II देवशयनी आषाढी एकादशी II-लेख-7

Started by Atul Kaviraje, June 29, 2023, 11:47:40 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                              II देवशयनी आषाढी एकादशी II
                             ------------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक 29.06.2023-गुरुवार आहे. आज "देवशयनी आषाढी एकादशी" आहे. आषाढी एकादशीच्या दिवशी लाखोंच्या संख्येने वारकरी, भक्त पंढरपूरमध्ये विठ्ठलाच्या दर्शनासाठी दाखल होतात. आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षात येणार एकादशीला देवशयनी आषाढी एकादशी असे म्हणतात. आध्यात्मिक व धार्मिक दृष्टिकोनातून या दिवसाला खूप महत्त्व आहे. या दिवशी देव निद्रिस्त होतात अशी समजूत आहे. मराठी कवितेच्या माझ्या सर्व भाऊ-बहीण कवी-कवयित्रींना  "देवशयनी आषाढी एकादशी"च्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया या-निमित्त माहितीपूर्ण लेख. 

               देवशयनी आषाढ एकादशी--

५ पंढरीवारी व्रत :--
पंढरीची वारी हे एक कलियुगातील मोक्षदायक व्रत आहे. हे व्रत आषाढ शु. एकादशीपासून करतात. पण मुख्य वारीव्रत म्हणून आषाढ , कार्तिक, माघ व चैत्र या महिन्यांतील शु. एकादशीस करतात., आणि पंढरपूर हे वारकर्यां च्या भागवतधर्माचे अधिष्ठान व आद्य पीठ आहे. त्यामुळे आत्मोद्धार, लोकोद्धार, ज्ञान, भक्ती, प्रपंच आणि परमार्थ इ. गोष्टी या धर्मात एकत्र नांदतात. या भक्तिधर्मात जातिधर्माचा, स्पृश्यास्पृश्य भेद मानला जात नाही व पांडुरंगाचे दर्शन पादस्पर्शाने होते. म्हणून हा वैष्णव संप्रदायांपैकी एक प्रमुख संप्रदाय आहे. पंढरपूरचा विठोबा त्यांचे उपास्य दैवत आहे. पुंडलिकाचे भेटीसाठी पंढरीत परब्रह्म उभे आहे व चरणी भीमानदी पतितांची पापे नाश करण्यास, त्यांचा उद्धार करण्यास सदैव सिद्ध आहे.
पंढरीचे अनादित्व -
'जेव्हा नव्हतें चराचर । तेव्हां होतें पंढरपूर ।
जेव्हां नव्हती गोदागंगा । तेव्हां होती चंद्रभागा ।'
पुंडलीकाची मातृपितृभक्ती पाहून भीमेच्या काठी लोहखंडक्षेत्री (पंढरपुरात रुक्मिणीसह श्रीकृष्ण आले, याचा उल्लेख 'पद्मपुराणा'त आढळतो तो असा-
'ततो निवृत्त आयातः पश्यन् भीमरथीतटे ।
द्विभुजं विठ्ठलं विष्णुं भक्तिमुक्तिप्रदायकम् ।'
स्कंदपुराणात -
'श्रीगुरुं विठ्ठलानंदं परात्परजगत्प्रभुम् ।'
श्रीरामचंद्र पंढरपुरात आले होते असे वर्णन असून;
'पांडुरंग नमस्कृत्य चंद्रभागां विगाह्य च।'
त्यांनी पांडुरंगाचे दर्शन घेऊन चंद्रभागेत स्नान केले असा 'आनंदरामायणा'त निर्देश आहे.
'तत्र श्रीविठ्ठलं देवं प्रियाभ्यां सहशोभितम् ।'
असे 'करवीर महात्म्या'त स्पष्ट म्हटले आहे. म्हणून पंढरपुरास भूलोकीचे वैकुंठ व दक्षिणेची काशी असे म्हणतात. तेव्हा पंढरीच्या विठ्ठलाच्या दर्शनास वारीच्या रूपाने जाणे कलियुगातील महातेजस्वी, प्रभावी व मोक्षदायक आहे. यासाठी पंढरीची वारी करतात. फल-मोक्षप्राप्ती.
