आई हे फक्त नाते नाही

Started by SATYAVAN, October 28, 2010, 07:25:32 PM

Previous topic - Next topic

SATYAVAN

आई हे फक्त नाते नाही. ते एक आद्य विद्यापीठ आहे. जन्माला आल्यापासून आपल्या अखेरच्या श्वासापर्यंत आईच्या कृतीतून, आठवणीतून अनेकदा मार्ग सापडत असतो. अशीच आपल्या आई कंवरबाई माणिकचंद चंगेडे यांची प्रेरणादायी आठवण लीलावतीबाईंनी आपल्या या लेखातून जागवलीय...
...................................

माझ्या आईचा जन्म १९११ साली एका लहान गावी रस्तापूर येथे झाला. तिच्या लहानपणीच तिच्या डोक्यावरचे आईचे छत्र हरवले. ती मामाकडे लहानाची मोठी झाली. त्या काळी मुलींना शिक्षण कमीच मिळे. त्याप्रमाणे तिलाही फक्त दुसरीपर्यंत शाळा मिळाली. प्रखर बुद्धिमत्ता , हुशारी , शाळेची आवड , असूनही तिला शाळा सोडावी लागली. वयाच्या अवघ्या तेराव्या वर्षीच लग्न करून सासरी आली.

इकडे आजी , आजोबा , आत्या व बाबा असे छोटेसे कुटुंब होते. बाबांचे किराण्याचे दुकान भरभराटीत होते. वर्षभरात आत्याचेही लग्न झाले. ती सासरी गेली व आई काही दिवसात एका मुलीची आई बनली. घरात अगदी आनंद होता. पण ते ईश्वराला मान्य नव्हते. माझ्या आत्याचे मिस्टर वर्षभरातच अल्पशा आजाराने निधन पावले. घरात शोककळा पसरली , १६ वर्षांची आत्या पती निधनानंतर माहेरी परतली. मुलबाळ नाही , आणि आली ती कायमचीच , अशा दुखद वातावरणामुळे आजोबांची तब्येत बिघडली . त्या धक्क्यामुळे तेही सर्वांना सोडून स्वर्गवासी झाले.

आलेले दुख दुप्पट झाले , वातावरण चिंतेने वेढले. सर्वांच्या तोंडावर हास्याऐवजी अश्रू असे. आईचे लग्न होऊन २-३ वर्षे झाली पण कसलीही मौज नाही , मजा नाही , नाटक नाही , सिनेमा नाही कि बाहेर फिरणेही नाही. आपण बाहेर जोडीने गेलो तर नणंद ला किती वाईट वाटेल ? आपण चांगले जरीचे कपडे घातले तर तिला किती वाईट वाटेल ? दोघी नणंद-भावजया बरोबरीच्या वयाच्या. एकाच्या दुखामुळे दुस-यालाही आनंद उपभोगताना वाईट वाटे व एकूण काहीच होत नसे.

एवढेच काय पण आई-वडिलांच्या वैवाहिक जीवनात स्तुडिओत जाऊन त्यांनी एक जोडीचा फोटोही काढला नाही , ज्याच्यामुळे मला माझ्या बाबांची तोंड ओळख तरी झाली असती. घरात दर दोन वर्षांनी पाळणा हलू लागला आणि दर वेळेस कन्या रत्नांची संख्या वाढू लागली. पुत्र जन्माचा योग मात्र आलाच नाही. ५ मुलींचा एका पाठोपाठ जन्म झाला.

मी १० महिन्यांची झाली आणि परत एकदा दुखाचा डोंगर कोसळला. बाबा दुकानाच्या खरेदीला मुंबईला गेले व तेथे त्यांना ताप आला. हळूहळू ताप खूप वाढला. दोन दिवस ताप उतरेना. त्यांच्या ओळखीच्या कोणीतरी त्यांना अहमदनगरला आमच्या घरी पोहोचवले. पण रस्त्यात त्यांचा ताप एवढा वाढला की त्यात त्यांची वाचा बंद झाली. घरी आले , डॉक्टर आले , डॉक्टरांनी ज्वराचे निदान केले. उपचार सुरु झाले. पण ताप उतरेना. डोक्याजवळ आजी , पायाकडे आई , सर्वात मोठी बहीण १० वर्षांची व मी १० महिन्यांची अशा ५ चिमुरड्या मुली तोंड केविलवाणे करून घरात उदासिन वावरत होतो. काका नाही , मामा नाही , आत्याचे मिस्टर नाही , की मावशी नाही. कोणीही जबाबदार पुरुष घरात नाही. माझे आजोबाही (आईचे वडील) बरेच वयस्कर , काय करावे त्यांनाही काही सुचेना. आणि अखेर ९ व्या दिवशी सर्वांना अनाथ करून बाबांनी हे जग सोडले.

