताना दिसतात.

-धोंडिराम अर्जुन
(माहिती स्रोत: महान्युज)
---------------------

                      (साभार आणि सौजन्य-संदर्भ-mr.विकासपीडिया.इन)
                     ----------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-26.06.2023-सोमवार.
=========================================