पावसाची एक वेगळी कविता-गीत-आज पाऊस वेगळाच बरसतोय, का तो इतका मनाला पोळतोय ?

Started by Atul Kaviraje, August 06, 2023, 10:57:32 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज मी तुम्हाला, पावसाची एक वेगळी कविता-गीत ऐकवितो. "लगी आज सावन की फिर वो झड़ी है, वही आग सीने में फिर जल पड़ी है"- या हिंदी गाण्यावर ते आधारित आहे. आशा आहे ते तुम्हाला आवडेल. भरभरून लाईक करा, व मला प्रोत्साहित करा. आपणा सर्वांस ऑगस्ट महिन्याची ही पाऊस विरामलेली व थोडीशी उजळ असलेली रविवार-सकाळ आनंदाची जावो, ही सदिच्छा.

--मूळ हिंदी गाणे-( लगी आज सावन की फिर वो झड़ी है, वही आग सीने में फिर जल पड़ी है )           
-------------------------------------------------------------------------

           "आज पाऊस वेगळाच बरसतोय, का तो इतका मनाला पोळतोय ?"
          ----------------------------------------------------------

आज पाऊस वेगळाच बरसतोय
का तो इतका मनाला पोळतोय ?
आज त्याचे असे रूप का ?,
जाचक, दाहक, जल-धारांना वाहवतोय

आज पाऊस वेगळाच बरसतोय
का तो इतका मनाला पोळतोय ?
इतके रुद्र रूप का त्याचे ?,
तांडव नृत्यच जणू तो करतोय

केव्हातरी केले होते मी प्रेम
प्रीतीची बाग तेव्हा बहरली होती
त्या दिनाची आठवण अजून येतेय,
ती फुलबाग जणू मनातच फुलली होती

तो पाऊस मनाला शांत करीत होता
तो पाऊस देहाला जोजवित होता
तो हवाहवासा शीत गार वारा,
जीवाची काहिली थंड करीत होता 

आज तोच ऋतू पण वेगळा भासतोय
आज तोच पाऊस पण आगळाच पडतोय
आज तीच हवा पण अनोळखी वाटतेय,
आज तोच मोसम पण परका दिसतोय 

इतकं भिन्न रूप का पावसाचे ?
इतकं का तो मनI उदास करतोय ?
मुसळधार सहस्रधारांनी धरेला झोडपीत,
जणू माझ्यासह तोही अश्रू ढाळतोय !

आज पाऊस वेगळाच बरसतोय
का तो इतका मनाला पोळतोय ?
माझ्या प्रेमाची हीच इतिश्री का,
की तो माझ्या प्रेमाची परीक्षा घेतोय ?

आज पाऊस वेगळाच बरसतोय
का तो इतका मनाला पोळतोय ?
त्याच्या मनातले मला काही नाही उमजत,
त्याच्या कोसळण्यातले गम्य मला नाही समजत 

प्रेमाची बहरलेली फुलबाग आज कोमेजून गेलीय
माझी रुसलेली प्रिया मला आज सोडून गेलीय
त्या दिनांची आठवण मन व्यथित करून जातेय,
माझ्या अश्रूंना वाट मोकळी करून देतेय

माझ्या हृदयाचे शत शत तुकडे होताहेत
रक्तबंबाळ, विदीर्ण आजही जुळण्याची वाट पाहताहेत
पण मी ही खोटी आशा का धरून बसलोय ?,
प्रियेच्या परतण्याची आसच हरवून बसलोय

आज दोघांनीही मला दुःख दिलेय
प्रियेचे त्यजणें आणि पावसाचे पडणे
आज दोघेही माझ्या विरुद्ध जाताहेत,
आता हाती आहे फक्त पहIत राहणे

ते भंग हृदय मी जोडू पाहतोय
पुन्हा ते दिवस परतुनी येतील का ?
या उदास मनास मी सांगू पाहतोय,
तुझी प्रिया तुला कधी भेटेल का ?

जणू स्वप्नात घडल्यासारखं सारं वाटतंय
मला जाग कधीच येऊ नये
पण सत्याला सामोरं जावंच लागतं,
परिस्थितीला तोंड द्यावंच लागतं

आज पाऊस वेगळाच बरसतोय
का तो इतका मनाला पोळतोय ?
त्याचे समाधान होत नाहीय का ?,
की मनाला  वेदना, यातना देतोय

आज पाऊस वेगळाच बरसतोय
का तो इतका मनाला पोळतोय ?
संवेदनाशून्य झालंय माझं मन आज,
ते दुःख मी आजही वाहवतोय

-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-06.08.2023-रविवार.
=========================================