दिन-विशेष-लेख-उत्क्रांती दिन-B

Started by Atul Kaviraje, November 24, 2023, 09:40:56 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                  "दिन-विशेष-लेख"
                                    "उत्क्रांती दिन"
                                 -----------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-24.11.2023-शुक्रवार आहे.  २४ नोव्हेंबर, हा  दिवस "उत्क्रांती दिन" म्हणूनही ओळखला जातो. वाचूया, तर या दिवसाचे महत्त्व, आजच्या या "दिन-विशेष-लेख" या शीर्षकI-अंतर्गत--(लेख क्रमांक-२)

           उत्क्रांतीचा इतिहास--

     पिअर लुईस मोरो-द-मॉपर्टिस (१६९८-१७५९) याने उत्क्रांतीचा सिद्धांत प्रथम मांडला, असे मानतात. आनुवंशिक पदार्थ, जे कणांच्या स्वरुपात असतात, मात्यापित्यांकडून संततीत उतरतात, असे त्याचे मत होते.

     इ.स. १८०१ मध्ये फ्रेंच निसर्गतज्ज्ञ झां बातीस्त लामार्क याने  उत्क्रांतीचा सिद्धांत मांडला. अवयवांचा 'वापर आणि बिनवापर' या कल्पनेवर आधारित लामार्कचा सिद्धांत होता. सजीवांच्या अवयवांचा जसा वापर होतो तसा त्यांच्यात बदल होतो. ज्या इंद्रियांचा, अवयवांचा सतत वापर होतो, ते वाढतात आणि मजबूत होतात आणि ज्यांचा वापर कमी होते ते संकोचतात. हा आनुवंशिक गुणधर्म असून तो पुढच्या पिढीत उतरतो, असे लामार्कचे मत होते. त्याच्या मते, जिराफाची मान लांब असते कारण झाडाच्या शेंड्याकडील पाने खाण्यासाठी पिढ्यानपिढ्या मान लांब होत गेली आहे. सुरुवातीला लामार्कची कल्पना लोकांना पटली. मात्र, पुढे आनुवंशिकता विज्ञानात झालेल्या संशोधनामुळे ही कल्पना नाकारली गेली.

     या कालावधीत टॉमस मॅल्थस या ब्रिटिश अर्थशास्त्रज्ञाने लोकसंख्येच्या वाढीसंबंधी 'एसे ऑन द प्रिन्सिपल ऑफ पॉप्युलेशन' हा ग्रंथ लिहीला. या ग्रंथाने सर्व निसर्गवाद्यांना नैसर्गिक निवडीच्या निकषांकडे वेधून घेतले. दुष्काळ आणि रोग इत्यादींमुळे लोकसंख्या मर्यादित राहते, असे या ग्रंथात म्हटले आहे.

     वीस वर्षांहून अधिक काळ प्रयोग आणि निरिक्षणांतून १८५८ साली चार्ल्स डार्विन यांनी  नैसर्गिक निवडीवर आधारित उत्क्रांती सिद्धांत मांडला. सर्व जातींची उत्पत्ती काही मोजक्या पूर्वजांपासून नैसर्गिक निवडीच्या निकषांनुसार झालेली आहे, असे डार्विनचे मत होते. याच दरम्यान अ‍ॅल्फ्रेड वॉलिस या ब्रिटिश निसर्गतज्ज्ञाला डार्विनसारखीच निरीक्षणे आढळली होती. वॉलिसचा सिद्धांत डार्विनच्या सिद्धांताला पूरक असून हा सिद्धांत आता सर्वमान्य झाला आहे. डार्विनने लिहिलेल्या 'ओरिजीन ऑफ स्पिशीज' या ग्रंथात हे विवेचन दिले आहे. नंतर टॉमस हक्सली या ब्रिटिश प्राणिशास्त्रज्ञाने आणि इतरांनी डार्विनचे कार्य पुढे आणले.

