रक्षाबंधन-लेख-5

Started by Atul Kaviraje, August 30, 2023, 05:32:44 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                       "रक्षाबंधन"
                                      -----------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-३०.०८.२०२३-बुधवार आहे. आज "रक्षाबंधन" आहे. रक्षाबंधन हा सण श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला साजरा केला जातो. बहीण-भावाच्या नात्यातील पावित्र्य जपणाऱ्या या सणाला हिंदू धर्मात विशेष महत्व आहे. यंदा ३० ऑगस्ट रोजी हा सण साजरा केला जाणार आहे. या दिवशी बहिणी आपल्या भावाच्या हातावर राखी बांधून त्याच्या सुरक्षिततेसाठी आणि दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते. मराठी कवितेच्या माझ्या सर्व भाऊ-बहीण, कवी-कवियित्रीना रक्षाबंधन सणाच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया, रक्षाबंधन वर एक महत्त्वाचा लेख.

                      रक्षाबंधन माहिती--

              रक्षाबंधनाचे महत्त्व –

     आपल्या भारत देशामध्ये धार्मिक संस्कृतीला सणांना फार महत्त्व आहे. सगळ्यांनी एकत्र येऊन आनंदाने उत्साहाने सण साजरे केल्यामुळे, नात्यांमधील प्रेम बंध घट्ट होतात. असाच एक नात्यांना एकत्र आणणारा सण म्हणजे रक्षाबंधन. याला राखी पौर्णिमा असे देखील म्हटले जाते.

     आपल्या देशामध्ये प्रत्येक स्त्रीला आपण आई बहिणीचा दर्जा देत असतो. त्यामुळे या नात्याला अजून घट्ट करण्याचे काम रक्षाबंधन करीत असतो. या दिवशी प्रत्येक भावाची सख्खी बहिणी त्याला राखी बांधतेच, पण त्याचबरोबर आजूबाजूचे नातेसंबंधी, शेजारपाजारी, आपल्या वर्गातील, महाविद्यालयातील मित्र मंडळी यांना देखील भारतीय बहिणी राखी बांधत असतात. यामुळे कुटुंबामध्ये त्याचप्रमाणे सामाजिक सलोख्यामध्ये बंधुता एकता निर्माण होत असते. आपलेपणा वाढत असतो म्हणून हा सण खूप महत्त्वाचा आहे.

     या दिवशी बहिणी आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधून त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात, आणि भाऊ आपल्या बहिणीचे सदैव रक्षणकरणार, असे वचन देतात. त्यानंतर भाऊ बहीण एकमेकांना मिठाई आणि भेट वस्तू देतात.

             रक्षाबंधन सण का साजरा करतात ?--

     राखी पौर्णिमा सण जवळ आला आहे, हे ऐकून अनेक भाऊ बहिणीच्या चेहऱ्यावर आनंद असतो. हे भाऊ बहिणीचे नाते इतकी घट्ट असते, की ज्याचे आपण शब्दांमध्ये वर्णन करू शकत नाही. हे नाते इतके पवित्र आहे, की त्याचा जगभर आदर केला जातो. या जगातील प्रत्येक बहिण आपला भाऊ आनंदी, निरोगी असावा, तसेच त्याला सगळी सुखे मिळावी, यासाठी देवाकडे प्रार्थना करत असते. तर प्रत्येक भाऊ आपल्या बहिणीच्या रक्षणासाठी सदैव तत्पर असतो. यासाठी बहिण भावाचे हे नाते रक्ताचे असावे असे नाही. तर कुठलाही भाऊ कुठल्याही बहिणीचे रक्षण करू शकतो. त्याचप्रमाणे कुठलीही बहीण आपल्या कुठल्याही भावाच्या दीर्घायुष्यासाठी देवाकडे प्रार्थना करीत असते. म्हणून हा सण आपण मोठ्या उत्साहामध्ये आनंदामध्ये साजरा करतो.

            रक्षाबंधन कशाप्रकारे साजरा करतात? –

     सर्वप्रथम बहिण आपल्या भावासाठी बाजारातून राखी विकत घेते. या सणा दिवशी भावाला ओवाळताना ती नवीन कपडे परिधान करते. यासाठी ती नवीन कपडे विकत घेते. त्याचप्रमाणे भाऊ देखील रक्षाबंधनाच्या दिवशी स्वतःला घालण्यासाठी नवीन कपड्यांची खरेदी करत असतो. बहिणीला भेटवस्तू खरेदी करत असतो. ज्यावेळी बहीण भावाला ओवाळते, त्यावेळी ती सर्वप्रथम पूजेचे ताट तयार करते. त्यानंतर ती आपल्या भावाच्या कपाळाला टिळा लावून त्याच्या हातावर राखी बांधते. ओवाळून झाल्यानंतर भाऊ आपल्या बहिणीला भेट वस्तू देतो. अशा प्रकारे हा सण साजरा केला जातो.

             रक्षाबंधनाचे वैशिष्ट्य –

     राखी पौर्णिमा हा एक असा सण आहे जो केवळ भारतातच नव्हे तर संपूर्ण जगभरामध्ये मोठ्या आनंदाने उत्साहाने साजरा केला जातो. या सणाला कोणत्याही जाती धर्माचे बंधन असत नाही. म्हणून हा सण किंवा हिंदूच नाही तर सर्व धर्मीय मोठ्या आनंदाने आणि धुमधडाक्यात साजरा करत असतात. यामुळे सामाजिक बंधुता, एकता यामध्ये वाढ होत असते, हे या सणाचे मोठे वैशिष्ट्य आपल्याला पहावयास मिळते.

               रक्षाबंधन सणामागील शास्त्र –

     या सणामध्ये, राखी बांधण्यामागे देखील एक शास्त्र सांगण्यात आलेले आहे. या सणादिवशी यमलहरींचे प्रमाण अधिक असते आणि त्या पुरुषांच्या शरीरामध्ये जास्त प्रमाणात गतिमान होत असतात, असा समज आहे. त्यामुळे या यमलहरी शरीरामध्ये चालू झाल्या की सूर्यनाडी जागृत होऊन त्याच्या जीवाला त्रास होतो. पण त्याचवेळी राखीचा हा पवित्र धागा बांधून या यमलहरींना बंधन घालण्याचे काम प्रत्येक बहीण करीत असते. या पवित्र राखीचे बंधन घालून सूर्यनाडीला शांत करण्याचे काम बहीण करते, असे शास्त्रात सांगितले जाते.

--by-Team Marathi Zatka
----------------------------

                      (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठी झटका.कॉम)
                     -------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-30.08.2023-बुधवार.
=========================================