घरावर शोककळा पसरली. कोणी काय बोलावे ? आजीचा एकुलता एक मुलगा वय फक्त ३० वर्षे आणि सर्वांना सोडून गेला. आईचे वय २५ वर्षे ज्या वयात आजकाल मुलींचे लग्नही होत नाही , त्या वयात ती विधवा झाली. डोक्यावर आकाश कोसळले ते दुखाचे पहाड कसे झेलावे ? आजही तो विचार मनात आला की वाटते काय तो भयानक प्रसंग असेल. लहान लहान ५ मुली , तिकडे सासू आणि आई. नियतीचे क्रूर कृत्य कोणीही थांबवू शकले नाही. काळानी त्यांच्यावर झडप घालून त्यांना नेलेच. आम्ही सर्व पोरके झालो.

आत दुकानाचे कोण बघणार ? जमाखर्च सगळा लिहिलेला होता. आईचे वय २५ वर्षे , खेड्यात वाढली , शिक्षण कमी , व्यवहाराची माहिती नाही. पण व्यवहारात चतुर , प्रखर बुद्धिमत्ता , स्वाभिमानी , सत्याची कास धरणारी , धीर , गंभीर , प्रेमळ असे सर्वांगीण व्यक्तिमत्व असणारी माझी आई! तिने निर्णय घेतला आणि वह्या जमाखर्चाच्या पाहायला सुरुवात केली. मदतीला आजोबा होते.

बाबांच्या अकस्मात निधनाने सर्वच व्यवहार बंद झाले. दुकानाचे कोण बघणार ? कर्जदार कर्ज वसुली साठी दाराशी उभे राहिले. उधारी मात्र वसूल होईना ; कर्ज कसे फेडावे , वसुली कशी करावी ? मोठा यक्ष प्रश्न होता. काही सुचेना , अखेर कठोर मानाने आईने निर्णय घेतला ; दुकान व दुकानातील सामान विकू आणि सर्वांचे कर्ज पै-पैनिशी फेडून टाकू. कमी पडणारी रक्कम स्वतःचे दागिने विकू असे ठरले. पण तेही नियतीला मान्य नव्हते. त्यातच अजून एक घटना घडली.

बाबांनी मुंबईला जाताना एका नातेवाईकांचे कर्जाचे पैसे परत केले होते , तसे त्यांनी घरीही सांगितले की आज हि रक्कम मी त्यांना दिली आहे. परंतु तशी पावती घेतली नाही , विश्वासावर व्यवहार चालत असे. परंतु अचानक बाबांच्या मृत्यूमुळे व पावती न घेतल्यामुळे त्यांची बुद्धी बदलली व त्यांनी परत पैशाची मागणी केली. आणि दिलेल्या रकमेबद्दल ते नाकबूल झाले. काय करणार ? त्यांनी कोर्टात दावा केला. आणि पावती अभावी तो त्यांनी जिंकला.

त्यांनी दुकानावर जप्ती आणली , दुकानासाहित सर्व सामान विकून त्यांनी त्यांचे कर्ज वसूल केले. मात्र आईला संकटात लोटले. कर्ज फेडण्याचा तोही मार्ग बंद झाला. आता काय करावे ? गावी काही जमीन व घर होते. ते सर्व विकले आणि सर्व कर्ज व्याजासहित फेडले. उधारी मात्र पैशाचीही वसूल झाली नाही.

