दिन-विशेष-लेख-संत मुक्ताबाई स्मृतीदिन-C

Started by Atul Kaviraje, July 04, 2023, 04:39:58 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                   "दिन-विशेष-लेख"
                               "संत मुक्ताबाई स्मृतीदिन"
                              -----------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-04.07.2023-मंगळवार आहे.  ४ जुलै-हा दिवस "संत मुक्ताबाई स्मृतीदिन" म्हणूनही ओळखला जातो. वाचूया, तर या दिवसाचे महत्त्व, आजच्या या "दिन-विशेष-लेख" या शीर्षकI-अंतर्गत.

                 समाधी पर्व--

     तीर्थयात्रेवरून परतल्यावर अल्पावधीतच ज्ञानेश्वरांनी समाधीस्थ होत असल्याचा आपला निर्णय बोलून दाखविला. आणि सर्व भावंडे त्यासाठी सिद्ध झाली. प्रथम ज्ञानेश्वरांनी आळंदी येथे समाधी घेतली, त्यानंतर सोपान व वटेश्वरांनी सासवड येथे तर पुढे पुणतांबे येथे चांगदेवांनी समाधी घेतली.

               मुक्ताबाईंची समाधी--

     निवृत्तीनाथ आणि नामदेव व इतर भक्तगण यांच्यासमवेत संत मुक्ताबाई आपेगावी पोहोचल्या. तेथून पुढे वेरूळ, घृष्णेश्वर येथे जाऊन मुक्काम केला. पुढील वाटचालीच्या दरम्यान 'ज्ञानबोध' ग्रंथाची निर्मिती झाली. आणि नंतर वैशाख वद्य दशमी या दिनी मुक्ताबाई तापीतीरी स्वरूपाकार झाल्या.

     मुक्ताबाईंची समाधी महत् नगर तापीतीर मेहुण (जळगाव जिल्हा) येथे आहे.

                                साहित्य--

                अभंगगाथा--

     सकलसंत गाथेमध्ये मुक्ताबाईचे फक्त ४२ अभंग ग्रथित केले आहेत. पण प्रकाशित अभंगाव्यतिरिक्त २०२ अभंग उपलब्ध होऊ शकले आहेत. ते 'कडकडोनि वीज निमाली ठायींचे ठायी' या पुस्तकात संकलित करण्यात आले आहेत. प्रकाशित ४२ अभंगाचा अर्थही या पुस्तकात उलगडून दाखविण्यात आलेला आहे.[१] पांडुरंग माहात्म्य वर्णन करणारे अभंग, नामपर अभंग, संतपर अभंग, योगिक अनुभूतीपर अभंग, तत्त्वज्ञानपर अभंग, मुक्तस्थिती वर्णनपर अभंग, संवादात्मक अभंग, कूट रचना या प्रकारे त्यांच्या अभंगांचे वर्गीकरण करता येते.

                 ताटीचे अभंग--

     संत मुक्ताबाईंनी रचलेले ताटीचे अभंग प्रसिद्ध आहेत. या अभंगांमध्ये त्यांनी दरवाजा बंद करून बसलेला आपला भाऊ ज्ञानेश्वर याने ताटी उघडावी म्हणून विनवणी केली आहे. या लोकरूढ समजुतीला काही प्रतीकात्मक अर्थ आहे. लहानग्या मुक्ताईने आपल्या थोरल्या भावाची म्हणजे ज्ञानेश्वरांची अधिकारवाणीने घातलेली समजूत हे या अभंगांचे स्वरूप आहे. संख्येने अल्प (१२) पण आशयाने समृद्ध असणारे हे अभंग पुढे ज्ञानेश्वरी ऊर्फ भावार्थदीपिका या ग्रंथांचे प्रेरणास्त्रोत बनले, असे अंतर्गत पुराव्यानिशी स्पष्ट होते. पोकळ शब्दशास्त्राच्या भाराने दडपून जाणारी व नागवली जाणारी सामान्य जनता पाहून, त्या पासून दूर जात, स्वतःच्या आत्मस्थितीत निमग्न राहावे हे बरे, असा विचार करणे म्हणजे ताटी लावून घेणे. ही ताटी उघडावी अशी विनवणी मुक्ताबाई करतात. ''सुख सागर आपण व्हावे l जग बोधे निववावे ll बोध करू नये अंतर l साधुस नाही आपपर ll'' असे त्या ज्ञानेश्वरांना सांगतात. ''तुम्ही तरुनी विश्व तारा l ताटी उघडा ज्ञानेश्वरा ll'' अशी विनवणी त्या ज्ञानेश्वरांना करतात. परिणामतः शुद्ध ज्ञानापासून वंचित झालेल्या जनसामान्यांमध्ये 'ब्रह्मविद्येचा सुकाळ' करण्याची प्रतिज्ञा करून ज्ञानेश्वर ज्ञानप्रदानाला उद्युक्त झाले आहेत, असे दिसते.

                ज्ञानबोध ग्रंथ--

     मुक्ताबाईंनी 'निवृत्ती-मुक्ताई संवादरूप ज्ञानबोध' या ग्रंथाचे लेखन केले आहे असे संशोधनान्ती स्पष्ट होते. ह्या ग्रंथामध्ये संत निवृत्तीनाथ आणि संत मुक्ताबाई ह्यांचा संवाद आलेला आहे. या ग्रंथाच्या सुरुवातीला निवृत्तीनाथांनी मुक्ताबाईंना १२४ अभंगांमध्ये प्रश्न विचारले आहेत आणि त्या प्रश्नांना मुक्ताबाईंनी ५४ अभंगांमध्ये उत्तरे दिली आहेत. मुक्ताबाई समाधिस्थ होण्याच्या थोडेसे आधी झालेले हे लिखाण असावे, असे त्यातील अंतर्गत संदर्भांवरून लक्षात येते.

                मुक्ताबाई - चांगदेव संवाद--

     सकल संतगाथेमध्ये मुक्ताबाई - चांगदेव संवाद या नावाने काही अभंग प्रकाशित करण्यात आले आहेत. या अभंगांमधील पुष्कळसे अभंग कूट-स्वरूपाचे आहेत.

                  स्फुट लेखन--

मुक्ताबाईंचे कल्याण-पत्रिका, मनन, हरिपाठ हे साहित्य प्रकाशित आहे.
त्यांची 'निवृत्तीप्रसादे मुक्ताबाई' ही अभंगरूपी कविता अद्याप अप्रसिद्ध आहे.

--विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
------------------------------

                     (साभार आणि सौजन्य-संदर्भ-mr.विकिपीडिया.ऑर्ग)
                    ---------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-04.07.2023-मंगळवार.
=========================================