हरितालिका-माहिती-14

Started by Atul Kaviraje, September 18, 2023, 06:26:21 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                        "हरितालिका"
                                       -------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-१८.०९.२०२३-सोमवार आहे. आज "हरितालिका" आहे. हरितालिका हे व्रत महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, झारखंड, मध्यप्रदेश, बिहार, राजस्थान या राज्यात साजरे केले जाते. प्रत्येक ठिकाणी पूजेची प्रथा वेगळी असली, तरी शिव-पार्वतीची उपासना म्हणूनच हे व्रत केले जाते. यंदा सोमवार 18 सप्टेंबर 2023 रोजी हरितालिका व्रत केले जाणार आहे. मराठी कवितेच्या माझ्या सर्व बंधू-भगिनी, कवी-कवियत्रीस हरितालिकेच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया, हरितालिकेवर महत्त्वाची माहिती.

            हरतालिका तृतीया 2023 शुभ मुहूर्त, संपूर्ण पूजा विधि आणि नियम--

      गणेश चतुर्थींच्या आदल्या दिवशी म्हणजे भाद्रपद शुद्ध तृतियेला "हरतालिका` असे म्हणतात.या दिवशी मुली व सुवासिनींनी सुवासिक तेल लावून स्नान करावे. स्नान केल्यानंतर स्वच्छ केलेल्या जागेवर एका जागी चौरंग ठेवावे. रांगोली काढून व केळीच्या खांबांनी चारही बाजूंनी सुशोभित केलेल्या चौरंगावर वाळू आणून पार्वती आणि सखीसह शिवलिंग स्थापित करावे. उजव्या बाजूस तांदळाच्या एका ढिगावरील सुपारीवर किंवा नारळावर गणपती मांडावा. समोर पाच विडे मांडून तेथे सुपारी, खारीक, बदाम, नाणे, फळ ठेवावे.

     सर्वप्रथम स्वत:ला हळद कुंकु लावून देवासमोर विडे ठेवावे. अक्षता, हळद कुंकु वाहून मनोभावे नमस्कार करावा. घरातील वडीलधार्‍या मंडळींना नमस्कार करून नंतर पूजा प्रारंभ करावी. पूजा करण्यापूर्वी दिव्यांची पूजाही करावी. सर्वप्रथम गपपतीची आणि नंतर महादेव व सखी-पार्वतीची षोडशोपचारे पूजा करावी. पूजेसाठी घेतलेले साहित्य विधीपूर्वक देवाला अर्पित करावे. पूजेसाठी लागणारे साहित्य असे आहे: चौरंग, रांगोळी, तांदूळ, पाण्याचा कलश, ताम्हण, पळी, पंचपात्र, तसराळ, आसन, निरांजन, शंख, घंटा, समई, कापूरारती, हळदकुंकू, अष्टगंध, गुलाल, बुक्का, चंदन, अक्षता, उदबत्ती, कापूर, तुपाच्या व तेलाच्या वाती, अत्तरफाया, विड्याची पाने, सुपार्‍या, बदाम, खारका, नारळ, फळे, खडीसाखर, गूळखोबरे, पंचामृत, कापसाचे वस्त्र, कोरे वस्त्र, तसेच फणी, काजळ, गळेसरी, कांकणे, आरसा इत्यादी सौभाग्यद्रव्ये. याव्यतिरिक्त फुले, दूर्वा, तुलसीपत्रे, व झाडांची पाने.

     पूजा केल्यावर धूप-दीप, नैवेद्य दाखवून पत्री वाहावी. हरतालिकेच्या पूजेत जी पत्री वाहतात त्यांचे क्रम असे आहे: बेल, आघाडा , मधुमालती , दूर्वा , चाफा , कण्हेर , बोर , रुई , तुळस , आंबा , डाळिंब , धोतरा , जाई , मरवा , बकुळ, अशोकाची पाने वाहावी. नंतर मनोभावे प्रार्थना करावी. कुमारिकेने इच्छितत वर मिळविण्यासाठी तर सुवासिनीने अखंड सौभाग्य लाभू दे अशी प्रार्थना करावी. दिवसभर कडक उपोषण करावे. शक्य नसल्यास फलाहार करावा. या दिवशी आगीवर बनविलेला कोणताही पदार्थ खात नाहीत. नंतर रात्रभर झिम्मा, फुगडी, टिपऱ्या, गोफ इत्यादी खेळ खेळत जागरण करून हरतालिकेची कथा ऐकून, आरती करून बारानंतर रूईच्या पानावर दही घालून ते चाटावे. दुसर्‍या दिवशी उत्तरपूजा करून ती लिंगे विसर्जन करावी.

     हिंदू धर्मात भाद्रपद महिन्यात महत्तवाचं व्रत म्हणजे हरतालिका. भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या तृतीयेला हरतालिका व्रत केलं जातं. असे मानले जाते की स्त्रिया अखंड सौभाग्य आणि सुखी वैवाहिक जीवनासाठी हा उपवास करतात. हा उपवास सर्व उपवासामध्ये सर्वात कठीण परंतु श्रेष्ठ मानला गेला आहे. या दिवशी कडक उपोषण करुन पाणीही पिऊ नये अशी रुढी आहे. या दिवशी मुली व सुवासिनी शिवलिंगे स्थापित करुन भक्तिपूर्वक पूजा करतात. अविवाहित मुली योग्य वर मिळवण्यासाठी हरतालिका व्रत ठेवतात. हरतालिका व्रत नियम पाळल्यास नक्की फळ प्राप्ती होईल.

                    (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठी.वेबदुनिया.कॉम)
                   ----------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-18.09.2023-सोमवार.
=========================================