आता कुटुंबाचा सर्व भार तिच्यावर होता. तो कसा पेलावा ? शिक्षण नाही , कला नाही , काय करावे काही सुचेना , अशा वेळी माझे आजोबा (आईचे वडील) खंबीरपणे आईच्या पाठीशी उभे राहिले. आईच्या पाठीवरून मायेचे हात फिरवत तिला म्हणाले , " पोरी , आज मला धन्य वाटले. ज्या लहान वयात तू एवढ्या मोठ्या संकटावर धैर्याने मात केली ते बघून मी धन्य झालो. तू काही काळजी करू नको. जी थोडी फार शेती माझी आहे , त्यात धन्य पिकते आहे ते मी तुला पाठवीन. पण याच बरोबर माझी तुला एक शिकवण आहे , तू तुझ्या पायावर उभे राहावे. तू काहीतरी शिक आणि स्वतःच्या कर्तबगारीने मोठी हो. जीवनात आदर्श निर्माण कर , कष्ट करायला लाज नाही , भीक मागायला लाज आहे. कोणासमोर हाथ पसरू नको. कोणावर अवलंबून राहू नको. तुझे वय फार लहान आहे , आयुष्य फार लांब आहे व जबाबदारी मोठी आहे. धैर्याने सामोरी जा , यश मिळव."

आई ती जबाबदारी पेलण्यासाठी निश्चयाने उभी राहिली. तिने प्रण केला "मी रडणार नाही , हतबल होणार नाही. माझ्या कर्तबगारीने मी परिस्थितीवर विजय मिळवीन. भले माझ्याजवळ धन नसेल , पैसा नसेल पण चारित्र्य आहे. मुलींना असे घडवीन की त्या त्यांच्या आयुष्यात कधीही डगमगणार नाहीत. त्यांना ते सर्व देईन , संस्कारी बनवीन."

मग तिने कामाचा श्री गणेश केला. घरात बसून पापड लाटणे , दळण दळणे इत्यादी घरात बसून ती अनेक कामे करू लागली. त्याच बरोबर शिवणकाम व जरीकाम शिकू लागली. घरचा चरितार्थ चालवू लागली. आजोबा धन्य पाठवीत होते , आम्ही बहिणी शाळेत जात होतो.

त्या वेळेस आमचा समाजात अहमदनगरला अशी पद्धत होती की प्रत्येक बांधवांनी छोटीशी ठराविक रक्कम पंचायतीमध्ये जमा करावी. त्यातून काही सामाजिक सण साजरे होत. विधवा स्त्रियांसाठी ती रक्कम माफ असे. शिवाय त्या फंडातून त्या गरजू स्त्रियांना मदतही करत. पण माझी आई स्वाभिमानी व करारी होती , तिने त्या फंडातून मदत तर घेतली नाही , उलट दरवर्षी त्या फंडामध्ये जमेल तेवढी रक्कम जमा करून स्वतःचे सामाजिक कर्तव्यही पार पाडले. त्यामुळे समाजात तिला खूपच आदराचे स्थान मिळाले.

मुली मोठ्या झाल्या , तिथेही तिने कसलीही तडजोड न करता सुयोग्य , सुस्थितीत स्थळ बघून संस्कारी घरात स्व-खर्चाने लग्न करून दिले. भलेही हुंडा देण्यासाठी मोठी धन नव्हती पण तिने जे आम्हाला उत्तम संस्कार व उच्च शिक्षण दिली ती त्या हुंड्यापेक्षा शतपटीने मोठी आहे. ज्यांमुळे आम्हीही आमच्या जीवनात कितीही वादळ आले तरी ते सहन करण्याची , ती पेलण्याची शक्ती आम्हाला मिळाली. अनंत उपकार आहेत त्या मातेचे.

आता तिचे शिवणकाम व जरीकामाचे शिक्षण पार पडले होते. आणि पापड आणि दळण सोडून आता ती शिवणकाम व जरीकाम करू लागली होती. ह्या काळात आजोबांचेही निधन झाले. ब-याचशा जबाबदारीतून आता ती मुक्त झाली , असे वाटता वाटता परत एक मोठी अडचण निर्माण झाली. बहिणीच्या पतींचा अपघात झाला , त्यात त्यांच्या पायाला जबर मार लागला. ससून हॉस्पिटल मध्ये दाखल केले . ती राहायला होती चिंचवडला. त्या काळी चिंचवड ते पुणे फक्त लोकल होती. बसेसची सोय नव्हती. आता बरे वाटेल , मग बरे वाटेल असे करता करता दिवसांमागून दिवस जाऊ लागले.

