दिन-विशेष-लेख-संत मुक्ताबाई स्मृतीदिन-D

Started by Atul Kaviraje, July 04, 2023, 04:41:50 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                   "दिन-विशेष-लेख"
                                "संत मुक्ताबाई स्मृतीदिन"
                               -----------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-04.07.2023-मंगळवार आहे.  ४ जुलै-हा दिवस "संत मुक्ताबाई स्मृतीदिन" म्हणूनही ओळखला जातो. वाचूया, तर या दिवसाचे महत्त्व, आजच्या या "दिन-विशेष-लेख" या शीर्षकI-अंतर्गत.

                         संत मुक्ताबाई आणि इतर संत यातील अनुबंध--

              गुरू गोरक्षनाथ आणि संत मुक्ताबाई--

     मुक्ताबाईंनी गोरोबांकरवी नामदेवांची घेतलेली परीक्षा, हा प्रसंग सर्वश्रुत आहे. मात्र या कथेतील महत्त्वाची भूमिका निभावणारे गोरोबा म्हणजे गोरा कुंभार नसून नाथसंप्रदायातील एक थोर अध्वर्यु गोरक्षनाथ हे होत, असे अनेक पुराव्यांनी सिद्ध करता येते. मुक्ताबाईंनी गोरक्षनाथांची स्वतःच्या योगसामर्थ्याच्या आधारावर भेट घेतली. ही भेट कशी शक्य झाली याचे वर्णन नामदेवांनी केले आहे ते असे - ''गोरा जुनाट पै जुने । हाती थापटणे अनुभवाचे । परब्रह्म म्हातारा निवाला अंतरी । वैराग्याचे वरी पाल्हाळला ।।'' हा परब्रह्म म्हातारा म्हणजे साक्षात गोरक्षनाथ हे मुक्ताबाईंचे वैराग्य पाहून स्वतःला प्रकट करते झाले.

              संत निवृत्तीनाथ आणि संत मुक्ताबाई--

     निवृत्तीनाथ आणि मुक्ताबाई यांच्यामध्ये बंधू-भगिनी आणि गुरु-शिष्य असे नाते होते. निवृत्तीनाथांनी दिलेल्या साधनेच्या आधारे मुक्ताबाई यांनी जी प्रगती करून घेतली, त्याच्या आधारे त्यांनी गुरुपरंपरेतील आद्यगुरू गोरक्षनाथ यांची अदृश्य रुपात भेट घेतली. या प्रसंगी निवृत्तीनाथांना मुक्ताबाईने मार्गदर्शन केले आहे. पुढेही मुक्ताबाईच्या समाधीपूर्वी त्यांची जी विकल स्थिती झाली होती, तेव्हा निवृत्तीनाथ त्यांना सांभाळत असल्याचे वृत्त नामदेव गाथेमध्ये येते. 'ज्ञानबोध' हा ग्रंथ तर निवृत्तीनाथ आणि मुक्ताबाई यांच्या नात्यावर वेगळेपणाने प्रकाश टाकणारा आहे.

