दिन-विशेष-लेख-अर्जेंटिनाचा स्वातंत्र्यदिन-C

Started by Atul Kaviraje, July 09, 2023, 09:20:10 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                  "दिन-विशेष-लेख"
                              "अर्जेंटिनाचा स्वातंत्र्यदिन"
                             -----------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-09.07.2023-रविवार आहे.  ९ जुलै-हा दिवस "अर्जेंटिनाचा स्वातंत्र्यदिन" म्हणूनही ओळखला जातो. वाचूया, तर या दिवसाचे महत्त्व, आजच्या या "दिन-विशेष-लेख" या शीर्षकI-अंतर्गत.

     इतिहास : अर्जेंटिनाच्या प्राचीन इतिहासाविषयी फारशी माहिती ज्ञात नाही. तेथे पूर्वी इंडियन लोक राहत होते. अमेरिकन इंडियन लोक २०,००० वर्षांपूर्वी आशियातून आले असावेत, असे विद्वानांचे मत आहे. १५ व्या शतकात अर्जेंटिनात निरनिराळ्या जमातींचे व भिन्नभाषी सुमारे तीन लाख इंडियन लोक राहत होते. त्यांच्यावर इंका साम्राज्याचे वर्चस्व असावे असे दिसते कारण त्यांच्यापैकी बरेच लोक क्वेचुआ ही इंकाची भाषा बोलत होते. लोक शिकार, पशुपालन व काही प्रमाणात शेती ह्यांवर राहत असावेत.

     व्हेसपूची ह्याने १५०१-०२ च्या सुमारास रीओ द ला प्लाताचा शोध लावला आणि स्पॅनिश खलाशांना त्याच्यामुळेच स्फूर्ती मिळाली, असे काही मानतात. वान दीआय दे सोलीस ह्या स्पॅनिश खलाशाने १५१६ मध्ये अर्जेंटिनात प्रथम प्रवेश केला. पण त्यास तेथील इंडियन लोकांनी ठार मारले. त्यानंतर १५२६ च्या सुमारास सिबॅश्चन कॅबट व द्येगो गारसीआ हे तेथे गेले. पण त्या दोघांत मतभेद झाल्यामुळे ते स्पेनला परतले. पुढे पेद्रो दे मेनदोसाच्या नेतृत्वाखाली स्पेनने तेथे वसाहत स्थापण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. अखेर मारतीनेस दोमींग्गो इरालाने ला प्लाता भागात घुसून १५३९ मध्ये आसूनस्यॉन हे गाव वसविले. हे येथील पहिले स्पॅनिश शहर होय. पुढे व्हान दे गाराई याने पॅराग्वाय नदीवर १५७३ मध्ये सांता फे हे बंदर आणि १५८० त ब्वेनस एअरीझ हे शहर वसविले. येथून स्पेनच्या वसाहतींची झपाट्याने वाढ झाली. सर्व वसाहतींवर आसूनस्यॉनचे वर्चस्व व पेरू येथील राज्यप्रतिनिधींचा ताबा असे. वसाहतींना स्पेनचे व्यापारी कायदे लागू असत. त्यामुळे वसाहतींची फारशी प्रगती झाली नाही. मात्र ब्रिटन व पोर्तुगाल यांचा चोरटा व्यापार वाढला. त्यास पायबंद घालण्यासाठी स्पेनने १७७६ मध्ये ला प्लाता हा स्वतंत्र प्रांत निर्माण करून त्यावर राज्यपालाची नेमणूक केली. त्यात त्या वेळी आजचे अर्जेंटिना, पॅराग्वाय, यूरग्वाय व बोलिव्हियाचा काही भाग हे प्रदेश अंतर्भूत होते. त्यांची राजधानी ब्वेनस एअरीझ केली. ब्रिटिशांनी १८०६-०७ मध्ये केलेले हल्ले ब्वेनस एअरीझच्या नागरिकांनी धैर्याने परतविले. त्यामुळे त्यांचे आत्मबळ व स्वातंत्र्यलालसा जागृत झाली. २५ मे १८१० ला एक नागरिक-समिती (जंटा) स्थापन झाली. तिने नेपोलियनने पदच्युत केलेला स्पेनचा राजा फर्डिनँड याच्या नावे राज्य करण्याचे ठरविले. हा दिवस आजही स्वातंत्र्यदिन म्हणून पाळण्यात येतो. थोर स्वातंत्र्यवीर होसे दे सान मार्तीन ह्याच्या नेतृत्वाखाली तूकूमानमध्ये नागरिक-मंडळाने क्रांती करून ला प्लाता प्रांताचे स्वातंत्र्य ९ जुलै १८१६ रोजी घोषित केले. त्यामुळे स्पेनची या प्रांतावरील सत्ता संपुष्टात आली. ला प्लाता भागाचे पॅराग्वाय, यूरग्वाय, अर्जेंटिना व बोलिव्हिया हे चार स्वतंत्र देश झाले. मात्र अर्जेंटिनात अंतर्गत यादवी सुरू झाली.