पंढरीची वारी वार्षिक, सहामाही, दरमहिन्याची, पंधरवड्याची, दररोजची, जशी वारकरी संप्रदायाची दीक्षा घेतली असेल तशी, करतात. ही वारी पायीच केली पाहिजे. त्यामुळे शाररिक तप घडते, अशी समजूत असल्याने पायी वारीस अधिक महत्व आहे.
वारीची प्रथा - दर महिन्याच्या वारीस येणार्यांमचे नित्यनेम कार्यक्रम :
दर महिन्याच्या शु. दशमीस चंद्रभागेचे स्नान, नगरप्रदक्षिणा, पांडुरंगाचे दर्शन, फडावरील परंपरेप्रमाणे कीर्तन, दिंडी, भजन वगैरे . एकादशीस जागर, द्वादशीस पर्वकाळ कीर्तन, कीर्तनानंतर खिरापतीचा प्रसाद घेऊन वारकरी आपापल्या गावी परतात. मात्र आषाढी, कार्तिकीच्या वारीस गोपाळपुराला काल्याचे कीर्तन ऐकून' कालाप्रसाद ' घेऊन मग परततात. वारीच्या गर्दीत कित्येक वारकरी कळसाचे दर्शन घेतात. पांडुरंग मंदिराच्या कळसावर उभा राहून आपल्या भक्तांना दर्शन देतो, अशी त्यांची भावना असते.
निष्ठावंत वारकर्यां मध्ये पायी वारीचे फार महत्व मानले जाते. पायी जरी वारी करीत असले तरी बरोबर भागवतधर्माची जागृतीची खूण म्हणून खांद्यावर पताका, देवपूजेचे साहित्य, नित्यनेमाचा गाथा, विष्णुसहस्त्रनाम, भगवद्‌गीता, काहींच्याबरोबर तुळशीवृंदावन ही असतात.
'फुटो हे मस्तक, तुटो हे शरीर । नामाचा गजर सोडू नये ।' असे वारकर्याुचे ब्रीद आहे.
'रामकृष्ण हरि ' हा संप्रदाय-मंत्र आहे. राम म्हणजे हृदयात रमविणारा, कृष्ण म्हणजे आकर्षण करणारा, हरी म्हणजे ऐक्यरूप असणारा विठ्ठलरुप परमात्मा होय. या मंत्राला सोवळे-ओवळे, स्थळ-काळ, जाति-वित्त-कुळ यांचा प्रतिबंध नाही. गळ्यात तुळशीच्या मण्यांची माळ, कपाळी गोपीचंदनाच्या मुद्रा व बुक्का आणि खांद्यावर पताका ही वारकर्यां ची बोधचिन्हे होत. वारी करणार्यांचना गुरु करुन घेऊन त्याकडून माळ घ्यावी लागते. गुरू माळ देताना शिष्याकडून काही नियम पाळ्ण्याची शपथ घेववतात. ते नियम :-
(१) खरे बोलणे,
(२) परस्त्री मातेसमान मानणे,
(३) काही अपघात घडला असता भगवंताने क्षमा करावी, म्हणून त्याची कळकळीने प्रार्थना करणे,
(४) मद्यमांसाहार आदी सेवन न करता सात्विक आहार घेणे,
(५) दर पंधरवड्यांच्या एकादशीचे व्रत करणे,
(६) वर्षातून निदान एकदा तरी पंढरीची वारी करणे,
(७) नित्यनेम म्हणून दररोज 'रामकृष्णहरी' या मंत्राचा १०८ वेळा माळ ओढून जप करणे,
(८) नित्यनेमाने 'हरिपाठा'चे अंभंग म्हणणे व ज्ञानेश्व रीच्या काही ओव्या नियमित वाचणे आणि
(९) प्रपंचात वाट्यास आलेली नित्यकर्मे श्रीविठ्ठलस्मरणार्थ प्रामाणिकपणाने पार पाडणे.
कोणत्याही वेळी केव्हाही गळ्यातून तुळशीची माळ काढीत नाहीत. माळ तुटलीच तर दुसरी माळ घालीपर्यंत निष्ठावंत वारकरी थुंकीदेखील गिळत नाही. असे केले नाही, तर ब्रह्महत्येचे पातक समजतात.

६) या महिन्यातील एकादशीला शयनी एकादशी असे म्हणतात.

--श्री.मंदार संत
-------------

                          (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मायबोली.कॉम)
                         ---------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-29.06.2023-गुरुवार.
=========================================