दिन-विशेष-लेख-अर्जेंटिनाचा स्वातंत्र्यदिन-D-A

Started by Atul Kaviraje, July 09, 2023, 09:22:26 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                  "दिन-विशेष-लेख"
                              "अर्जेंटिनाचा स्वातंत्र्यदिन"
                             -----------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-09.07.2023-रविवार आहे.  ९ जुलै-हा दिवस "अर्जेंटिनाचा स्वातंत्र्यदिन" म्हणूनही ओळखला जातो. वाचूया, तर या दिवसाचे महत्त्व, आजच्या या "दिन-विशेष-लेख" या शीर्षकI-अंतर्गत.

     १९३२ पासून अर्जेंटिनातील घडामोडींवर यूरोपमधील फॅसिझम व नाझीवाद यांचा परिणाम झाला. जर्मनीच्या हेरांचे जाळे देशभर पसरले. पेरॉनसारखे लष्करी अधिकारी त्यात गोवले गेले. हूस्तो, रॉबेर्तो, कास्तीयो, रॉसन व रामिरेस ह्यांच्यानंतर राष्ट्रपती झालेल्या फॉरेलने १९४५ साली जर्मनीविरुद्ध युद्ध पुकारले. यामुळे त्यास 'पॅन अमेरिका' संघात आणि संयुक्त राष्ट्रांत प्रवेश मिळाला. पण युद्धाच्या काळात पेरॉनसारख्या लष्करी नेत्याचा उदय झाला. आपण मजुरांचे त्राते आहोत असा दावा करून १९४६ मध्ये तो राष्ट्रपती म्हणून निवडून आला. त्याने झपाट्याने कामगार व शेतमजूर यांसाठी कायदे करून पंचवार्षिक योजनांद्वारे शेतीस व औद्योगिकीकरणास उत्तेजन दिले. काही धंद्यांचे राष्ट्रीयीकरण केले. पण या सुधारणा करताना त्याने मतस्वातंत्र्य, संघटनास्वातंत्र्य, इ. लोकशाही तत्त्वांची गळचेपी केली न्यायालये, वृत्तपत्रे, शिक्षण-संस्था इत्यादींवर नियंत्रणे घातली धर्मगुरुंचे पाठबळ मिळावे म्हणून शाळांतून धर्मशिक्षण सक्तीचे केले. त्यातच लोकमानसावर विलक्षण पकड असलेली त्याची पत्‍नी ईव्हा वारली. ह्यामुळे प्रथम लोकप्रिय झालेला पेरॉन लोकमानसातून उतरला. त्यातच मजूरसंघटनेबद्दल धर्मगुरू व पेरॉन ह्यांत १९५५ साली मतभेद झाले. त्याच वर्षी जूनमध्ये आरमारी बंड झाले. लष्कराने सर्व सत्ता हाती घेतली. अखेर पेरॉनने ९ सप्टेंबर १९५५ ला पदत्याग करून अर्जेंटिना सोडला. त्यानंतर जनरल लोनार्डी अधिकारावर आला पण त्यास दूर करून आरांबुरू हा सेनापती राष्ट्रपती झाला.

     पेरॉन हद्दपार झाला, परंतु त्याचे विचार, त्याने स्त्रिया व श्रमिक वर्गाकरिता केलेले कायदे यांची पकड कायम राहिली आणि लष्कराने पुन्हा मुलकी शासन सुरू करण्याकरिता निवडणुका घेतल्या तेव्हा रॅडिकल पक्षाचा जहाल उमेदवार आर्तूरो फ्राँडीसी हा पेरॉन-अनुयायांच्या साहाय्याने निवडून आला (फेब्रु. १९५८). पेरॉन-पक्षास मतबंदी होती परंतु त्यांचे बळ संसदेतही उपेक्षणीय नव्हते. त्यामुळे नोब्हेंबर १९५८ मध्ये आणीबाणी जाहीर करून त्यांच्या चळवळीस आळा घालावा लागला. बऱ्‍याच प्रांतांमध्येही केंद्रसत्ता स्थापित करावी लागली, कारण तेथे पेरॉन-भक्तांची सत्ता होती परंतु फ्राँडीसी हा त्यांच्याच मतांनी राष्ट्राध्यक्ष झाला हे सैन्याधिकारी विसरू शकले नाहीत आणि त्यांच्या मर्जीप्रमाणे अनेक मंत्रिबदल करूनही २९ मार्च १९६२ ला त्याच्या विरुद्ध बंड होऊन सिनेटचा अध्यक्ष गुइदो यास राष्ट्रपती केले गेले. त्याने झालेल्या निवडणुका रद्द ठरवल्या. तरीही त्यास दोन कट्टर नाफेरवादी बंडे दडपावी लागली (सप्टेंबर १९६२ व एप्रिल १९६३). १९ जुलै १९६३ ला डॉ. इलिया हा सर्वांत कमी नावडता म्हणून निवडून आला. सैन्याधिकाऱ्यांशी होणाऱ्‍या कटकटी व आर्थिक मंदी यांनी तो बेजार झाला. शेवटी २८ जून १९६६ ला एका लष्करी गटाने त्यास पदच्युत केले आणि जनरल ओंगानिया वान कार्लोसच्या नेतृत्वाखाली पुन्हा लष्करी हुकूमशाही स्थापन झाली. ओंगानियाने सर्वोच्च न्यायालय बंद केले. सर्व राज्यपाल पदच्युत करून विधिमंडळे बरखास्त केली. राजकीय पक्षांवर बंदी घालून त्यांची मालमत्ता जप्त केली. विद्यापीठे ताब्यात घेतली. मात्र कॅथलिक चर्चशी तडजोड करून फ्राँडीसी व इलिया यांनी हिरावलेल्या त्यांच्या सांस्कृतिक, शैक्षणिक व धार्मिक सवलती त्यांस परत दिल्या. जून १९७० मध्ये ओंगानियाला पदच्युत करून रॉबेर्तो लिव्हिंग्स्टन याला जनरल लानुसे याच्या नेतृत्वाखाली सैनिक गटाने राष्ट्राध्यक्ष केले परंतु मार्च १९७१ मध्ये लिव्हिंग्स्टनही पदच्युत होऊन सैनिकगटाने कारभार हाती घेतला. सप्टेंबर १९७३ च्या निवडणुकीने पेरॉनची अध्यक्ष म्हणून व त्याची पत्नी इझाबेला हिची उपाध्यक्ष म्हणून निवड झाली. १ जुलै १९७४ रोजी पेरॉन वारल्यामुळे इझाबेला अध्यक्ष झाली. अतएव काही अपवादात्मक काळ सो़डल्यास हा समृद्ध देश स्वातंत्र्यापासून बहुतांशी हुकूमशहांच्याच हाती राहिला आहे. १९३० ते १९५८ पर्यंत जे दहा राष्ट्रपती झाले त्यांतील आठ सैन्यप्रमुख होते.

--शहाणे, मो. ज्ञा.
---------------

                   (साभार आणि सौजन्य-संदर्भ-विश्वकोश.मराठी.गोव.इन)
                  ------------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-09.07.2023-रविवार.
=========================================