हरितालिका-माहिती-12

Started by Atul Kaviraje, September 18, 2023, 06:23:41 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                      "हरितालिका"
                                     -------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-१८.०९.२०२३-सोमवार आहे. आज "हरितालिका" आहे. हरितालिका हे व्रत महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, झारखंड, मध्यप्रदेश, बिहार, राजस्थान या राज्यात साजरे केले जाते. प्रत्येक ठिकाणी पूजेची प्रथा वेगळी असली, तरी शिव-पार्वतीची उपासना म्हणूनच हे व्रत केले जाते. यंदा सोमवार 18 सप्टेंबर 2023 रोजी हरितालिका व्रत केले जाणार आहे. मराठी कवितेच्या माझ्या सर्व बंधू-भगिनी, कवी-कवियत्रीस हरितालिकेच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया, हरितालिकेवर महत्त्वाची माहिती.

          हरतालिका तीज व्रत कथा मराठी (Hartalika Puja Vrat Katha Marathi) –

     भगवान शंकर आणि माता पार्वती कैलास पर्वतावर बसले होते. त्यावेळी पार्वतीने शंकराला विचारले, देवा, सर्व व्रतात चांगले व्रत कोणते? श्रम थोडे आणि फळ पुष्कळ, असे एखादे व्रत असेल, तर मलाही सांगा आणि कोणत्या पुण्याईने ते आपल्या पदरी पडले ? हेही सांगा. तेव्हा भगवान शंकर म्हणाले, जसे नक्षत्रात चंद्र श्रेष्ठ, चार वर्णात ब्राह्मण श्रेष्ठ, देवांमध्ये विष्णू श्रेष्ठ, ग्रहांमध्ये सूर्य श्रेष्ठ आणि नद्यांमध्ये गंगा श्रेष्ठ त्याचप्रमाणे सर्व व्रतांमध्ये हरितालिकेचे व्रत हे सगळ्यात श्रेष्ठ आहे.

     हे व्रत करून तू मला प्राप्त केले होते. हे व्रत भाद्रपद महिन्यातल्या पहिल्या तृतीयेला करावे. मी तुला प्राप्त व्हावे म्हणून हे 64 वर्ष झाडाची पिकलेली पाने खाऊन थंडी पाऊस ऊन सहन करून केले होतेस. तुझे हे श्रम पाहून तुझ्या वडिलांना फार दुःख झाले, आणि अशी कन्या कोणास द्यावी अशी चिंता त्यांना पडली. त्याचवेळी त्याठिकाणी नारद मुनी आले. हिमालयाने त्यांची पूजा व येण्याचे कारण विचारले तेव्हा नारद मुनी म्हणाले, तुमची कन्या उपवर झाली आहे, ती विष्णूला द्यावी तो तिच्या योग्य नवरा आहे त्यांनीच मला तुमच्याकडे मागणी करण्यासाठी पाठवले आहे, म्हणून मी इथे आलो आहे.

     हिमालय राजाला फार मोठा आनंद झाला आणि त्यांनी ही गोष्ट मान्य देखील केली. त्यानंतर नारद मुनी विष्णूकडे निघून आले, आणि त्यांनाही बातमी दिली. नारद मुनी त्या ठिकाणाहून निघून गेल्यानंतर तुझ्या वडिलांनी तुला ही गोष्ट सांगितली. ही गोष्ट तुला आवडली नाही, आणि तू रागावलीस. तुझ्या रागावण्याचे कारण ज्यावेळी तुझ्या सखीने तुला विचारले, त्यावेळी भगवान शंकरा वाचून मला दुसरा पती करणे नाही, असा माझा निश्चय आहे, असे तू तिला सांगितले. आता यासाठी काय उपाय करावा ?

     म्हणून मग तू एका घोर अरण्यात गेलीस. त्या ठिकाणी गेल्यावर, तिथे एक नदी दृष्टीस पडली. जवळच एक गुहा देखील होती. या गुहेमध्ये जाऊन तू उपवास केलास. तिथे माझे लिंग स्थापन केलेस आणि दिवस रात्र त्याची पूजा केलीस. जागरण केलेस. या तुझ्या व्रताने मी तुला प्रसन्न होऊन दर्शन दिले आणि वर मागण्या सांगितले. त्यावेळी तू म्हणालीस की, तुम्ही माझे पती व्हावे याशिवाय दुसरी माझी कोणतीही इच्छा नाही. नंतर मी ही गोष्ट मान्य केली व त्या ठिकाणाहून निघून गेलो.

     दुसऱ्या दिवशी तू ही व्रत पूजा विसर्जन केलीस. तुझ्या सखीसह पूजेची सांगता केलीस. त्याचवेळी तुझे वडील त्या ठिकाणी आले आणि त्यांनी तुला इकडे पळून येण्याचे कारण विचारले. त्यानंतर झालेली सर्व हकीकत तू आपल्या वडिलांना सांगितलीस. त्यामुळे वडिलांनी तुझे माझ्याबरोबर लग्न लावून देण्याचे वचन घेऊन, तुला घरी घेऊन गेले. त्यानंतर काही दिवसांनी चांगला मुहूर्त पाहून त्यांनी आपले लग्न लावून दिले. ज्या व्रताने तुझी इच्छा पूर्ण झाली त्या व्रताला हरितालिका व्रत असे म्हणतात.

                     (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठीझटका.कॉम)
                    -------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-18.09.2023-सोमवार.
=========================================