दिन-विशेष-लेख-भारतीय ग्रंथपाल दिवस-A

Started by Atul Kaviraje, August 12, 2023, 04:47:35 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje


                                  "दिन-विशेष-लेख"
                              "भारतीय ग्रंथपाल दिवस"
                             -----------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-12.08.2023-शनिवार आहे. १२ ऑगस्ट-हा दिवस "भारतीय ग्रंथपाल दिवस" म्हणूनही ओळखला जातो. वाचूया, तर या दिवसाचे महत्त्व, आजच्या या "दिन-विशेष-लेख" या शीर्षकI-अंतर्गत.

            डॉ. रंगनाथन, भारतीय ग्रंथपाल दिन, महाराष्ट्रातील वास्तव--

     भारताच्या प्राचीन संस्कृतीत व इतिहासात ग्रंथालयांचे महत्व मोठे आहे.आधुनिक काळात भारतीय ग्रंथालय शास्त्राचे जनक म्हणून डॉ.शियाली रामामृतम उर्फ डॉ. एस.आर.रंगनाथन यांचे नाव मोठया आदराने घेतले जाते.त्यांचा जन्म मद्रास प्रांतातील तंजावर जिल्ह्यात शियाली या गावी ९ ऑगस्ट १८८२ रोजी झाला.मात्र दरवर्षी १२ ऑगस्ट हा दिवस त्यांच्या जन्मदिना प्रित्यर्थ 'भारतीय ग्रंथपाल दिन ',म्हणून साजरा केला जातो.त्यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन.

     डॉ.रंगनाथन यांचे प्राथमिक व महाविद्यालयीन शिक्षण त्यांच्या जन्मगावी आणि मद्रासच्या ख्रिश्चन कॉलेजमध्ये झाले.गणित विषयाची 'एम.ए.'आणि अध्यापन शास्त्राची पदवी त्यांनी प्राप्त केली.मद्रासच्या गव्हर्नमेंट कोलेजमध्ये गणिताचे प्राध्यापक म्हणून त्यांनी चार वर्षे काम केले.पण ग्रंथांविषयीच्या अपार प्रेमामुळे त्यांनी प्राध्यापकी पेशा सोडून ४ जानेवारी १९२४ रोजी मद्रास विद्यापीठात 'ग्रंथपाल ' म्हणून सेवा पत्करली.त्यांच्या या निर्णयाचे अनेकांना आश्चर्य वाटले.कारण ही आपणहून करून घेतलेली पदावनती वाटली.अर्थात 'प्राध्यापक ' या विशेषणाचा मोह आजही अनेकांना आवरत नाही.सहाय्यक शिक्षक,अधिव्याख्याता,प्रपठाक यापासून ते शालेय माध्यमिक शिक्षकांनाही आपल्या नावामागे 'प्राध्यापक 'असे विशेषण लावण्यात धन्यता वाटते.नव्वद वर्षांपूर्वी तर या विशेषणाची महत्ता आणि गुणवत्ता दोन्हीही फार मोठी होती. डॉ.रंगनाथन यांनी जाणीवपूर्वक ग्रंथपाल पद स्वीकारून जे काम केले त्यातून त्यांची ओळख 'भारतीय ग्रंथालय शास्त्राचे जनक ' अशी तयार झाली.त्यांचा जन्मदिन 'भारतीय ग्रंथपाल ' दिन म्हणून साजरा केला जातो.यावरून तुमच्या पदनाम,विशेषण्यापेक्षा जे काम तुम्ही करता ते किती तळमळीने करता हे महत्वाचे असते हे स्पष्ट होते.