पाय बरा होईना , असे करता करता महिने गेले , वर्षही गेले. हॉस्पिटल सुटेना , तेही नौकरी करत होते. शेवटी नोकरी सोडावी लागली. मुले लहान होती , शाळेत जात होती. पैशाचा ओघ संपला , हॉस्पिटलचा अफाट खर्च संपेना , मुलांच्या शाळा , लोकलची वेळ , हॉस्पिटलची वेळ हे सर्व कसे सांभाळावे ते कळेना. खूपच ओढाताण होऊ लागली , काही मार्ग काढावा समजेना. असे करता करता ३-४ वर्षे गेली. शेवटी पाय बरा न होता घरी परतले. घरातली अडचण काही बघवेना. मुलांची तारांबळ बघवेना. आईला जमत होती ती सर्वोपरी मदत करत होती. पण ती अपुरी पडत होती. हे बघून मेव्हणे उद्दिघ्न झाले. त्यांच्या मनात मरणाचे विचार घोळू लागले. अशा परिस्थितीत आईची माया परत गहिवरली , तिने त्यांना खूपच मानसिक आधार दिला. मनाचा निश्चय केला.

जे काही थोडे फार दागिने माझ्याजवळ आहेत , ते मी माझ्या वृद्धापकाळासाठी जपून ठेवले आहेत , ते मी कशाला ठेऊ ? मुलीच्या जीवनाक्षा काय ते दागिने मला जास्त आहेत ? ते दागिने मी बँकेत गहाण ठेऊन जर काही मदत करता आली तर बघावे. बँकेचे तोंड कधी पहिले नव्हते. आपण बँकेत गेलो आणि दागिने गहाण ठेवले तर लोक आपल्याला काय म्हणतील ? अशी भीती तिला वाटत होती. पण शेवटी बँकेत गेली. दागिन्यांचे गाठोड बरोबर घेऊन. बँकेतून त्या तारणावर जी रक्कम मिळाली ती घेऊन बहिणीकडे गेली , मेहुण्यांना ती रक्कम दिली. त्यांना धीर दिला. जीवनाची अशी पल्लवित केली. म्हटली हे पैसे मी कर्जाने आणले आहेत. त्यात घरी बस्सोन जो धंदा करता येईल तो करा. त्यात सर्वांचे संगोपन करा. मात्र , बँकेचा व्याजाचा तिमाही हाप्ता भरण्याची टाकत माझ्याकडे नाही.

मेहुण्यांच्या डोळ्यात अश्रू आले. भरल्या अंतकरणाने आईचे आभार मानले , घरी बसून केमिकलचा धंदा सुरु केला. लाखोंनी पैसे कमावले , शरीराने नाही , बुद्धीने कमावले. बँकेचे कर्ज फेडले. आईचे दागिने परत काढून आईला परत केले.

काही दिवसांनी आईची आई पण वारली. मागे कोणीच नव्हते. तिचे घर आवरताना बरीच कागदपत्रे सापडली. ती सगळी बघता बघता त्यात काही जमिनीचे कागद पत्र सापडले. त्यात २२ एकरची जमीन त्यांच्या नावे होती. ती कायद्यानुसार आईच्या नावे झाली. पण ती जमीन दुसरेच (त्यांचे बंधू) पिकवित होते. आईने त्यांना ती जमीन मागितली. आता तुम्ही ती पिकवू नका मला ती विकायची आहे , असे ऐकताच त्यांचा स्वार्थ बळावला. एव्हढी मोठी जमीन , एव्हढे त्यांचे उत्पन्न सहज सहजी ते सोडायला तयार नव्हते , आईने खूप समजावले , विनवण्या केल्या , खर्च केला पण ते ऐकेनात.

कोर्टात जाण्याची त्यांची इच्छा नव्हती , भांडून , दुस-यांना दुखवून ती जमीन घेण्यात तिचे मन तयार होईना. आता मात्र तिची एकच इच्छा होती , ती जमीन विकून येणारी रक्कम आपण गुरूंना धार्मिक शिक्षणासाठी दान करावी. शेवटी ती अत्म्ये गुरु आचार्य आनंद्कृशिजी महाराज ह्यांच्या कडे गेली. ती तिचे श्रद्धा स्थान होते. त्यांच्या वर तिची लहानपणापासूनच श्रद्धा होती. ते तिच्या माहेरच्या लोकांना ओळखत होते. ती त्यांच्या कडे गेली. सर्व परिस्तिथी सांगितली.

