दिन-विशेष-लेख-उत्क्रांती दिन-C

Started by Atul Kaviraje, November 24, 2023, 09:42:39 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje


                                   "दिन-विशेष-लेख"
                                     "उत्क्रांती दिन"
                                 ------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-24.11.2023-शुक्रवार आहे.  २४ नोव्हेंबर, हा  दिवस "उत्क्रांती दिन" म्हणूनही ओळखला जातो. वाचूया, तर या दिवसाचे महत्त्व, आजच्या या "दिन-विशेष-लेख" या शीर्षकI-अंतर्गत--(लेख क्रमांक-२)

     डार्विन याचा सिद्धांत सखोल निरीक्षणांवर आधारित असला तरी त्यात काही उणिवा राहिल्या होत्या. प्रत्येक पिढीत आवश्यक बदल का घडून येतात? याबद्दल डार्विनला माहिती नव्हती. ग्रेगोर मेंडेल याने १८६५ साली वाटाण्याच्या वेलीसंबंधी प्रयोग केले होते. त्याला असे आढळून आले होते की वेलीच्या एका पिढीत असणारे प्रभावी आणि अप्रभावी गुण पुढच्या पिढीत संक्रमित होतात, हे गणिती सूत्राद्वारे सांगता येते. १९०१ साली  ह्यूगो द.व्हरीस, कार्ल कॉरेन्स आणि एरि चेरमाख मेंडेल याचे संशोधन जगासमोर मांडून गूणसूत्रावरील जनुकांमुळे प्राण्यांची आनुवंशिक लक्षणे पुढील पिढीत उतरतात, हे दाखविले हे संशोधन डार्विन याच्या सिद्धांताला बळकटी आणणारे ठऱले. १९२५ सालापासून आनुवंशिकता विज्ञानाचा वेगाने विकास झाला. त्यातून डार्विनच्या काही कल्पना अपुर्‍या वा चुकीच्या असल्या तरी उत्क्रांती घडून येण्यासाठी नैसर्गिक निवड कारणीभूत ठरते, हे पटले. म्हणूनच उत्क्रांतीचा आधुनिक सिद्धांत हा आनुवंशिकता निष्कर्ष आणि डार्विन-वॉलिस यांनी मांडलेल्या मूळ तत्त्वावर आधारित आहे. १९३० आणि १९४० च्या सुमारास 'संख्या आनुवंशिकी' शाखा विकसित झाली. जॉन बर्डन सांडर्सन हॉल्डेन, रॉनल्ड फिशर, एस्. राइट आणि एस्. एस् चेटव्हेरिकोव्ह या वैज्ञानिकांनी गणितीदृष्ट्या असे दाखवून दिले की, उत्क्रांतीमध्ये जनुकांची वैशिष्ट्ये, संख्या आणि निवड ही महत्त्वाची असतात. उत्परिवर्तन, जनुकाप्रवाह, जनुकीय अपवहन, नैसर्गिक निवड आणि परिवर्तनीयता इत्यादी घटक उत्क्रांती घडून येण्यासाठी कारणीभूत ठरतात.

            उत्क्रांतीचे पुरावे--

     उत्क्रांती दर्शविणारे स्रोत वेगवेगळे आहेत. त्यांच्या निरीक्षणांतून उत्क्रांती घडून आल्याचे समजते. या स्त्रोतांमध्ये जीवाश्म, जातींचा भौगोलिक प्रसार, गर्भविज्ञान, अवशेषांगे तसेच तुलनात्मक शरीररचनाशास्त्र इत्यादींचा समावेश होतो.

     जीवाश्म: जीवाश्यमांच्या अभ्यासातून उत्क्रांतीचे ठोस पुरावे मिळतात. प्राचीन काळातील बहुतेक सजीव गाडले गेल्यामुळे ते जीवाश्मांच्या स्वरुपात पाहायला मिळतात. वेगवेगळ्या कालनिर्धारण तंत्राच्या साहाय्याने वैज्ञानिक जीवाश्मांचे वय ठरवितात. जीवाश्मात असलेल्या विशिष्ट किरणोत्सारी स्मस्थानिकांच्या प्रमाणानुसार जीवाश्माचे वय ठरविता येते.

     जीवाश्मांच्या माहितीवरुन, प्रारंभीच्या एकपेशीय सजीवांपासून सरल बहुपेशीय सजीव आणि या बहुपेशीय सजीवांपासून गुंतागुतींची रचना असलेल्या विद्यमान (सध्या हयात असलेल्या) सजीवांचा इतिहास समजतो. खडकांच्या जुन्या थऱांमधील जीवाश्मांमध्ये सजीवांचे स्वरूप सरल आढळते. त्या सजीवांमध्ये आणि आताच्या सजीवांमध्ये अनेक बाबतीत फरक आढळतात. खडकांच्या नवीन थरांमध्ये आढळलेल्या जीवाश्मांमधील सजीवांचे स्वरूप गुंतागुतीचे तसेच सरल असून हे जीवाश्म सध्याच्या वनस्पती आणि प्राण्यांसारखे आहेत. जीवाश्मामुळे अस्तंगत झालेल्या अनेक सजीवांची माहिती मिळाली आहे. तसेच सध्या अस्तित्वात असलेले सजीव पूर्वी कधीही पृथ्वीर अस्तित्वात नव्हते, हेही उमगले आहे.

     उत्क्रांतीय बदल कसे झाले किंवा जाती कशा निर्माण होत गेल्या. हेही जीवाश्मांच्या अभ्यासातून लक्षात आले. याचे उत्तम उदाहरण म्हणजे सरपटणार्‍या प्राण्यांपासून सस्तन प्राण्यांची उत्पत्ती. २५ कोटी वर्षांपूर्वी सस्तन प्राणी अस्तित्वात नव्हते. मात्र, तेव्हा सरपटणारे प्राणी अस्तित्वात होते. जीवाश्मात आढळलेले प्रारंभीचे सस्तन प्राणी २० कोटी वर्षांपूर्वीचे आहेत. या दरम्यानच्या कालखंडातील आधुनिक सस्तन प्राणी व आधुनिक सरपटणारे प्राणी यांसारख्या दिसणार्‍या प्राण्यांची जीवाश्मे पुराजीववैज्ञानिकांना आढळली आहेत. प्रारंभीच्या सस्तनसदृश सरपटणार्‍या प्राण्यांचे सांगाडे हे जवळजवळ सरपटणार्‍या प्राण्यांसारखेच आहेत. त्यानंतर सस्तन आणि सरपटणार्‍या प्राण्यांच्या सांगाड्यात मिश्र वैशिष्टये दिसून येतात. मात्र, हे स्थित्यंतर (सरपटणार्‍या प्राण्यांचे सस्तन प्राण्यांमध्ये) इतके सावकाश झाले असावे की त्यामुळे ते नक्की कधी झाले, हे ठरविणे कठिण आहे.

                      (साभार आणि सौजन्य-संदर्भ-विकास पीडिया.इन)
                     -------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-24.11.2023-शुक्रवार.
=========================================

CHECK OUT MY SOCIALS -

INSTAGRAM - https://instagram.com/atul_chya_kavita
PINTEREST - https://www.pinterest.com/chyakavitaatul55/
TWITTER(X)- https://twitter.com/AtulChyaKavita
YOUTUBE   - https://www.youtube.com/@atulchyakavita4928/videos
FACEBOOK  - https://www.facebook.com/atulchyakavita
=========================================