II देवशयनी आषाढी एकादशी II-लेख-5

Started by Atul Kaviraje, June 29, 2023, 11:42:29 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                             II देवशयनी आषाढी एकादशी II
                            -----------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक 29.06.2023-गुरुवार आहे. आज "देवशयनी आषाढी एकादशी" आहे. आषाढी एकादशीच्या दिवशी लाखोंच्या संख्येने वारकरी, भक्त पंढरपूरमध्ये विठ्ठलाच्या दर्शनासाठी दाखल होतात. आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षात येणार एकादशीला देवशयनी आषाढी एकादशी असे म्हणतात. आध्यात्मिक व धार्मिक दृष्टिकोनातून या दिवसाला खूप महत्त्व आहे. या दिवशी देव निद्रिस्त होतात अशी समजूत आहे. मराठी कवितेच्या माझ्या सर्व भाऊ-बहीण कवी-कवयित्रींना  "देवशयनी आषाढी एकादशी"च्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया या-निमित्त माहितीपूर्ण लेख. 

                 देवशयनी आषाढ एकादशी--

     आषाढ महिना म्हणजे महाराष्ट्रातील अतिशय वैशिष्ट्यपूर्ण अशा पंढरपूरच्या वारीचा काळ असतो. आषाढी एकादाशीच्या दिवशी अनेक संतांच्या पालख्या पंढरपुरात पोहोचतात. त्यांसोबत लक्षावधी लोक अनेक दिंड्यातून पायी चालत, विठोबाचे वारकरी म्हणून मोठ्या श्रद्धेने पंढरीला पोहोचतात.

     वारकर्यांलत जात, पंथ, स्त्री-पुरुष, गरीब-श्रीमंत, उच्च-नीच असा जराही भेदभाव नसतो. इसवी सन १२९१ मध्ये आषाढी एकादशीला आळंदीहून पंढरपूरला जाण्यासाठी पहिली दिंडी निघाली होती असे म्हटले जाते. या वारीसाठी फक्त महाराष्ट्रातूनच नव्हे तर इतर राज्यांतूनही विठ्ठलभक्त नियमितपणे दिंडीत सामील होतात. वारकरी लाखोंच्या संख्येने विठ्ठलनामाचा गजर, भजन- प्रवचन-कीर्तन करत पायी चालतात.

     असंख्य तरुणही त्यात हौसेने व भक्तिभावाने सामील होतात. परदेशी लोकही मुद्दाम या सुमाराला ही विठ्ठलभक्तीची वारी पाहण्यासाठी भारतात येतात आणि या अनोख्या परंपरेचा अनुभव घेतात.

     गळ्यात तुळशीची माळ, कपाळावर गंध-टिळा-बुक्का आणि तोंडाने विठुनामाचा गजर करणारे हे वारकरी खांद्यावर पताका, हातात टाळ, डोक्यावर तुळस घेऊनही चालतात. अनेकांच्या गळ्यात मृदंगही असतो. वर्षानुवर्षे वारीला जाणारे लाखो लोक निग्रहाने चालतात, वाटेत होईल तशी विश्रांती घेतात, मिळेल ते जेवण-खाण घेतात. वारीचे, विविध पालख्यांचे प्रवास-निवास-भोजन यांचे वेळापत्रक, व्यवस्थापन हाही एक अनुभवण्याचा विषय आहे. आषाढातील ही एकादशी उपवास करून घरोघरी साजरी होते. पावसाळ्याची सुरुवात असल्याने ताजी रताळी, नवा बटाटा, खजूर, फळे, वर्यानचे तांदूळ, खिचडी असे विविध उपवासाचे पदार्थ या दिवशी ग्रहण केले जातात.

     या एकादशीसाठी आळंदीहून संत ज्ञानेश्र्वरांची, देहूतून संत तुकाराम, त्र्यंबकेश्र्वरहून संत निवृत्तीनाथ, सासवडहून सोपान देवांची, पैठणहून संत एकनाथंची, मेहूणहून संत मुक्ताबाईंची, औंढ्या नागनाथहून संत विसोबा खेचरांची, तेरहून संत गोरा कुंभारांची - अशा अनेक पालख्या पंढरपूरला जायला निघतात. संत ज्ञानेश्र्वरांची पालखी आळंदीहून ज्येष्ठ कृष्ण अष्टमीला निघते. ती आषाढ शुक्ल दशमीला रात्री पंढरपूरला पाहोचते.

                     गोष्ट आषाढी एकादशीची :--

     संपूर्ण वर्षभरामध्ये साधारणता: चोवीस एकाद्शी येतात. प्रत्येक महिन्यात कृष्ण पक्षात एक व शुक्ल् पक्षात एक. दोन एकादशी ह्या अधिक मास असल्यास जादा असतात. या सर्वांमध्ये आषाढी व कार्तिकी एकाद्शीस अनंन्य साधारण महत्वी आहे. असे मानण्यात येते की, आषाढी एकाद्शीस भगवान श्रीविष्णु हे झोपी जातात म्हणुन त्यांस शयनी एकादशी म्हणतात व कार्तिकी एकादशीस प्रबोधिनी एकाद्शी, कारण या दिवशी भगवान श्रीविष्णु जागे होतात म्हणुन म्हणतात.

     आपल्या हिंदू संस्कृतीत ही एक गोष्ट मात्र नक्की आहे कि कोणत्याही रुढीला, परंपरेला काहीतरी एक कारण आहे किंवा त्यामागे एखादी गोष्ट आहे. त्याप्रमाणे या एकादशीबद्दल सुद्धा एक गोष्ट आहे. असे सांगितले जाते कि, मुदुमान्य नावाच्या राक्षसाने एकदा खूप मोठी तपश्वर्या भगवान शंकराची केली. भोळे शंकर भगवान त्याच्या कडक तपश्चर्येने प्रसन्न झाले व त्याला वर दिला की 'तु फक्त एका स्त्रीच्या हातून मरशील.' राक्षसच तो मृदुमान्य या वरामुळे अधिकच उन्मत्तत झाला त्याने सगळीकडे संहार चालु केला. त्याने सर्व देवतांना लढाईत पराभूत करुन टाकले. सर्व हरलेले देव शंकर भगवानांकडे गेले पण स्वता:च त्याला वर दिला असल्यामुळे, शंकरभगावानांचे त्याच्या पुढे काही चाले ना! सर्व देव एका गुहेत जाऊन लपले. त्या गुहेत सर्व देवता दाटीवाटीने बसले होते तेथे सर्वांच्या श्वासातुन एक देवता निर्माण झाली. तीचे नाव एकादशी. एकादशीने मृदुमान्य राक्षसाला ठार करुन सर्व देवतांची सुटका केली. सुटका झालेले देव परतत असताना पाऊसात सर्वांना स्नान घडले व गुहेत लपुन बसल्यामुळे त्यांना काही खायला मिळाले नाही, त्यामुळे उपसाव ही घडला. हिच परंपरा पुढे एकादशीच्या दिवशी रुढ झाली. म्हणजे एकादशीच्या दिवशी उपवास करण्याची.

--श्री.मंदार संत
--------------

                        (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मायबोली.कॉम)
                       ---------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-29.06.2023-गुरुवार.
=========================================