              संत ज्ञानेश्वर आणि संत मुक्ताबाई--

     ज्ञानेश्वर आणि मुक्ताबाई यांच्यामध्ये गुरुबंधू-भगिनी असे नाते आहे. ज्ञानेश्वरांनी 'मुक्ताबाईस दिलेली सनद' या लहानशा प्रकरणग्रंथामध्ये त्याचे दर्शन घडते. या ग्रंथाचे स्वरूप असे आहे की, येथे मुक्ताबाईंनी ज्ञानेश्वरांना साधनेसंबंधी विविध प्रश्न विचारले आहेत. आणि त्यांची उत्तरे ज्ञानेश्वरांनी दिली आहेत. ज्ञानेश्वरांनी येथे मुक्ताबाईस गुरुप्रणित सोऽहम् साधनेसंबंधी मार्गदर्शन केले आहे. सोऽहम् संबंधी सखोल विवेचन झाल्यावर ज्ञानेश्वर मुक्ताबाईस म्हणतात, ''यापरता नाही उपदेश आता ।।'' ज्ञानेश्वरांना सोऽहम् साधनेसंबंधी जे ज्ञात होते ते सर्व त्यांनी मुक्ताबाईंना सांगितले असावे, असे वरील वाक्यावरून लक्षात येते. ज्ञानेश्वरांनी केलेल्या शंकानिरसनामुळे मुक्ताबाईंचेही समाधान झाले. तो सर्व भाग त्यांनी स्वतः आत्मसात केला, त्यातून त्यांची अवस्था बदलली. त्या उच्चदशेस जाऊन पोहोचल्या. त्यांच्यातील हा बदल ज्ञानेश्वरांच्याही लक्षात आला आणि त्यामुळे त्यांनी मुक्ताबाईंना निःशंक शब्दामध्ये एक प्रशस्तिपत्रही दिले - ते म्हणाले, ''आठवे समाधिचे अंग आले तुज । आता नाही काज आणिकांसी ।।''

                     संत सोपानदेव आणि संत मुक्ताबाई--

     या दोघांच्या नात्याचे अगदीच त्रुटित संदर्भ सापडतात. निवृत्ती आणि ज्ञानेश्वर कोरान्न मागायला जात असताना सोपानदेव आपला सांभाळ करीत असत, एवढाच उल्लेख मुक्ताबाई करताना आढळतात. अनाम अरुपाची माउली l आदिमाउली ll अशा शब्दांत सोपानदेव त्यांच्याविषयी गौरवोद्गार काढतात.

              संत नामदेव आणि संत मुक्ताबाई--

     मुक्ताबाईच्या निमित्ताने संत नामदेवांना सद्गुरूचे महत्त्व ज्ञात झाले आणि पुढे ते विसोबा खेचर यांना शरण गेले. मुक्ताबाई यांच्या योगसामर्थ्याची प्रचिती या प्रसंगाच्या निमित्ताने भावंडांना आली आणि मुक्ताबाई 'माय' या स्वरुपात सर्वांना वंदनीय झाली.

             विसोबा खेचर आणि संत मुक्ताबाई--

     मुक्ताबाई यांनी आपल्या योगसामर्थ्याच्या आधारावर श्री गोरक्षनाथ यांची भेट घेतली, त्या वेळी विसोबा खेचरही घटनास्थळी उपस्थित असावेत, असे संशोधनांती स्पष्ट होते. आणि त्याचाच संदर्भ 'मुक्ताईने बोध खेचरासी केला l तेणे नामयाला बोधियेले ll या वचनामध्ये येतो. निवृत्तीनाथांच्या पुढील वचनामध्येही तसा संदर्भ येतो, 'काढिला शोधून अनुभव मुक्ताईने l ...विसोबा खेचर सिद्ध झाला ll'

              योगीराज चांगदेव आणि संत मुक्ताबाई--

     सद्गुरू मुक्ताबाई आणि योगीराज चांगदेव हे शिष्योत्तम असे दोघांमधील नाते आहे. मुक्ताबाई ही आई आणि चांगदेव हे तान्हे बालक अशी कल्पना करून लिहिलेले मुक्ताबाईंचे अंगाईचे अभंग आहेत. चांगदेवासारख्या योग्याकडे मातेच्या वात्सल्याने पाहू शकणारी मुक्ताबाई यांची योग्यता कोणत्या पातळीची असेल, त्यांचा अधिकारही यातून सूचित होतो. मुक्ताबाई आणि चांगदेव यांच्यातील हृद्य नात्यावर प्रकाश टाकणारे हे अभंग आहेत.

--विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
------------------------------

                    (साभार आणि सौजन्य-संदर्भ-mr.विकिपीडिया.ऑर्ग)
                   ---------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-04.07.2023-मंगळवार.
=========================================