दिन-विशेष-लेख-उत्क्रांती दिन-D

Started by Atul Kaviraje, November 24, 2023, 09:44:43 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                   "दिन-विशेष-लेख"
                                     "उत्क्रांती दिन"
                                 -------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-24.11.2023-शुक्रवार आहे. २४ नोव्हेंबर, हा  दिवस "उत्क्रांती दिन" म्हणूनही ओळखला जातो. वाचूया, तर या दिवसाचे महत्त्व, आजच्या या "दिन-विशेष-लेख" या शीर्षकI-अंतर्गत--(लेख क्रमांक-३)

           जातींचा भौगोलिक प्रसार--

     उत्क्रांतीच्या अभ्यासात वेगवेगळ्या जातींचा प्रसार कसा घडून आला, ही माहिती महत्त्वाची ठरते, उदा. काही बेटे सागराच्या तळापासून तयार झालेली असतात, जी भूखंडांशी जोडलेली नसतात. अशा बेटांवर ज्या जाती आढळतात त्या पाण्यात लांब अंतराचा पल्ला सहज पार करु शकणार्‍या असतात. अशी बेटे उडणारे कीटक, वटवाघळे, पक्षी आणि विशिष्ट वनस्पती ( ज्यांच्या बिया वाहत जातात) इत्यादींना समृद्ध असतात; परंतु सागरी बेटांवर भूखंडावर आढळणारे अनेक प्रकारचे प्राणी, वनस्पती आढळत नाहीत. उदा. गालॅपागस बेटावर तेथील एतद्देशीय उभयचर किंवा सस्तन प्राणी आढळत नाहीत. हे प्राणी भूप्रदेशावूरन सागरी बेटांवर सहजासहजी स्थलांतरित होऊ शकत नाहीत.

     सागरी बेटांवर आढळार्‍या बहुतांशी जाती, पर्यावरण आणि हवामान भिन्न असले तरी आजूबाजूच्या किनार्‍यावर आढळणार्‍या जातींसारख्या असतात. गालॅपागस बेटे दक्षिण अमेरिकेतील इक्कादोर देशाजवळील समुद्रात आहेत. किनार्‍याच्या तुलनेत ही बेटे अधिक कोरडी आणि खडकाळ आहेत  किनार्‍यावर उष्णकटिबंधीय घनदाट वने आहेत. मात्र, गालॅपागस बेटावरील पक्षी, वनस्पती हे किनार्‍यावरील वनांत आढळणारे पक्षी आणि वनस्पतींसारखे आहेत. याचा अर्थ, गालॅपागस बेटावरील पक्षी, वनस्पती या मूळच्या तेथील नसून आजूबाजूच्या भूप्रदेशातील असाव्यात, याला पुष्टी मिळते.

     सागरी बेटांवरील जातींमध्ये भूप्रदेशातील जातींच्या तुलनेत कमी विविधता आढळते. तसेच सागरी बेटांवरील काही जाती इतरत्र कोठेही आढळत नाहीत. उदा. गालॅपागस बेटांवर जमिनीवरील पक्ष्यांच्या २१ मूळ जाती आहेत. यांपैकी १३ फिंच या गाणार्‍या पक्ष्यांच्या जाती असून त्यांचे प्रमाण इतर कोणत्याही भूप्रदेशातील फिंच पक्ष्यांच्या जातींच्या प्रमाणाहून अधिक आहे. या जाती वेगळ्या म्हणून विकसित झाल्या याचे एक कारण हे पक्षी वेगळे अन्न खातात. खाण्याच्या भिन्न सवयींमुळे त्यांच्या खास अशा चोंची उत्क्रांत झाल्या, तसेच त्यांच्या शरीरात अन्य अनुकूलने घडून आली. हे फिंच पक्षी केवळ गालॅपागस बेटावरच आढळतात. या जातींचे वितरण ज्या तर्‍हेने झाले आहे त्यावरून काही मोजक्या जाती जवळच्या भूप्रदेशातून या बेटांवर स्थलांतरित झाल्या आणि त्यातूनच नवीन जाती उत्क्रांत झाल्या, या कल्पनेला पुष्टी मिळते.

             भ्रूणविज्ञान--

     प्रारंभिक अवस्थेपासून सजीव कसे विकसित होतात, याचा अभ्यास भ्रूणविज्ञानात होतो. अनेक सजीवांच्या भ्रूणात असे टप्पे आढळतात, की जे सजीवांच्या जाती अन्य जातींपासून झालेल्या उत्क्रांतीद्वाराच समजून घेता येतात. उदा., सस्तन प्राण्यांच्या भ्रूणात वृक्काच्या (मूत्रपिंडाच्या) एकापाठोपाठ एक अशा तीन जोड्या तयार होतात. यापैकी पहिल्या दोन जोड्यांचे काहीच कार्य नसल्याने त्या नष्ट होतात आणि तिसर्‍या जोडीपासून वृक्क विकसित होते. मासे, उभयचर किंवा सरपटणारे प्राणी यांच्या भ्रूणांत वृक्कांच्या पहिल्या दोनपैकी एक जोडीतून वृक्काची जोडी विकसित होते. म्हणजे सस्तन प्राण्यांमध्ये त्यांच्या पूर्वजांची काही वैशिष्टये टिकून राहिली असावीत. याला पुनरावर्तन म्हटले जाते.

             अवशेषांगे--

     उत्क्रांतीपूर्व सजीवांमध्ये वापर झालेले; परंतु कालांतराने निकामी झालेल्या इंद्रियांचे अवशेष म्हणजेच अवशेषांग. उदा., गुहेत राहणार्‍या प्राण्यांच्या अनेक जातींमध्ये डोळे असले, तरी त्या अंध होत्या. काही जातींना डोळे होते, परंतु दृष्टिचेता नव्हती, तर काहींचे डोळे लहान होते. गुहेत वावरणार्‍या खेकड्यांना नेत्रधर होते परंतु, डोळेच नव्हते. या सर्व प्राण्यांची उत्पत्ती डोळ्यांनी पाहू शकणार्‍या पूर्वंजापासून झाली होती. अंधार्‍या जागेत वावरताना डोळ्यांचा उपयोग होत नसल्यामुळे त्यांच्यात उत्परिवर्तन घडून आले. परिणामी दृष्टी जाऊनही ते टिकून राहिले. अशा तर्‍हेने या जाती कायमच्या अंध झाल्या.

           तुलनात्मक शरीररचनाशास्त्र--

     यात वेगवेगळ्या सजीवांच्या शारीरिक संरचनेची तुलना करून उत्क्रांती कशी घडून आली, याचा अभ्यास केला जातो. उभयचर, सरपटणारे प्राणी, पक्षी आणि सस्तन प्राणी यांच्या पुढील पायांच्या हाडांची संरचना सारखी असते, हे या अभ्यासातूनच समजले आहे.

                        (साभार आणि सौजन्य-संदर्भ-विकास पीडिया.इन)
                      -------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-24.11.2023-शुक्रवार.
=========================================