दिन-विशेष-लेख-जागतिक ओझोन संरक्षण दिन-A

Started by Atul Kaviraje, September 16, 2023, 05:50:24 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                  "दिन-विशेष-लेख"
                           "जागतिक ओझोन संरक्षण दिन"
                          ----------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-16.09.2023-शनिवार आहे.  १६ सप्टेंबर-हा दिवस "जागतिक ओझोन संरक्षण दिन" म्हणूनही ओळखला जातो. वाचूया, तर या दिवसाचे महत्त्व, आजच्या या "दिन-विशेष-लेख" या शीर्षकI-अंतर्गत.

     १६ सप्टेंबर रोजी मॉन्ट्रियल प्रोटोकॉलवर सह्या केल्याच्या औचित्याने दरवर्षी जागतिक ओझोन दिवस साजरा केला जातो. ओझोन थराला नुकसान पोहोचवणाऱ्या पदार्थांचे उत्पादन आणि उपभोग टप्प्याटप्प्याने बंद करण्यासाठी आंतरराष्ट्रीय पर्यावरण करारावर स्वाक्षरी केल्याच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा होतो. याला १९८७ मध्ये सुरुवात झाली.

     ऑक्सिजनच्या दोन अणूपासून (Atom) तयार झालेला प्राणवायूचा (O२) रेणू मानवी जीवसृष्टीला (Human Life) जीवन प्रदान करतो, तर तीन अणूपासून तयार झालेला ओझोन (O३) वातावरणातील स्थितांबरमध्ये जीवसृष्टीचे अतिनील किरणांपासून संरक्षण (Protection From Ultraviolet Rays) करतो. ही प्रक्रिया नैसर्गिकरीत्या घडते. परंतु मानवनिर्मित क्लोरोफ्लोरोकार्बन सारख्या रासायनिक पदार्थामुळे ओझोनचे कवच (Ozone Shell) धोक्यात आले आहे. हे संरक्षण कवच आपण वाचविले नाही तर आपला विनाश अटळ आहे.

             ओझोनच्या दोन बाजू--

     पृथ्वीच्या सभोवती वातावरणाचे आवरण आहे. सुमारे ३० ते ३५ किलोमीटर उंचीवर स्थितांबर आहे. याच स्ट्रटोस्पिअरमध्ये, अर्थात वरच्या थरात ओझोन तयार होण्याची प्रक्रिया सतत सुरू असते. ऑक्सिजनचे ओझोनमध्ये रूपांतर झाल्यानंतर हा ओझोन सूर्याकडून पृथ्वीकडे येणारे अदृश्य अतिनील किरणे अडवितो. या अतिनील किरणांची विध्वंसकता भयावह आहे. निलकिरणांमुळे भूपृष्ठावरील जीवसृष्टी एका तासभरात नाहीशी होऊ शकते. त्यामुळे स्थितांबरातील ओझोनचा जाड थर जीवसृष्टीचे संरक्षक कवच आहे. त्याचवेळी हाच ओझोन पर्यावरणात मिसळल्यास प्रदूषक म्हणून काम करतो आणि प्रदूषणाला हातभार लावतो. त्यामुळे ओझोन वरच्या थरात जीवसृष्टीला कवच प्रदान करतो. तर खालच्या थरात प्रदूषकाची भूमिका वठवत जीवसृष्टी अडचणीत आणतो.

              ओझोन थराला विवर--

     ओझोन हा वायू अस्थिर आहे. बरेचदा आभाळात विजांचा कडकडाट झाला की तपांबरात उष्णतेने ऑक्सिजनचे रूपांतर ओझोनमध्ये होते व एक उग्रदर्प येतो. बरेचदा विद्युत रोहित्राजवळ या प्रकारचा वास येतो. वातावरणात प्रकाश रासायनिक क्रियेने ऑक्सिजनपासून ओझोनची निर्मिती होते. हा ओझोनचा थर अतिनील किरणांना पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश देत नसल्याने जीवसृष्टी अबाधित आहे. मात्र काहीसे विपरीत घडले आणि शास्त्रज्ञांना ओझोन वायूचा थर काही ठिकाणी पातळ झाल्याचे आढळून आले. १९८५ साठी ओझोन थराला पडलेले विवर उघडकीस आले. हे विवर दिवसेंदिवस वाढत असल्याने शास्त्रज्ञांसमोर मोठी चिंता निर्माण झाली आहे.

             क्लोरोफ्लोरोकार्बनने केला घात--

     स्थितांबरातील ओझोन थराच्या वाढत्या विवरामुळे पर्यावरण शास्त्रज्ञांमध्ये खळबळ उडाली. विवरांच्या कारणांचा शोध घेतला असता मानवनिर्मित क्लोरोफ्लोरोकार्बन (सीएफसी) या रासायनिक संयुगामुळे ओझोनचा क्षय होत असल्याचे लक्षात आले. ओझोनसोबत क्लोरोफ्लोरोकार्बनची अभिक्रिया होते. क्लोरीन आणि ब्रोमिनची मानवनिर्मित संयुगे ओझोन क्षयासाठी कारणीभूत आहे. यालाच ओझोन नाशक (ओझोन डिप्लेटिंग सबस्टंसेस) म्हणतात. त्यात विशेषतः सीएफसी तसेच इतर रसायनांचा समावेश होतो. ही संयुगे अतिशय स्थिर रचनेची असतात. शिवाय ती ज्वलनशील व विषारीही नसतात. यामुळे अनेक उद्योगधंद्यामध्ये त्यांचा मोठा प्रमाणावर वापर होतो.

     उदा. वातानुकूलित यंत्रे, फ्रिज, अग्निशमन यंत्रे. या वायूच्या स्थिर रचनेमुळे त्यांचे वातावरणातील आयुर्मानही जास्त असते. हे वायू स्थितांबरात हळूहळू घुसतात आणि अतिनील किरणांमुळे सीएफसीमधील रासायनिक बंध तुटतात व क्लोरीनमुक्त होतो. हा मुक्त क्लोरीनचा अणू ओझोनच्या रेणूवर हल्ला करतो. त्यामुळे ऑक्सिजनचा रेणू दुभंगतो व क्लोरीनशी संयोग पाहून क्लोरीन मोनॉक्साइड तयार होतो. आणि ओझोनचा रेणू अखेर ऑक्सिजनच्या रेणूत बदलतो. अशाप्रकारे क्लोरीनचा एक अणू ओझोनचे एक लाख रेणू नष्ट करू शकतो. याच अभिक्रियेतून ओझोन विवर तयार होते.

--डॉ. माधवी गुल्हाने
------------------

                         (साभार आणि सौजन्य-संदर्भ-अग्रोवोन.कॉम)
                        ---------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-16.09.2023-शनिवार.
=========================================