दिन-विशेष-लेख-अर्जेंटिनाचा स्वातंत्र्यदिन-B

Started by Atul Kaviraje, July 09, 2023, 09:18:37 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                  "दिन-विशेष-लेख"
                              "अर्जेंटिनाचा स्वातंत्र्यदिन"
                             -----------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-09.07.2023-रविवार आहे.  ९ जुलै-हा दिवस "अर्जेंटिनाचा स्वातंत्र्यदिन" म्हणूनही ओळखला जातो. वाचूया, तर या दिवसाचे महत्त्व, आजच्या या "दिन-विशेष-लेख" या शीर्षकI-अंतर्गत.

     रीओ द ला प्लाता (रौप्यसरिता) किंवा प्लेट ही वस्तुतः नदी नसून पाराना व यूरग्वाय यांची संयुक्त नदीमुखखाडी आहे. हिने एकूण ३०,००० चौ. किमी. पेक्षा अधिक क्षेत्र व्यापले असून, मुखाजवळ हिची रुंदी २४० किमी. आहे. हिच्या दक्षिण तीरावर अर्जेंटिनाची राजधानी ब्वेनस एअरीझ व उत्तर तीरावर यूरग्वायची राजधानी माँटेव्हिडिओ आहे. अर्जेंटिनातील मोठमोठ्या नद्या पश्चिमेकडे अँडीज पर्वतात किंवा उत्तरेकडे अरण्यात उगम पावून अटलांटिक महासागरास मिळतात. त्या मुखापासून १६०० किमी. पेक्षा अधिक अंतरापर्यंत जलवाहतुकीस उपयोगी पडतात.

     अर्जेंटिनाच्या पश्चिम व मध्य भागातही देल व्हाये, दुल्से (गोड), प्रिमेरो (पहिली), सेंगुदो (दुसरी), तर्सेरो (तिसरी), क्वार्तो (चवथी) व किंतो (पाचवी) वगैरे नद्या आहेत. यांतील बहुतेक निरनिराळ्या सरोवरांस जाऊन मिळतात.

     ब्वेनस एअरीझ, पँपास, कॉर्दोव्हा या प्रांतांत व पॅटागोनियात लहानमोठी सरोवरे आहेत. काही खाऱ्‍या पाण्याची आहेत, तर काहींना वितळणाऱ्या बर्फाचे पाणी मिळते.

     देशाच्या विस्तारामुळे हवामानाचे अनेक प्रकार दिसून येतात. जानेवारी हा सर्वात उष्ण महिना. जून, जुलै हे सर्वांत थंड महिने असतात. उत्तरेकडे चाको भागात उन्हाळ्यात अतिशय उष्णता (४८·९० से. पर्यंत) तर दक्षिणेस पॅटागोनियाच्या दक्षिण भागात हिवाळ्यात तीव्र थंडी (-१६·१० से. पर्यंत) आढळते. तथापि उत्तरेकडे हवामान विषम (सरासरी १३·३० ते ४३·३० से.) आणि दक्षिणेस समुद्रसान्निध्यामुळे बरेच सम (सरासरी ०·७० ते ९·६० सें.) असते. पँपास भागात हवामान सौम्य व समशीतोष्ण असते. दक्षिण ध्रुवाकडून येणारे थंड वारे पॅसिफिकवरून येताना आर्द्र होतात. अँडीजच्या पश्चिम भागावर त्यामुळे भरपूर पाऊस पडतो परंतु अँडीजच्या पूर्वेकडे अर्जेंटिनामध्ये हे 'चिनुक' अथवा 'फॉन' प्रमाणे कोरडे व काहीसे ऊबदार होऊन वाहू लागतात. यांना येथे 'झोंडा' म्हणतात. अँडीजमध्ये असलेल्या काही खिंडींतून व दऱ्याखोऱ्‍यांतून थोडे आर्द्र वारे अर्जेंटिनात पोहोचतात त्यामुळे तेथे काही ठिकाणी पाऊस पडतो. दक्षिण ध्रुवाकडून अर्जेंटिनात सरळ येणाऱ्या थंड वाऱ्यांना तेथे 'पँपेरो' म्हणतात. त्यांची उत्तरेकडून वाहणाऱ्‍या 'नार्टे' या ऊबदार वाऱ्‍यांशी गाठ पडून आवर्त उत्पन्न होतात त्यामुळे अर्जेंटिनाच्या ईशान्य भागात सुमारे ५०–१०० सेंमी. पाऊस पडतो. परंतु हे आवर्त फॉकलंडच्या थंड समुद्रप्रवाहावरून दक्षिणेकडील पॅटागोनियामध्ये शिरत असल्याने तेथे थंड, बोचणारे व कोरडे वारे वाहतात. बाईआ व्हूलांकापासून वायव्येकडे जाणाऱ्‍या रेषेच्या पूर्वेस पावसाचे प्रमाण अधिक (७५ सेमी. पर्यंत) आहे, तर पश्चिमेस कमी (५ सेंमी. पर्यंत) आहे.

     उत्तर अर्जेंटिनातील जंगलात व दलदलीत पुष्कळ प्राणी आढळतात. जग्वार, प्यूमा, विविध रानमांजरे, कोल्हे, कॅपिबारा, आर्माडिलो, भीमकाय मुंगीखाऊ वगैरे उल्लेखनीय आहेत. गवताळ प्रदेशात अनेक प्रकारचे कृंतक, रिया, ऑटर, वीझल, ऑपॉसम इ. प्राणी आणि विविध सरीसृप आढळतात. येथे पक्ष्यांच्या पुष्कळ जाती असून शहामृग व टिनॅमो हे त्यांपैकी प्रमुख होत. अर्जेंटिनाच्या नद्यांत विविध प्रकारचे मासे भरपूर सापडतात. स्पेनमधून आणलेली गुरे येथे चांगली वाढली व त्यांतील काही निसटून जाऊन रानटी बनली. अर्जेंटिनामध्ये जगातील वनस्पतींच्या १० टक्के जाती मिळतात. उत्तरेकडे लोहमार्गाला उपयुक्त असलेले टणक लाकडाचे वृक्ष आहेत. क्वेब्राचोपासून टॅनिन मिळते. ईशान्येकडे होणाऱ्‍या येर्बामातेपासून चहासारखे राष्ट्रीय पेय बनवितात. पॅटागोनियात सायप्रस, पाईन, लार्च, ओक, बीच इ. वृक्ष आढळतात. पँपासचे गवत हे अर्जेंटिनाचे जीवन असून तेथे आढळणारा 'ऑम्बु' हा छायावृक्ष राष्ट्रीय वृक्ष मानतात.

--शहाणे, मो. ज्ञा.
---------------

                    (साभार आणि सौजन्य-संदर्भ-विश्वकोश.मराठी.गोव.इन)
                   ------------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-09.07.2023-रविवार.
=========================================