दिन-विशेष-लेख-भारत छोडो दिवस-A

Started by Atul Kaviraje, August 09, 2023, 05:03:51 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                   "दिन-विशेष-लेख"
                                  "भारत छोडो दिवस"
                                 -------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक- 09.08.2023-बुधवार आहे.  ९ ऑगस्ट-हा दिवस "भारत छोडो दिवस" म्हणूनही ओळखला जातो. वाचूया, तर या दिवसाचे महत्त्व, आजच्या या "दिन-विशेष-लेख" या शीर्षकI-अंतर्गत.

     १९४२मध्ये संपूर्ण स्वराज्यासाठी सुरू झालेले नागरी असहकार आंदोलन (इंग्लिश: Civil Disobedience) होते. गांधीजींच्या करा किंवा मरा हा संदेशाने या आंदोलनाची सुरुवात झाली. मुंबई येथे ८ ऑगस्ट १९४२ रोजी महात्मा गांधींनी भारत छोडोचा नारा देऊन ब्रिटीशांविरोधात स्वातंत्र प्राप्तीसाठी आंदोलन उभारले.

     छोडो भारत आंदोलन : भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील एक महत्त्वाचे आंदोलन. अगोदरच्या म्हणजे १९२०–२१ आणि १९३०–३३ च्या स्वातंत्र्य आंदोलनाशी तुलना करता १९४२ चा छोडो भारत लढा हा आगळाच होता. आझाद हिंद सेनेने दिलेला लढा वगळता स्वातंत्र्यासाठी ते शेवटचेच आंदोलन होते. इतर कोणत्याही संग्रामापेक्षा अत्यंत उग्र स्वरूपाचा हा लढा होता. आधीच्या सर्व जनआंदोलनांना पुढाऱ्यांचे मार्गदर्शन दीर्घकाळ लाभले. १९४२ चा लढा सर्व नेत्यांची धरपकड झाल्यानंतर जनतेने उत्स्फूर्तपणे लढविला. अर्थात अगोदरच्या दीर्घकालीन लढ्यांच्या मानाने हे आंदोलन फारच थोडा काळ, म्हणजे फक्त चार-पाच महिनेच टिकून राहिले, याला अपवाद फक्त महाराष्ट्रातील प्रतिसरकार होते. हे प्रतिसरकार मात्र १९४५ पर्यंत व्यवस्थित कार्य करीत होते व ज्या भागात ते स्थापन झाले होते, त्या भागात सरकारी राज्ययंत्रणा रखडतच काम करीत होती. बाकीची आंदोलने निव्वळ स्वराज्य मिळविण्यासाठी होती. बेचाळीसच्या लढ्याच्या उद्देशात देशाचे अखंडत्वही अंतर्भूत होते.

     दुसऱ्या महायुद्धापासून स्वातंत्र्यसंग्रामाला वेगळीच कलाटणी मिळाली. त्या अगोदर ब्रिटिश साम्राज्य बरीच वर्षे टिकेल, अशी लोकांची भावना होती परंतु दुसऱ्या जागतिक युद्धाच्या वेळी स्वराज्य जवळ आले, हे स्पष्टपणे दिसून आले होते. भारतीय जनतेला न विचारता व्हाइसरॉयने परस्पर भारताला युद्धात खेचले त्याच्या निषेधार्थ निरनिराळ्या प्रांतांतील काँग्रेस मंत्रिमंडळांनी राजीनामे दिले आणि राजकीय कोंडी सुरू झाली. थोड्याच महिन्यांत मुस्लिम लीगने अधिकृतपणे पाकिस्तानची मागणी केली. वैयक्तिक सत्याग्रहाचा आदेश म. गांधींनी दिला तो काहींनी अंमलात आणला. तथापि राजकीय कोंडी फुटू शकली नाही आणि व्हाइसरॉयचा एकतंत्री अमल अधिकाधिक मजबूत होऊ लागला. अशा वातावरणात युद्धपरिस्थिती ब्रिटनच्या दृष्टीने फारच बिकट झाली. १९४१ च्या अखेरीस अमेरिका आणि चीन यांनी हिंदी जनतेचे युद्धास सहकार्य मिळविण्यासाठी भरीव राजकीय सुधारणा द्या, असा ब्रिटनकडे लकडा लावला. तेव्हा चर्चिल मंत्रिमंडळाने एक योजना तयार केली आणि क्रिप्सना वाटाघाटीसाठी भारतात धाडले. आराखडा पाहिल्याबरोबर गांधीजींनी या योजनेमुळे पुढे भारताचे तुकडे होतील, असे जाहीर करून सेवाग्रामाचा रस्ता धरला. काँग्रेसच्या नेत्यांनी वाटाघाटी चालू ठेवल्या परंतु युद्धकाळातसुद्धा ब्रिटन आपली पकड ढिली करू इच्छीत नाही, असे दिसल्यावर काँग्रेसने योजना फेटाळली. महिन्याभराने, म्हणजे मे अखेरीस, गांधीजींनी ब्रिटिशांनी या देशातून ताबडतोब चालते व्हावे, अशी मागणी करावयास सुरुवात केली. जुलैमध्ये काँग्रेसच्या कार्यकारी मंडळाने स्वातंत्र्याचे रणशिंग फुंकण्याचे निश्चित करणारा ठराव केला. तो ७ आणि ८ ऑगष्टला मुंबईस भरलेल्या अखिल भारतीय काँग्रेस समितीसमोर मांडण्यात आला व तो मान्य झाला. त्यान्वये भारताचे राजकीय स्वातंत्र्याचे उद्दिष्ट ताबडतोब सिद्ध करण्यासाठी गांधीजींच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने जनआंदोलनाची हाक दिली. आपल्या भाषणात गांधीजी म्हणाले की, आपण परकीय सत्तेचे गुलाम आहोत ही भावना मनातून काढून टाका आणि देश स्वतंत्र करू वा मरू, या भावनेने या लढ्यात सहभागी व्हा. ज्येष्ठ नेत्यांना अटक होण्याची शक्यता असल्याचेही त्यांनी सूचित केले. जर तसे झाले आणि काँग्रेस नेत्यांचे मार्गदर्शन मिळाले नाही, तरी लोकांनी आपल्या कुवतीप्रमाणे व बुद्धीप्रमाणे आंदोलन चालू ठेवावे, असा आदेश दिला. त्या रात्रीच सर्व पुढाऱ्यांना अटक झाली व लोकांत संतापाची इतकी तीव्र लाट उसळली की, देशभर राजकीय आंदोलनाचा वणवा पेटला.

--नगरकर, व. वि.
----------------

                   (साभार आणि सौजन्य-संदर्भ-विश्वकोश.मराठी.गोव.इन)
                  ------------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-09.08.2023-बुधवार.
=========================================