     डॉ रंगनाथन यांनी ,ग्रंथ हे उपयोगासाठी आहेत,प्रत्येक वाचकाला त्याचा ग्रंथ मिळाला पाहिजे, प्रत्येक ग्रंथाला त्याचा वाचक मिळाला पाहिजे,वाचक व सेवकांचा वेळ वाचला पाहिजे आणि ग्रंथालय ही वर्धिष्णू संस्था आहे अशी ग्रंथालय शास्त्राची शास्त्रशुद्ध पंचसूत्री मांडली.परिणामी ग्रंथालय,ग्रंथपाल,ग्रंथालय सेवक यांच्याकडे पाहण्याचा एक व्यापक दृष्टिकोन तयार झाला.आज ग्रंथपालाला 'माहिती अधिकारी ',किंवा 'माहिती शास्त्रज्ञ ' अशी संज्ञा राष्ट्रीय,आंतरराष्ट्रीय स्तरावर दिली जाते याचे श्रेय निर्विवादपणे डॉ.रंगनाथन यांनाच जाते.

     ग्रंथालय शास्त्राच्या सखोल अभ्यासासाठी त्यांना मद्रास विद्यापीठाने लंडनला जाण्याची संधी दिली.या संधीचा त्यांनी पुरेपूर उपयोग करून घेतला.एका चिकित्सक अभ्यासकाच्या भूमिकेतून त्यांनी संशोधन केले.नव्या संकल्पना मांडल्या.त्यांच्या शास्त्रशुद्धतेमुळे त्यांना मोठी मान्यता व दिगंत कीर्ती मिळाली.आपल्याकडील ज्ञान इतरांनाही मिळावे या हेतूने त्यांनी  १९२५ पासून मद्रास प्रांतामध्ये काम सुरू केले.मद्रास ग्रंथालय संघ आणि अखिल भारतीय ग्रंथालय संघाचीही स्थापना केली.ग्रंथालय चळवळीला आलेली मरगळ झटकून टाकण्यासाठी त्यांनी लोकजागृती करून मद्रासमध्ये १९४८ साली सार्वजनिक ग्रंथालय कायदाही मंजूर करून घेतला.

     ग्रंथालयाच्या ज्ञानवर्गीकरणाची एक अभिनव पद्धती डॉ.रंगनाथन यांनी विकसित केली.ही पद्धती म्हणजेच 'द्विबिंदू वर्गीकरण पद्धती ' होय.ग्रंथालय शास्त्रात भारताने जागतिक ग्रंथालय शास्त्राला दिलेली ही मोठी देणगी आहे. डॉ.रंगनाथन यांनी ग्रंथालय शास्त्रावर पन्नासावर पुस्तके लिहिली.ग्रंथालय शास्त्राचा एवढ्या तपशीलवार ,बारकाईने विचार करून एवढी ग्रंथसंपदा तयार करणारा दुसरा कोणीही अभ्यासक नाही.

     ग्रंथालय शास्त्रातील त्यांच्या असामान्य  कर्तृत्वामुळे भारत सरकारने त्यांना 'राष्ट्रीय प्राध्यापक 'म्हणून मान्यता दिली .ग्रंथालय क्षेत्रातील संशोधनकार्य अखंडित सुरू सुरू राहावे यासाठी त्यांनी आपल्या पत्नीच्या नावे 'शारदा रंगनाथन विश्वस्त निधी '  स्वतःचे तीन लाख रुपये घालून उभा केला.त्यांच्या ग्रंथालय क्षेत्रातील उत्तुंग कामगिरीमुळेच त्यांना मद्रास सरकारने 'रावबहादूर ',भारत सरकारने 'पद्मश्री 'दिल्ली विद्यापीठाने 'डॉक्टरेट 'या पदव्यांनी गौरविले.डॉ.रंगनाथन वयाच्या ८० व्या वर्षी २७ सप्टेंबर १९७२ रोजी बेंगळुरू येथे कालवश झाले.

--प्रसाद माधव कुलकर्णी
--इचलकरंजी
----------------------

                   (साभार आणि सौजन्य-संदर्भ-pm कुलकर्णी.होम.ब्लॉग)
                  ------------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-12.08.2023-शनिवार.
=========================================