दिन-विशेष-लेख-अर्जेंटिनाचा स्वातंत्र्यदिन-A

Started by Atul Kaviraje, July 09, 2023, 09:17:03 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                  "दिन-विशेष-लेख"
                              "अर्जेंटिनाचा स्वातंत्र्यदिन"
                             -----------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-09.07.2023-रविवार आहे.  ९ जुलै-हा दिवस "अर्जेंटिनाचा स्वातंत्र्यदिन" म्हणूनही ओळखला जातो. वाचूया, तर या दिवसाचे महत्त्व, आजच्या या "दिन-विशेष-लेख" या शीर्षकI-अंतर्गत.

     अर्जेंटिना : (रिपब्‍लिकना आर्जेंतिना) : दक्षिण अमेरिका खंडाच्या दक्षिण भागातील पाचरीच्या आकाराचे प्रजासत्ताक राष्ट्र. अक्षांश २२० ते ५५० द. व रेखांश सु. ५४०२०' ते ७३० प. लोकसंख्या अंदाजे २,३५,३९,००० (१९७०). याच्या उत्तरेस बोलिव्हिया, ईशान्येस पॅराग्वाय, पूर्वेस ब्राझील, यूरग्वाय आणि अटलांटिक महासागर, दक्षिणेस अटलांटिक महासागर आणि पश्चिमेस चिली आहे. याची दक्षिणोत्तर लांबी सु. ३,६९४ किमी., जास्तीत जास्त रुंदी १,४९७ किमी. किनारा सु. २,६६५ किमी. असून क्षेत्रफळ २७,७७,८१५ चौ. किमी. म्हणजे साधारणतः मध्य प्रदेश वगळून भारताएवढे आहे.

     भूवर्णन : अर्जेंटिना हे नाव 'आजेंटम्' (चांदी) या लॅटिन शब्दावरून पडले आहे. येथील मुख्य नदीचे नाव 'प्लाता' (स्पॅनिश–चांदी) असेच आहे. स्पॅनिश लोकांना येथे जे मूळ रहिवासी प्रथम भेटले त्यांच्या कानांत चांदीचे दागिने होते त्यामुळे या देशात खूप चांदी असावी या भावनेने त्यांनी या देशास हे नाव दिले असा समज आहे. परंतु बोलिव्हियातील चांदीचा व्यापार या नदीकाठावरील लोकांतर्फे होत असल्यानेही ही नावे रूढ झाली असण्याचा संभव आहे. योगायोग असा, की या देशात चांदी मुळीच सापडत नाही.

     भूरचनेच्या दृष्टीने अर्जेंटिनाचे चार भाग पडतात : (१) अँडीज पर्वतातील डोंगराळ प्रदेश, (२) पॅटागोनिया, (३) पँपास आणि (४) उत्तरेकडील उष्णकटिबंधीय प्रदेश.

     अँडीज पर्वताने अर्जेंटिनाचा सु. ३० टक्के भाग व्यापला आहे. त्यात अनेक हिमाच्छादित सुप्त ज्वालामुखी आहेत. यातील शिखरांपैकी एकविसांची उंची ६,२०० मी. पेक्षा अधिक असून त्यात ७,०३५ मी. उंचीचे ॲकन्काग्वा हे पश्चिम गोलार्धातील सर्वोच्च शिखर आहे. मेर्सेदार्यो हे शिखर ६,७७० मी. उंच आहे.

