दिन-विशेष-लेख-अर्जेंटिनाचा स्वातंत्र्यदिन-G

Started by Atul Kaviraje, July 09, 2023, 09:29:49 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                  "दिन-विशेष-लेख"
                              "अर्जेंटिनाचा स्वातंत्र्यदिन"
                             -----------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-09.07.2023-रविवार आहे.  ९ जुलै-हा दिवस "अर्जेंटिनाचा स्वातंत्र्यदिन" म्हणूनही ओळखला जातो. वाचूया, तर या दिवसाचे महत्त्व, आजच्या या "दिन-विशेष-लेख" या शीर्षकI-अंतर्गत.

     सर्व अर्जेंटिनात लोकवस्तीचे प्रमाण दर चौ. किमी. ला ८·३ पडते. ब्वेनस एअरीझ शहर (लोकसंख्या ३३ लक्ष–१९६६) व त्याची उपनगरे यांमध्ये अर्जेंटिनाचे एकतृतीयांश लोक (७१ लाख) गर्दी करून आहेत.

     बहुतेक सर्व लोक यूरोपीय वंशाचे आहेत. अर्जेंटिनात यूरोपीयांना भटके व मागासलेले लोक आढळले त्यांस नष्ट करण्यास वेळ लागला नाही. आता फारच थोडे इंडियन राहिले आहेत. स्पॅनिश व इंडियन यांमध्ये मिश्रणही कमी झाल्याने या देशात मेस्तिसो (मिश्रवंशीय) दोन टक्के असतील व तेही अँडीज पर्वताच्या पायथ्याकडील प्रदेशात केंद्रित आहेत. लॅटिन अमेरिकेतील हा 'गोऱ्‍यांतला गोरा' देश होय. येथील अफाट शेतीवर, विशेषतः पशुसंवर्धनाकरिता, मेस्तिसो व गरीब आप्रवासी यांची भरती करण्यात आली. वर आकाश व खाली अमर्याद सपाट जमीन, वाहनास घोडा, झोपण्यास तेच खोगीर व जीन, खाण्यास गोमांस व पिण्यास लालभडक कच्ची दारू अशा परिस्थितीत अर्जेंटिनाचा विख्यात 'गाउचो' हा वर्ग निर्माण झाला. याचे जीवन व त्याबद्दलच्या काव्यकथा अर्जेंटिनाच्या संस्कृतीचे अविभाज्य अंग झाली आहेत.

     आज मेस्तिसो कमी असले, तरी १९ व्या शतकाच्या मध्यापर्यंतच्या अल्प लोकसंख्येत त्यांचे प्रमाण मोठे होते. ते कमी करण्याचा बुद्धिपुरस्सर प्रयत्‍न करण्यात आला. त्या सुमारास सारम्येंतो या पुढाऱ्‍याने आडदांड गाउचो व मेस्तिसो यांचा अर्जेंटिनाच्या सांस्कृतिक जीवनावरील प्रभाव कमी करून शुद्ध यूरोपीयांचे वर्चस्व स्थापण्यानेच देशाचे भवितव्य आशामय होण्याचा संभव आहे, असा सिद्धांत मांडला व त्याकरिता यूरोपीय आप्रवाशांची भरती करावी असे सुचविले. त्यास आलबेर्दी व मीत्रे यांचा पाठिंबा मिळाला. हे तिघेही राष्ट्रपती झाले व त्यांनी अनेक प्रलोभने देऊन हजारो यूरोपीय देशात आणले. या धोरणाने पन्नास वर्षांत अर्जेंटिनाचे सामाजिक स्वरूप आमूलाग्र बदलले. १८५२ मध्ये गोऱ्‍यांचे प्रमाण २·७५% होते ते १९४७ मध्ये ८९% झाले. लोकसंख्येत बुद्धया केलेल्या या फरकामुळे अर्जेंटिनात वांशिक यादवी नाही, तथापि यूरोपीयांमध्ये मुख्यत्वे इटालियन, स्पॅनिश, फ्रेंच व त्यानंतर अनुक्रमे इंग्रज, जर्मन, स्विस, ऑस्ट्रियन, पोल, स्कँडिनेव्हियन, स्लाव्ह इ. लोक असल्याने त्यांचे स्वाभाविक गट पडलेले आहेतच आणि सामाजिक व राजकीय जीवनावर त्याचा परिणाम दिसतो. उदा., इटालियन बहुसंख्य असल्याने देशाच्या जीवनाच्या आविष्कारात इटालियन नावे प्रामुख्याने दिसतात. अर्जेंटिनाचा हुकूमशहा पेरॉन हा इटालियनवंशीयच होता.

     तथापि निरनिराळे वांशिक, भाषिक व सांस्कृतिक संस्कार घेऊन येणाऱ्‍या या लोकांवर स्पॅनिश भाषा व अर्जेंटिनाची विशिष्ट संस्कृती यांचा ठसा उमटून एक नवा समाज या देशात उदयास आला आहे.

     कॅथलिक धर्म हा राजधर्म आहे, पण इतर धर्मास व पंथांस आचारस्वातंत्र्य आहे. कॅथलिक धर्मपीठाच्या बाबतीत राष्ट्रपतीस विशेषाधिकार हे देशाचे वैशिष्ट्य आहे. बिशपच्या दर्जाच्या धर्मगुरूंची नेमणूक सिनेटच्या सल्ल्याने राष्ट्रपती करतो आणि पोपचे धार्मिक आदेश त्याची संमती मिळाल्यावरच देशात कार्यान्वित होऊ शकतात. अर्जेंटिनातील कॅथलिक धर्मशासनाचे काही मुख्याधिकारी राष्ट्रपतीच्या यादीतूनच पोपला निवडावे लागतात. बहुसंख्य (सु. ९५%) लोक कॅथलिक असल्याने त्यांचे सण व उत्सव देशभर उत्साहाने पाळले जातात. तसेच इटलीप्रमाणेच या देशातही ठिकठिकाणी अनेक देवदेवतांची लहान-मोठी मंदिरे आढळतात.

--शहाणे, मो. ज्ञा.
---------------

                    (साभार आणि सौजन्य-संदर्भ-विश्वकोश.मराठी.गोव.इन)
                   ------------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-09.07.2023-रविवार.
=========================================