दिन-विशेष-लेख-जागतिक बालदिन-B

Started by Atul Kaviraje, November 20, 2023, 08:44:17 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje


                                    "दिन-विशेष-लेख"
                                   "जागतिक बालदिन"
                                  ------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-20.11.2023-सोमवार आहे. २०-नोव्हेंबर, हा दिवस "जागतिक बालदिन" म्हणूनही ओळखला जातो. वाचूया, तर या दिवसाचे महत्त्व, आजच्या या "दिन-विशेष-लेख" या शीर्षकI-अंतर्गत.

     वैशिष्ट्य :- बालदिनानिमित्त विभूतिपूजा टाळून, बालकांच्या गरजा व हक्क यांबाबत राष्ट्रातील पालकांमध्ये जाणीवजागृती निर्माण केली जाते. पंडित नेहरू यांचा धीरोदात्तपणा, वीरवृत्ती, असामान्य चरित्र व चारित्र्य, अथांग मानवता हे बालकांमध्ये संक्रमित करण्याचा प्रयत्न केला जातो. कविवर्य रवींद्रनाथ टागोर (Ravindranath Tagore) यांनी म्हटल्याप्रमाणे 'जवाहरलाल म्हणजे ऋतुराज'. हा 'ऋतुराज' मुलामुलींमध्ये खुलवून त्यांचे जीवन आनंदी बनविण्याचा प्रयत्न केला जातो. मुलांच्या व्यक्तिमत्त्वाची जडणघडण होण्यासाठी अशा दीपस्तंभाची गरज असते. ती भागविण्याचा येथे अल्पसा प्रयत्न सुरू आहे; परंतु आज शिक्षणपद्धतीकडे नेहरूंच्या दृष्टीने पाहिले जात नाही. त्यामुळे नको त्या वयात नको ते गुन्हे बालकांकडून घडत आहेत. त्यांची मने 'कोडगी' बनल्यामुळे भावनिक बुद्धिमत्ता कमी झाली आहे, याची पालकांना जाणीव राहिलेली नाही. बालगुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहे. याचे कारण आपण संस्काराला कमी पडत आहोत. इंग्रजी माध्यमाच्या शाळांचे वाढते प्रमाण, प्रादेशिक भाषेतील शाळांमधील घटती विद्यार्थिसंख्या; व्यापारी दृष्टिकोनातून शाळा काढून संस्थाचालक संस्थानिक बनले आहेत. शिक्षकप्रशिक्षणाचा कणाच मोडला आहे. पूर्व माध्यमिक शिक्षणाकडे अक्षम्य दुर्लक्ष झाल्यामुळे आज भ्रष्टाचार वाढला आहे. त्यासाठी चांगल्या चारित्र्याचे शिक्षक, पालक, संस्थाचालक, राज्यकर्ते इत्यादींची गरज आहे. त्यांची निर्मिती बालशिक्षणातून केली पाहिजे. केवळ 'बालआनंद मेळावा', 'बालमहोत्सव', 'बालदिन' यांसारख्या दिवशी मनोरंजनात्मक कार्यक्रम साजरे न करता त्यांतून मुलामुलींमध्ये कुटुंब, समाज, देश इत्यादींबद्दल आपुलकीची भावना निर्माण झाली पाहिजे आणि त्यांप्रती उचित कार्य करण्याची प्रेरणात्मक शिकवण दिली पाहिजे.

     बालशिक्षणाच्या बाबतीत अनुताई वाघ (Anutai Wagh), ताराबाई मोडक (Tarabai Modak), साने गुरुजी (Sane Guruji), राजा मंगळवेढेकर, भा. रा. भागवत इत्यादींचे योगदान मोठे आहे. याची जाण व भान ठेवून शासकीय स्तरावर पूर्व प्राथमिक शिक्षणाकडे लक्ष दिले पाहिजे.

     बालदिनी डिजिटल एज्युकेशनचे स्वप्न आपण पाहतो. मुलामुलींसाठी निबंध, चित्रकला, वक्तृत्वस्पर्धा, खेळ, गाणी, नृत्य व विविध सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करतो. बालकल्याणकारी योजनांची खैरात केली जात आहे. निराधार, वंचित मुलांसाठी आश्रमशाळा काढून शिक्षण देण्याचा प्रयत्न केला आहे. २००२ पासून 'चाचा नेहरू बाल महोत्सवʼ सुरू करण्याची प्रथा शासकीय स्तरावर सुरू आहे. असे असले, तरी थोर शिक्षणतज्ज्ञ रूसो यांच्या 'मुलाला मूल म्हणून जगू द्याʼ या विचाराचा पालकांमध्ये विसर पडत चालला आहे. आपला पाल्य शिक्षणात मागे राहणार नाही, या हव्यासापोटी शाळा, ट्यूशन, व्यक्तिमत्त्वविकसनाच्या व्यापारी तत्त्वावर संक्रमित होणाऱ्या चुकीच्या प्रथा इत्यादी बालकांवर बळजबरीने लादल्याने बालकांची दमछाक होते. फक्त दप्तराचे ओझे कमी करून चालणार नाही, तर त्यांच्या मनावरील ताण कसा कमी होईल, याची जाण व भान प्रत्येक पालकाने ठेवले पाहिजे. बालक हे औपचारिक शिक्षणात तसेच कुटुंबाच्या दडपणाखाली न राहता ते हसतखेळत शिकले पाहिजे, वाढले पाहिजे.

--Post author:शंकर धनवडे
---------------------------

                      (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठी विश्वकोश.ऑर्ग)
                     ---------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-20.11.2023-सोमवार.
=========================================

CHECK OUT MY SOCIALS -

INSTAGRAM - https://instagram.com/atul_chya_kavita
PINTEREST - https://www.pinterest.com/chyakavitaatul55/
TWITTER(X)- https://twitter.com/AtulChyaKavita
YOUTUBE   - https://www.youtube.com/@atulchyakavita4928/videos
FACEBOOK  - https://www.facebook.com/atulchyakavita
=========================================