प्रेमांन्तिका

Started by mkapale, June 30, 2023, 09:01:09 AM

Previous topic - Next topic

mkapale

नेहेमीच्या ठिकाणी भेट तातडीने
गोंधळलेला तो होता अन खंबीर ती
सोडचिठ्ठी देते म्हणाली नात्याला
शांततेत दाटले होते प्रश्न किती

थोडा वेळ आसवांची जुगलबंदी
निश्शब्द भावनांच्या थारोळ्यात झाली
अचानक आलेल्या ठसक्यात तिच्या
दिसली रूमालावर रक्ताची लाली

हातात हात घेऊन ती म्हणाली..पुढे आहे
तुझ्या अवघ्या आयुष्याचा दिवस नवा
आली आहे माझ्या आयुष्याची संध्याकाळ
प्रेमाचा झरा आता तू दुसरीला द्यावा

खऱ्या मायेत माझा रोगही लपला नाही
वचन देते पण काळीज हातावर ठेवून
माझ्या हक्काचं प्रेम घ्यायला येईन
तुझ्या घरी तुझी लेक बनून...मी लेक बनून
.
.
.
.
.
सगळ्यांचंच प्रेम होत नाही सफळ
जे आता आहे जुळलेलं ते जपावं
नशिबाची फिरकी चालण्याआधी
सोबत घेऊन 'आपल्यांना' जगत रहावं