     बेर्नारदीनो रीव्हादाव्ह्या हा १८२६ मध्ये अर्जेंटिनाचा राष्ट्रपती झाला. तोच पहिला तसेच पुरोगामी राष्ट्रपती होय. त्याने अनेक कायदे करून सुधारणा केल्या. पण त्यास अंतर्गत कलहामुळे राजीनामा द्यावा लागला. १८२९–५२ दरम्यान व्हान मॅन्वेल द रोसास हा राष्ट्रपती झाला. तो हुकूमशहा होता. त्याला हूस्तो होसे दे ऊरकीसा या त्याच्याच अनुयायाने पदच्युत करून हद्दपार केले, तेव्हा पूर्वी रोसासने हद्दपार केलेले आलबेर्दी, मीत्रे, सारम्येंतो यांसारखे देशभक्त मायदेशी परतले. त्यांच्या साहाय्याने ऊरकीसाने १८५३ साली संविधान तयार केले. तथापि त्याला मान्यता मिळण्यास दहा वर्षे लागली. हे अर्जेंटिना गणराज्याचे पहिले लोकशाही संविधान होय. पुढे जनरल मीत्रेच्या कारकिर्दीत (१८६२–६८) अर्जेंटिनाने खूप प्रगती केली. त्याच्या नंतरचा राष्ट्रपती सारम्येंतो पुरोगामी व देशभक्त होता. त्याने शिक्षणाचा पाया घातला. मात्र यानंतर १९१२ पर्यंत अर्जेंटिनाचा इतिहास भ्रष्टाचार, उधळपट्टी व अंतर्गत कलह यांनी भरला होता. तथापि याही काळात शेती, उद्योगधंदे यांत वाढ होऊन लोहमार्गांचे जाळे देशभर पसरले. १९१२ मध्ये रोके पेन्ना ह्या राष्ट्रपतीने गुप्त-मतदान-पद्धती कायदा करून तो अमलात आणला. यामुळे इपोलितो ईरिगोयेन हा जहाल उदारमतवादी १९१६ मध्ये राष्ट्रपती झाला. पहिल्या महायुद्धकालात तो तटस्थ होता. त्याने सामाजिक व शैक्षणिक सुधारणा केल्या. मध्यंतरी १९२२–२८ दरम्यान त्याचा सहकारी राष्ट्रपती झाला. नंतर पुन्हा ईरिगोयेन निवडून आला. परंतु आपल्या अखेरच्या दिवसांत लहरी स्वभाव व वृद्धत्व यांमुळे त्यास तत्कालीन जागतिक मंदीस तोंड देणे अशक्य होऊन लष्करी क्रांती उद्भवली आणि लष्करी अंमलाखाली नियंत्रित लोकशाही व श्रीमंत शेतमालक ह्यांचे युग सुरू झाले.

--शहाणे, मो. ज्ञा.
---------------

                    (साभार आणि सौजन्य-संदर्भ-विश्वकोश.मराठी.गोव.इन)
                   ------------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-09.07.2023-रविवार.
=========================================