दिन-विशेष-लेख-अर्जेंटिनाचा स्वातंत्र्यदिन-H

Started by Atul Kaviraje, July 09, 2023, 09:31:56 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                     "दिन-विशेष-लेख"                             
                                 "अर्जेंटिनाचा स्वातंत्र्यदिन"
                                -----------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-09.07.2023-रविवार आहे.  ९ जुलै-हा दिवस "अर्जेंटिनाचा स्वातंत्र्यदिन" म्हणूनही ओळखला जातो. वाचूया, तर या दिवसाचे महत्त्व, आजच्या या "दिन-विशेष-लेख" या शीर्षकI-अंतर्गत.

     अर्जेंटिनातील दर माणशी मांसभक्षणाचे प्रमाण साऱ्या जगात अत्युच्च आहे. तसेच लाल मद्य हे सामान्यांचे पेय आहे. सर्वसाधारणतः लोक निरोगी, आनंदी व उत्सवप्रिय आहेत. नृत्यगायनाचा शोक सार्वत्रिक आहे. स्पॅनिश व गाउचो यांच्या नृत्याच्या मनोहर मिश्रणाने विशिष्ट लोकनृत्यप्रकार निर्माण झाले आहेत.

     कौटुंबिक जीवन पुष्कळसे भारतीय धर्तीचे वाटते. मोठी कुटुंबे, वडीलधाऱ्‍‌यांचा आदर व अधिकार, सार्वजनिक रीत्या गौण पण कौटुंबिक अधिकार मोठा असे स्त्रियांचे स्थान, ही त्यांची वैशिष्ट्ये आहेत. ईव्हा पेरॉनमुळे स्त्रिया सार्वजनिक जीवनातही पुरुषांच्या बरोबरीने पुढे येऊ लागल्या. या देशात औरस व अनौरस संततीत कायद्याने फरक नाही.

     अर्जेंटिनातील आरोग्यव्यवस्था लॅटिन अमेरिकेत उत्तम समजली जाते. देवी, मलेरिया व घटसर्प यांचे जवळजवळ निर्मूलन झाले आहे. क्षय व कुष्ठरोग यांचे प्रमाण खूपच कमी झाले आहे. सामाजिक सुरक्षायोजनांचे प्रमाणही मोठे असून अनाथ, अपंग व वृद्धांना मदत, बेकारांना भत्ता, नुकसानभरपाई, प्रसूती, आरोग्यविमा इ. सवलती आहेत.

     भाषा व साहित्य: अर्जेंटिनाची भाषा स्पॅनिश आहे परंतु इटालियन संख्याधिक्यामुळे त्यांच्या भाषेचा व उच्चारांचा प्रभाव पडून ती इतरांपेक्षा थोडी निराळी झाली आहे. मेक्सिको शहराबरोबरीने ब्वेनस एअरीझ हे प्रकाशनात अग्रेसर असून तेथील ग्रंथ सर्व लॅटिन अमेरिकेत जातात. ला प्रेन्सा (खप सु. २६ लाखांवर), ला नासिऑ (सु. २·९ लाख) वक्लारिन (सु. ३·४३ लाख) ही वृत्तपत्रे जगन्मान्य आहेत. राजधानीतील राष्ट्रीय ग्रंथालयात पाच लाख ग्रंथ व दहा हजार हस्तलिखिते आहेत.

     एचेव्हेर्रीआ (१८०५–५१), ल्‌गोनेस लेओपोल्दो (१८७४–१९३८), बोर्जेस (१८८९ –   ), व्हिक्टोरिया ओकांपो, मीत्रे (१८२९–१९०६), सारम्येंतो (१८११–१८८८), अर्नांदेझ (१८३४–८६), रॉमेरो (१८९१–    ), माएआ (१९०३–     ) हे लेखक व कवी उल्लेखनीय आहेत. सावेद्रा लामास (शांती, १९३६) व आउसाय (वैद्यक, १९४७) हे नोबेल पारितोषिकांचे मानकरी अर्जेंटिनाचे नागरिक होत. रवींद्रनाथ टागोरांचे वाङ्मय एके काळी अर्जेंटिनात फार लोकप्रिय होते.

     शिक्षण : दक्षिण अमेरिकेत अर्जेंटिनातील विद्यार्थी व शिक्षक यांचे प्रमाण अत्युच्च आहे व साक्षरता ९० टक्के आहे. सर्व शिक्षण मातृभाषेतून आहे व त्या खंडात उत्कृष्ट म्हणून प्रसिद्ध आहे. प्राथमिक शिक्षण ६ ते १४ वयापर्यंत सक्तीचे व मोफत असून १९६३ मध्ये त्यात ९० टक्के, दुय्यम शिक्षणात १३ ते १८ वयाचे २८ टक्के व उच्च शिक्षणात १८ ते २१ वयाचे १० टक्के विद्यार्थी होते. एकूण २७ विश्वविद्यालये आहेत, त्यांत ९ राष्ट्रीय, २ प्रांतीय व १६ मुख्यतः धार्मिक संस्थांनी चालविलेली आहेत.

     कला व क्रीडा: वास्तुकला, चित्रकला, शिल्पकला, संगीत, नृत्य, नाट्य यांवर नवनव्या फ्रेंच व अमेरिकन ग्रंथांचा व प्रवाहांचा प्रभाव दिसतो. नाना तऱ्हेचे नृत्यप्रकार लोकप्रिय आहेत. त्यांत टँगो हा खास अर्जेंटिनाचा होय. गिटार हे तंतुवाद्य सार्वत्रिक आहे. क्रिकेट वगळून सर्व आधुनिक खेळ खेळले जातात. त्यांत सॉकर हा फुटबॉलचा प्रकार विशेष प्रिय आहे. याशिवाय हाई आलाई व पोर्तो हे खेळ वैशिष्ट्यपूर्ण आहेत. अर्जेंटिनाचे घोडे व घोडेस्वार प्रख्यात असून अर्जेंटिनाची पोलो टीम भारताच्या तोडीची आहे.

     महत्त्वाची स्थळे: दक्षिण अटलांटिकवरील मार देल प्लाता, अँडीजमधील सरोवरातील स्विस धर्तीचे सान कार्लोस दे बारीलोचे हे रम्य ठिकाण, ईशान्य सीमेवरील नायगाराहून उंच व रुंद ईग्वासू धबधबा व पँपास ही पर्यटकांची मुख्य आकर्षणे होत. मेंदोसा, कॉर्दोव्हा व तूकूमान ही ऐतिहासिक शहरे आणि ब्वेनस एअरीझ ही राजधानी प्रेक्षणीय आहे. यांतून वसाहतकालीन वास्तूंबरोबरच आधुनिक ग्रंथालये, संग्रहालये व कलाकेंद्रे पाहावयास मिळतात.

--शहाणे, मो. ज्ञा.
---------------

                   (साभार आणि सौजन्य-संदर्भ-विश्वकोश.मराठी.गोव.इन)
                  ------------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-09.07.2023-रविवार.
=========================================