II देवशयनी आषाढी एकादशी II-लेख-1-B

Started by Atul Kaviraje, June 29, 2023, 11:35:52 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                             II देवशयनी आषाढी एकादशी II
                            ------------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक 29.06.2023-गुरुवार आहे. आज "देवशयनी आषाढी एकादशी" आहे. आषाढी एकादशीच्या दिवशी लाखोंच्या संख्येने वारकरी, भक्त पंढरपूरमध्ये विठ्ठलाच्या दर्शनासाठी दाखल होतात. आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षात येणार एकादशीला देवशयनी आषाढी एकादशी असे म्हणतात. आध्यात्मिक व धार्मिक दृष्टिकोनातून या दिवसाला खूप महत्त्व आहे. या दिवशी देव निद्रिस्त होतात अशी समजूत आहे. मराठी कवितेच्या माझ्या सर्व भाऊ-बहीण कवी-कवयित्रींना  "देवशयनी आषाढी एकादशी"च्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया या-निमित्त माहितीपूर्ण लेख. 

     एकादशीचे व्रतमाहात्म्य वर्णन करताना अत्यंत गुह्यतम व्रत सुलभपणे सांगून उच्चतम फलप्राप्तीची खात्री या अभंगातून दिली आहे. नर का नारायण होण्यास सांगणारा धर्मसिद्धांत केवळ उपवास व हरिकिर्तनाने साध्य होईल अशी ग्वाही महाराज देतात.

     ना कोणता यज्ञ, ना वेद पठण, ना मोठी खर्चीक अनुष्ठाने, ना कठोर व्रताचरण, ना हटयोग ना विद्वत्तेचे जाहिर प्रदर्शन तरी देखील "नर का नारायण" होणे सहज साध्य असल्याचे महाराज सांगतात.

     श्रीविठ्ठला बद्दल निरपेक्ष प्रेमभाव हे असाधारण बळ प्रदान करणारे ठरते. आषाढी एकादशीला लाखो लोक विठोबाचे दर्शन घेण्यास मंगलमय वारीत सहभागी होतात. त्याचे एकमात्र कारण विठठलाचे प्रेमस्वरुप नाम ॥विठोबाचे नाम सुलभ सोपारे। तारी एकसरें भवसिंधु॥ येणा-या प्रत्येकावर समानभावाने प्रेमकरणारा व भवसिंधु तरुन जाण्यास तळमळीने साह्यभुत होणारा विठठल हाच सकालांचा आधार ठरतो. हरिस्मरण हाच मुख्य धर्म आहे असे मानणे, व त्यानुसार आचरण करणे मानवास सात्विक बनवते. अशा हरिभक्ताच्या मनातील हरिचिंतनाची सहजस्पंदनाने भूमंडलातील अमंगलाचे अघमर्षण व मांगल्याचे प्रक्षेपण करत असते आणि तेही निरपेक्ष आणि अविरत. कलीयुगात अशा ज्ञातअज्ञात हरिभक्तांच्या पुण्यप्रभावानेच सन्मार्गाने जाणा-यांना अपयशाच्या महाद्वारात उभे राहूनही हरिनिष्ठ राहण्याचे अभेद्य बळ मिळत असते. यशापयशाच्या आलेखावरुन आपल्या भक्तिचे किंवा इश्वरीकृपेचे मुल्यांकन आपण करु शकत नाही. मनातील असंतुलीत आंदोलने, अनामिक भय, सर्वसाधनसंपत्तीने सालंकृत असूनही निद्रादेवीची अवकृपा व सतत असमाधानाचे बीजारोपण, या लक्षणांच्या यादीत चढत्या भाजणीने होणारी वाढ थांबवणे हे आपले उदिष्ठ असणे अगत्याचे आहे. कारण विठठलाचे स्वरुप तर शांताकारम् आहे. आम्ही अल्पसंतुष्ट मनोवृत्तीचा पुरस्कार करत आहोत असे कदापि समजू नये. नित्यस्पर्धेतील सर्वोत्तम स्पर्धक अशी आपली ख्याती जरुर असावी, मात्र त्याच बरोबर शाश्वत सर्वोत्तमाचा ध्यासही घ्यावा. आणि त्यासाठी आषाढी एकादशी हा अत्युत्तम मुहूर्त आहे हे वेगळे सांगावयास नको.

--मीरा जोशी
------------

                           (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मायबोली.कॉम)
                          ----------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-29.06.2023-गुरुवार.
=========================================