दिन-विशेष-लेख-KAMGAR SHIKSHAN DIN-B

Started by Atul Kaviraje, September 16, 2023, 05:55:06 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                   "दिन-विशेष-लेख"
                          "KAMGAR SHIKSHAN DIN"
                         -------------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-16.09.2023-शनिवार आहे.  १६ सप्टेंबर-हा दिवस "KAMGAR SHIKSHAN DIN" म्हणूनही ओळखला जातो. वाचूया, तर या दिवसाचे महत्त्व, आजच्या या "दिन-विशेष-लेख" या शीर्षकI-अंतर्गत.

     अमेरिकेत कामगार प्रशिक्षणाचे प्रधान ‌उद्दिष्ट कामगार संघटना अधिक सुसंघटित, प्रभावी व मजबूत करणे, हे आहे. येथील कामगार प्रशिक्षण कार्यक्रम कामगार संघटना, विद्यापीठे व शासन ह्यांच्या ‌त्रिविध जबाबदारीने चालतो. 'अमेरिकन फेडरेशन ऑफ लेबर' ह्या महासंघाने १९१८ पासून कामगार प्रशिक्षणाच्या प्रसाराचे कार्य सुरू केले. यामुळे अनेक कामगार महाविद्यालये स्थापण्यात आली व कामगार संघटना आपला स्वतःचा कामगार प्रशिक्षण कार्यक्रम तयार करू लागल्या. रशियात कामगार, सामुदायिक शेतांवरील शेतमजूर व शेतकरी, ह्या सर्वांना सायंवर्ग आणि पत्रद्वारा शिक्षण ह्या दोन पद्धतींवाटे माध्यमिक व उच्च शिक्षण उपलब्ध केले जाते. कॅनडा, बेल्जियम, फ्रान्स, इटली, स्वीडन, डेन्मार्क इ. देशांतूनही निरनिराळ्या मार्गांनी व पद्धतींनी कामगारांना प्रशिक्षित करण्यात येते.

     भारत : भारतातील कामगारांना प्रशिक्षण देण्याचे कार्य एवढे प्रचंड आहे, की शासन, मालक, कामगार संघटना, शिक्षणसंस्था व समाजकल्याणमंडळे ह्या सर्वांना संयुक्त रीत्या ही जबाबदारी पार पाडावी लागते. भारत सरकारने १९५७ साली औद्योगिक कामगारांमध्ये कामगार संघटना पद्धतींचे तत्त्वज्ञान आणि शिक्षण प्रसृत करण्याच्या उद्देशाने फोर्ड फाउंडेशन तज्ञांची एक ‌समिती नेमली. ह्या समितीच्या शिफारशीनुसार सरकारने 'केंद्रीय कामगार प्रशिक्षण मंडळ' स्थापन केले. या मंडळाकडे सर्व देशभर कामगार प्रशिक्षण योजनेचा प्रसार करण्याचे कार्य मजूर, रोजगार व पुनर्वसन मंत्रालयाद्वारा सोपविण्यात आले. जो कामगारसंघटना सम्यक्‌ पद्धतींनी हाताळू शकेल, नेतृत्वाकरिता जो बाहेरच्यांवर फारसा अवलंबून राहणार नाही, किंवा जो बाहेरील पक्षांकडून पिळला जाणार नाही; असा बहुश्रुत, विधायक आणि जबाबदार कामगारवर्ग निर्माण करावयाचा, असे या योजनेचे उद्दिष्ट होते.

     कामगार प्रशिक्षण योजनेचे तीन टप्पे आहेत : पहिल्या टप्प्यात अतिशय उच्च पातळीवरील निदेशकांना – ज्यांना 'अध्यापक प्रशासक' (आता 'शिक्षण-अधिकारी') म्हणतात-प्रशिक्षण दिले जाते. हे निदेशक सामाजिक विज्ञानांतर्गत पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण केलेले असतात. निदेशकांची भरती गुणवत्तेनुसार केली जाऊन त्यांना सहा महिन्यांचे प्रशिक्षण दिले जाते व नंतर त्यांना विविध प्रादेशिक केंद्रांवर नेमण्यातयेते. या ठिकाणी हे शिक्षण-अधिकारी निवडक कामगारांना तसेच पूर्णवेळ कामगार संघटनांच्या अधिकार्‍यांना तीन महिने मुदतीचा पूर्णवेळ अभ्यासक्रम शिकवितात. अशा प्रकारच्या प्रशिक्षित कामगारांना 'कामगार-अध्यापक' (वर्कर-टीचर) असे म्हणतात. हा दुसरा टप्पा होय. हे कामगार-अध्यापक आपापल्या नोकरीच्या जागी जाऊन, इतर कामगारांना कामाची वेळ सोडून उरलेल्या वेळी शिकवितात. या योजनेचा हा तिसरा व अखेरचा टप्पा होय. या तीनही टप्प्यांकरिता केंद्रीय मंडळाच्या एका उप‌समितीने पाठ्यक्रम तयार केलेले असतात. केंद्रीय कामगार प्रशिक्षण मंडळ कामगार संघटनांना व निवडक शैक्षणिक संस्थांना प्रशिक्षण कार्यक्रम चालविण्याकरिता अनुदाने देते.

--लेखक - वि. रा गद्रे.
--स्त्रोत - मराठी विश्वकोश
-----------------------

                    (साभार आणि सौजन्य-संदर्भ-mr.विकासपीडिया.इन)
                   ----------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-16.09.2023-शनिवार.
=========================================