     अँडीजच्या पूर्व बाजूस उत्तरेकडे रीओ नेग्रो नदीपासून दक्षिणेस थेट मॅग‌ेलनच्या सामुद्रधुनीपर्यंत अर्जेंटिनाच्या दक्षिण भागास 'पॅटागोनिया' म्हणतात. या भागात प्रथम आलेले गोरे लोक येथील मूळ रहिवाशांस 'पॅटॅगोनिस' –मोठ्या पायांचे–असे म्हणत, त्यावरून हे नाव पडले. हा प्रदेश किनाऱ्‍यावरील अरुंद मैदानापासून पायरीपायरीने उंचावत व रुंदावत जातो. याची उंची सु. १०० ते १,५०० मीटरपर्यंत वाढत जाते. या पठारी प्रदेशातून वाहणाऱ्‍या नद्यांनी खोल घळ्या तयार केल्या आहेत. या भागात स्थायिक झालेल्या लोकांत ब्रिटिश बेटांमधून आलेले बरेच लोक होते. त्यांनी आणि त्यांच्या वंशजांनी आपला परंपरागत मेंढपाळीचा धंदा येथेही सुरू करून अर्जेंटिनाचे जीवन समृद्ध केले. आज मेंढ्यांचे मांस व लोकर यांबद्दल पॅटागोनिया जगप्रसिद्ध आहे. कोरडी हवा व मुरमाड रूक्ष जमीन असलेल्या या प्रदेशात दोन कोटींहून अधिक मेंढ्या आहेत. अर्जेंटिनातील तेलसाठेही येथेच आहेत.

     'पँपास' या मूळ इंडियन शब्दाचा अर्थ 'अवकाश' किंवा 'सपाटी' असा आहे. हे विस्तीर्ण तृणक्षेत्र अर्जेंटिनाच्या समृद्धीचा गाभाच होय. याची काळी सुपीक माती २ ते ३·५ मी. खोल असून तिच्यात दगडगोटे सापडत नाहीत. तिच्यात खते क्वचितच घालावी लागतात. अर्जेंटिनातील ८० टक्के लोक पँपासमध्ये राहतात आणि येथील पशुधन चार कोटींवर आहे. प्लाता नदीपासून ब्वेनस एअरीझला लागून हे तृणक्षेत्र अँडीज पर्वतापर्यंत अर्धवर्तुळाकार पसरले आहे. याचा विस्तार ५·१८ लक्ष चौ. किमी. असून तो देशाच्या एकपंचमांशाइतका आहे. अर्जेंटिनाच्या पशुधनाचा व शेतमालाचा तीन-चतुर्थांश हिस्सा पँपासमधून येतो.

     उत्तरेकडील उष्णकटिबंधीय प्रदेशात अँडीज पर्वत व पाराना नदी यांमधील सखल भाग मोडतो. तो वर्षावने व दलदली यांनी व्यापलेला असून मनुष्यवस्तीस प्रतिकूल आहे.

     अर्जेंटिनात तेल सोडल्यास खनिजे कमी आहेत. शिसे, जस्त, कथील व मँगॅनीज जेमतेम गरजेपुरते निघते. पुरेसा कोळसा आहे व लोखंड बरेच असावे असा अंदाज आहे. पण यांचे उत्पादन अपुरे आहे.

     पाराना (स्पॅनिश भाषेत जलपिता) ही अर्जेंटिनातील सर्वांत मोठी नदी असून ती ४,१८४ किमी. लांबीची आहे. ला प्लाताला मिळण्यापूर्वी १९३ किमी. पर्यंत तिला बरेच फाटे फुटतात व ते पुन्हा एकत्र होतात. यामुळे हिच्या काठावर व प्रवाहात जलोढांची सुपीक मैदाने, बेटे आणि दलदलीचे प्रदेश तयार झाले आहेत. या प्रशस्त प्रदेशात विविध फळझाडे व मालपेट्यांस आणि पिंपांस उपयुक्त लाकडाची झाडे भरपूर आहेत. हिला मिळणाऱ्‍या नद्यांत पॅराग्वाय ही सर्वांत मोठी असून काही अंतरापर्यंत अर्जेंटिना व पॅराग्वायमधील ती सीमारेषा आहे. ला प्लातास मिळणारी यूरग्वायही अशीच अर्जेंटिना आणि ब्राझील व यूरग्वायमधील सीमारेषा आहे. ही ज्या ठिकाणी ला प्लातास मिळते तेथे तिचे मुख तेरा किमी. रुंद आहे.

--शहाणे, मो. ज्ञा.
---------------

                    (साभार आणि सौजन्य-संदर्भ-विश्वकोश.मराठी.गोव.इन)
                   ------------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-09.07.2023-रविवार.
=========================================