बैलपोळा-निबंध-8

Started by Atul Kaviraje, September 14, 2023, 11:49:41 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                        "बैलपोळा"
                                       -----------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-१४.०९.२०२३-गुरुवार आहे. आज "बैलपोळा" आहे. पोळा किंवा बैलपोळा हा श्रावण अमावस्या किंवा भाद्रपद अमावास्या या तिथीला प्रदेशानुसार साजरा करण्यात येणारा बैलांचा सण आहे. बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा हा एक मराठी सण असून हा विशेषतः विदर्भात भव्य पातळीवर साजरा केला जातो, विदर्भातील सीमेवर असलेल्या मध्य प्रदेश व तेलंगण सीमाभागातसुद्धा हा सण साजरा होतो. मराठी कवितेच्या माझ्या सर्व बंधू-भगिनी, कवी-कवियित्रीना बैलपोळाच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया, या सणIवर निबंध.

            पोळ्याच्या दिवशी बैलांची सजावट कशी केली जाते ?--

     बैल पोळा हा सण पावसाळ्यातील पेरणी संपल्यानंतर ऑगस्टच्या शेवटी किंवा सप्टेंबरच्या सुरूवातीच्या दिवसात बैल पोळा सण येतो. या दिवशी सकाळी बैलांना आंघोळ घातली जाते, माझे वडील तर बैलांना या दिवशी गरम पाणी वापरूनच अंघोळ घालतात. बैलांची शिंगे कोरली जातात. नंतर त्यांना रंगवले जाते.

     बैलांना रंगवण्यासाठी आम्ही रंग, फुले, माळा, घुंगरू, इत्यादी वस्तू घेऊन ठेवायचो. बैल पूर्णपणे सुकले कि त्यांना सजवले जाते. गळ्यात सुंदर घंटा बांधली जाते, पायात छमछम वाजणारे घुंगरू बांधले जातात, शिंगाना रंगबिरंगी फुले किंवा माळा लावल्या जातात. बैलांची शिंगे सुद्धा वेगवेगळे रंग वरून रंगवली जातात. सर्व शेतकरी आपल्या बैलांना कशा पद्दतीने अजून चांगले नटवता येईल याचा प्रयत्न करतात.

     या दिवशी काही ठिकाणी बैल पोळ्या दिवशी बैलांच्या साजवटीच्या स्पर्धा सुद्धा आयोजित केल्या जातात, या स्पर्धेत प्रथम येणाऱ्या बैल जोडीला बक्षीशे सुद्धा असतात म्हणून शेतकरी आपले बैल खूप मेहनत करून सजवतात. बैलाच्या पाठीवर एक सुंदर मऊ शाल टाकली जाते, शक्यतो ती गुलाबी किंवा लाल रंगाची असते.

     काही जण आपली कलात्मकता वापरून बैलाच्या अंगावर विविध रंगाचे आणि आकाराचे ठिपके सुद्धा काढतात. हे सर्व पाहणे डोळ्यांना वेगळाच आनंद देणारे असते.

     सजावट पूर्ण झाल्यावर गावातील सगळे शेतकरी आपआपल्या बैलांना घेऊन एका सार्वजनिक ठिकाणी जमतात जसे कि गावचा पार, गावचे मंदिर, चौकाचे ठिकाण, इत्यादी. सगळे लोक एकत्र जमल्यानंतर तिथे बैलांची पूजा केली जाते, सर्व लोक त्यांच्या पाया पडतात, त्यांच्या शेतकऱ्यांना करत असलेल्या मदतीला प्रणाम करतात आणि त्यांना पोळ्यासाठी बनवलेल्या विशिष्ट गोड नेवैद्य दिला जातो.

     आमच्या गावात सर्व बैल जोडींची मिरवणूक काढली जाते. वाजत गाजत त्यांची मिरवणूक गावच्या वेशीपर्यंत जाते आणि तिथून परत येते. वयस्कर लोक या दिवशी लेझीम सुद्धा खेळतात. यांनतर सर्व शेतकरी आपली बैल जोडी घेऊन घरी जातात. घरी गेल्यावर बैलांना गोड नेवैद्य दिला जातो.

              बैल पोळा सणाबाबत माझे मत--

     बैल पोळा हा सण बैलांनी शेतकरी वर्गाला शेतीमध्ये त्यांनी केलेल्या मदतीसाठी आभार मानण्यासाठी साजरा केला जातो. आजकाल शेतीसाठी अत्याधूनिक उपकरणे उपलब्ध झाली आहेत, आता लोक ट्रॅक्टर घेत आहेत आणि त्याच्या मदतीने शेतीची कामे करत आहेत. शेतीमध्ये बैलाचा वापर आजकाल फक्त गरीब शेतकरी करतात.

     वाढत्या तांत्रिक उपकरणांमुळे हळूहळू शेतीच्या कामांमध्ये बैलांचा वापर कमी होऊ लागला आहे, पूर्वी आमच्या गावी प्रत्येक घरी बैलजोडी होती आणि आता फक्त मोजक्या लोकांकडे बैलजोडी राहिली आहे. काही दिवसांनी बैलपोळा साजरा करणे एक परंपरा फक्त नावापुरती राहू शकते.

     बैल पोळा हा जरी महत्वाचा सण नसला तरी हे सण आपण साजरे केले पाहिजेत. आपल्या देशात ही आपली संस्कृती आहे आणि असे छोटे छोटे सण आपली संस्कृती जपून ठेवतात. मग ते बैल पोळा असो, गुढी पाडवा असो किंवा होळी असो. नवीन गोष्टी अवगत करत असताना आपण आपली संस्कृती सुद्धा जपली पाहिजे.

     तर हा होता बैल पोळा किंवा बेंदूर सणावर मराठी निबंध, मला आशा आहे की आपणास बैल पोळा वर मराठी निबंध (essay on Bail Pola in Marathi) आवडला असेल. जर आपल्याला हा लेख आवडत असेल तर हा लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका.

--by Marathi Social
----------------------

                      (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठीसोशल.कॉम)
                     -------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-14.09.2023-गुरुवार.
=========================================