     डार्विनने सिद्धांत मांडण्यासाठी तीन प्रमुख स्त्रोतांचा आधार घेतला आहे: १. वैयक्तिक निरीक्षणे, २. सर चार्ल्स लायेल या ब्रिटिश वैज्ञानिकाचा भूशास्त्रीय सिद्धांत आणि ३. टॉमस मॅल्थसने मांडलेला लोकसंख्यावाढीचा सिद्धांत. १८३१ ते १८३६ अशी पाच वर्षे 'बीगल' या जहाजावरून निसर्गतज्ज्ञ म्हणून डार्विनने प्रवास केला. दक्षिण अमेरिकेच्या सागरकिनारी जहाज थांबलेले असता डार्विनने अनेक प्राणी, वनस्पतींचे नमुने गोळा केले आणि त्यांबद्दल सविस्तर नोंदी लिहिल्या. तेथील गालॅपागस बेटावरील जातींचे प्रकार पाहून डार्विन प्रभावित झाला. या बेटांवरील आणि समुद्रकिनार्‍यालगतच्या भूखंडावरील जातींमध्ये त्याला फरक आढळले. तसेच त्याला प्रत्येक बेटावरील जातींमध्ये भेद असल्याचे लक्षात आले. सर्व सजीव ते जसे आहेत त्याच स्वरुपात अस्तित्वात आले असून जातींच्या उत्पत्तींसंबंधी वेगळे काही कारण असावे, असे त्याचे मत झाले.

     सर चार्ल्स लायेल याने मांडलेला पृथ्वीच्या उत्पत्तीचा इतिहास तसेच मॅल्थस याने मांडलेला जीवसृष्टी आणि पर्यावरण यांमधील संबंधाचा सिद्धांत, या दोन्हींचा डार्विनवर प्रभाव पडला होता. १८३० साली लायेलने  प्रिन्सिपल्स ऑफ जिऑलॉजी' या ग्रंथात 'प्रदीर्घ कालावधीत घडून आलेल्या नैसर्गिक प्रक्रियांद्वारे पृथ्वीची उत्पत्ती झाली' असे म्हटले आहे. १७९८ साली मॅल्थसने असे लिहिले, मानवी लोकसंख्या ठराविक प्रमाणाबाहेर वाढली तर अन्नधान्याचा तुटवडा पडू शकतो. अशा स्थितीत दुष्काळ, युद्ध आणि रोगराई इत्यादींमुळे लोकसंख्येवर नियंत्रण राहते. हे नियंत्रण न राहिल्यास जगभरातील लोकसंख्या बेसुमार वाढून माणसाला केवळ उभे राहण्यापुरतीच जागा मिळेल. मॅल्थस याचा सिद्धांत डार्विनने इतर प्राणी व वनस्पती यांना लावून पाहिला आणि असे अनुमान काढले की प्राणी आणि वनस्पती यांच्या संख्येवर पर्यावरणातील घटकांचे नियंत्रण असते. त्यांची संख्या प्रमाणाबाहेर वाढली तर अन्न व निवारा यांचा तुटवडा पडेल. अशा परिस्थितीत आवश्यक गरजांसाठी आणि प्रजननासाठी जे धूर्त, चपळ आणि मजबूत असतील अशांनाच या गोष्टी मिळून इतरांची उपासमार होऊन ते मरतील. ही एक प्रकारची नैसर्गिक निवड आहे. यावरुन डार्विनने असा निष्कर्ष मांडला की, कोणत्याही पर्यावरणात जे प्राणी सक्षम असतील तेच प्राणी टिकून राहतात, प्रजनन करतात आणि आनुवंशिकतेमुळे त्यांची वैशिष्टये पुढील पिढीत उतरतात.

                       (साभार आणि सौजन्य-संदर्भ-विकास पीडिया.इन)
                     -------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-24.11.2023-शुक्रवार.
=========================================