ऋषीपंचमी-माहिती-6

Started by Atul Kaviraje, September 20, 2023, 05:19:31 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje


                                      "ऋषीपंचमी"
                                     ------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-२०.०९.२०२३-बुधवार आहे. आज "ऋषीपंचमी" आहे. असे म्हटले जाते की, ऋषीपंचमीचे व्रत केल्यामुळे आपल्या हातून घडलेल्या पापांची मुक्तता होते. तसेच दोषांपासून निवारण होते. पितरांच्या नावाने दानधर्म केला तर आपली रखडलेली कामे देखील पूर्ण होतात. मराठी कवितेच्या माझ्या सर्व भाऊ-बहीण, कवी-कवियत्रींना ऋषीपंचमीच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया, ऋषीपंचमी वर महत्त्वाची माहिती.

           ऋषि पंचमी व्रत कथा (Rishi panchami Story)--

     एका गावामध्ये एक शेतकरी ब्राह्मण राहत होता. तो आपली शेतीभाती करून सुखाने नांदत होता. एके दिवशी त्याच्या बायकोला मासिक पाळी आल्यामुळे ती तसाच विटाळ घेऊन संपूर्ण घरभर वावरली. यामुळे तिचा नवरा पुढच्या जन्मी बैल झाला. आणि तिला कुत्रीचा जन्म आला. तिच्या या पापामुळे देवाची करणी झाली. दोघेही पुन्हा आपल्या मुलाच्या घरी आली. तो मुलगा मोठा धार्मिक होता. पूजा अर्चा, देवधर्म करी. आलेल्या ब्राह्मणांचा आदर करी, त्यांना भोजन अर्पण करी.

     एके दिवशी त्याच्या घरी श्राद्ध होते. त्यामुळे त्यांनी आपल्या बायकोला सांगितले की, आज माझ्या आईचे श्राद्ध आहे. तिने श्राद्धाच्या दिवशी खिरपुरीचा स्वयंपाक केला. इतक्यात एक चमत्कार झाला, खिरीचे भांडे उघडे होते, त्यात सर्पाने आपली गरळ टाकली. हे त्या कुत्रीने पाहिले. त्या कुत्रीच्या मनात विचार आला की, ब्राह्मणांनी ही खीर खाल्ली तर ते मरून जातिल. आणि आपल्या मुलाला ब्रह्म हत्येचे पाप लागेल. म्हणून ती खिरीच्या पातेल्याला शिवली. हे पाहून ब्राह्मणाच्या बायकोला राग आला. तिने जळते कोलीत घेऊन त्या कुत्रीच्या कमरेत मारले. त्याचप्रमाणे तो स्वयंपाक देखील टाकून दिला आणि पुन्हा स्वयंपाक करून ब्राह्मणांना जेऊ घातले.

     यामुळे त्यादिवशी त्या कुत्रीला उपासमार झाली. रात्र झाली तशी ती आपल्या नवऱ्याजवळ म्हणजे बैलाजवळ गेली आणि रडू लागली. बैलाने तिला कारण विचारले, तशी ती म्हणाली की, मी आज उपाशी आहे. मला अन्न, पाणी काहीही मिळाले नाही. खिरीच्या पातेल्यात सापाने गरळ टाकली ते माझ्या दृष्टीस पडले. ब्राह्मण मरतील म्हणून मी त्या पातेल्यात जाऊन शिवले. त्यामुळे माझ्या सुनेला राग आला आणि तिने जळके कोलीत माझ्या कमरेत घातले.

     त्यामुळे माझे संपूर्ण अंग दुखत आहे. याला मी काय करू? बैलाने उत्तर दिले. तू आदल्या जन्मी विटाळशीचा विटाळ घरात कालवलास. त्याचा संपर्क मला झाला. त्या दोषाने मी बैल झालो. आज माझ्या मुलाने मला नांगराला धरलं, तोंड बांधून मला मारलं. मी देखील आज उपाशीच आहे. त्यांचे श्राद्ध फुकट गेलं. हे भाषण त्याच्या मुलाने ऐकले. आणि लगेच उठून तो बाहेर आला. बैलाला चारा घातला, कुत्रीला अन्न घातलं. दोघांना पाणी प्यायला दिले. मनातून मात्र फार दु खी झाला.

     दुसऱ्या दिवशी सकाळी उठून घोर अरण्यात गेला. त्या ठिकाणी ऋषींचा मेळा भरला होता. त्यांना साष्टांग नमस्कार करून त्या ऋषींनी त्या मुलाला प्रश्न केला की, तू असा चिंताक्रांत का दिसत आहेस? मुलाने सांगितले माझ्या बापाला बैलाचा जन्म आला आहे आणि आईला कुत्रीचा जन्म आला. त्यांना मोक्ष कसा मिळेल? या चिंतेत मी पडलो आहे. यावर काही उपाय असेल तर मला सांगा. त्यावेळी ऋषींनी सांगितले की तू ऋषीपंचमीचे व्रत कर.

     भाद्रपद महिन्याच्या पाचव्या दिवशी ही पंचमी येते. या दिवशी नदीवर जावे. आघाड्याची प्रार्थना करावी. त्याच्या देठाने दात घासावे. आवळकाठी कुटून घ्यावी. त्याचप्रमाणे तीळ देखील वाटून घ्यावे. व ते तेल केसाला लावावे आणि मग आंघोळ करावी. आणि अरुंधती सह सप्त ऋषींची पूजा करावी. अशी सात वर्ष केल्यानंतर शेवटी आठव्या वर्षी त्याचे उद्यापन करावे. या व्रताने मासिक पाळीपासून आलेला दोष नाहीसा होतो. पापांपासून मुक्तता होते. आणि पुण्य लाभते. त्याचप्रमाणे मनातील इच्छा पूर्ण होतात.

     घरी जाऊन त्यांच्या मुलानेही व्रत पूर्ण केले. त्यामुळे त्याचे पुण्य त्याच्या आई-बाबांना मिळाले. आई-वडिलांची पापापासून, दोषापासून मुक्तता झाली. बैल होता तो सुंदर पुरुष झाला आणि कुत्री एक सुंदर स्त्री झाली. दोघेही विमानात बसून स्वर्गात गेली. यामुळे मुलाचा हेतू पूर्ण झाला. म्हणून हे ऋषीपंचमीचे व्रत आजही आपण मोठ्या भक्तीभावाने मोठ्या आनंदात करतो.

     अशी आहे ऋषि पंचमी व्रत कथा.

                       (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठी झटका.कॉम)
                      --------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-20.09.2023-बुधवार.
=========================================