त्यांना विनंती केली. आपण त्यांना समजवावं , मला ती रक्कम स्वतःसाठी नको , मी गरीब आहे , पण मला संपत्तीचा मोह नाही , लोभ नाही , माझ्या पोरी आपापल्या घरी सुखात आहेत. जी माझ्या नावे जमीन आहे ती मला दान करायची आहे. आता माझा संसार संपलाय , जाता जाता आयुष्याच्या शेवटी एक सत्कार्य करण्याची संधी मला मिळाली आहे ती पार पडावी. एव्हढीच माझी इच्छा. आपण माझ्यासाठी त्यांना समजावले तर ऐकतील , मला कोर्ट कचेरी करायची नाही. तिच्या आंतरिक तळमळीने गुरु द्रवले आणि त्यांनी प्रेमळ शब्दात तिला शब्द दिला , " कवरबाई , मी प्रयत्न करीन. तुमच्या आत्मिक शक्तीला यश मिळेल". गुरूंनी त्या लोकांना बोलावले , त्यांच्या मीटिंग घेतल्या , खूप प्रयत्न केला आणि त्यात ते यशस्वी झाले.

ते ती जमीन सोडायला तयार झाले. त्यांच्या समोर ते तयार झाले , पण गावात मात्र धाक दाखवला. कोणी जमीन खरेदी करू नये नाही तर त्यांचे काय करू हे सांगता येणार नाही. नांगत पणाला तेथील शेतकरी घाबरले. कोणीही जमीन घ्यायला तयार होईना. काय करावे परत विवंचना सुरु झाली.

१९८१ साली गुरु आनंद्कृशिजी महाराजांचा चातुर्मास नाशिकला झाला. मी पण नाशिकला राहत होते. तो सुवर्णयोग सोडायचा नव्हता. आम्ही नाशिकला गिर्हायिक शोधायला सुरुवात केली. खरे तर नाशिक व शेती ह्यात १५० ते २०० मैलांचे अंतर होते , घेणार्याला ते सोयीचे नव्हते. पण काय चमत्कार , नाशिकचा एक गि-हाईक ती जमीन घ्यायला तैयार झाला. ८१००० रुपये रक्कम ठरली. दिवार ठरला. आम्ही नेवासे येथे गेलो. पण पार्टी तेथेही बिथरली. मी जमीन पेरली , एव्हढा खर्च झाला , मला तेव्हढे पैसे द्या तर मी ती जमीन सोडतो. शेवटी आईने त्यांची ती पण अट मान्य केली. त्यांना तेव्हडे पैसे दिले व सौदा पूर्ण करून नाशिकला परत आलो. त्या वर्षी गुरूंचा ८१ वा वाढदिवस होता. आईच्या मनात आनंद मावत नव्हता तशीच ती गुरुचरणी आली आणि ती आलेली तशीच्या तशी रक्कम त्यांच्या ८१ व्या वाढदिवसानिमित्त ८१ हजाराची थैली गुरूंच्या वाढदिवसा प्रीत्यर्थ समाजप्रमुखांच्या हाती सुपूर्द केली. त्या जामीनिसाठीचा विक्री साठी होणारा सर्व खर्च तिने आपल्या तुटपुंज्या मिळकतीतून केला. येणा-या रकमेतील एक पैसाही तिने वापरला नाही. अशा अनेक संकटांना तोंड देत , त्यातून समर्थपणे मार्ग काढीत , काट्या कुट्यांना बाजूला सारीत , कर्तव्य पार पाडीत , यशस्वी जीवन जगले. ह्याचे आमच्या गुरूंना खूप कौतुक होते , तिच्याबद्दल खूप आदर होता. आजही नगरच्या तीलोक बोर्ड स्थानकात संगमरवरी भिंतीवर तिचे नाव लिहिलेले आहे.

काही दिवसांनी म्हणजे १९८५ साली ग्यानी झैलसिंग , त्या काळचे राष्ट्रपती , अहमदनगरला येणार होते. त्यांच्या हस्ते अशा तेजस्वी मातेचे स्वागत करावे अशी त्यांची इच्छा होती. तसे त्यांनी आम्हाला सांगितलेही पण विधीला ते मान्य नव्हते , त्यापूर्वीच १८ फेबृअरी १९८५ रोजी अल्पशा आजाराने ती आम्हाला पोरके करून आपले जीवित कार्य संपवून हे जग सोडून गेली.







santoshi.world

खरंच प्रेरणादायी लेख आहे .............

jyoti salunkhe

kharach kay comment karave shabd suchat nahi pan khup inspirational lekh aahe