दिन-विशेष-लेख-राष्ट्रीय मतिमंद पुनर्वसन दिन-B

Started by Atul Kaviraje, December 08, 2023, 10:06:51 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                    "दिन-विशेष-लेख"
                             "राष्ट्रीय मतिमंद पुनर्वसन दिन"
                            ---------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-08.12.2023-शुक्रवार आहे. ८ डिसेंबर, हा दिवस "राष्ट्रीय मतिमंद पुनर्वसन दिन" म्हणूनही ओळखला जातो. वाचूया, तर या दिवसाचे महत्त्व, आजच्या या "दिन-विशेष-लेख" या शीर्षकI-अंतर्गत.

        शिक्षण देता येण्याजोग्या मतिमंदांच्या शैक्षणिक कार्यक्रमाची उद्दिष्टे पुढीलप्रमाणे असतात--

     व्यक्तिगत आणि भावनिक समायोजन, सामाजिक समायोजन आणि आर्थिक स्वावलंबन. हे शिक्षण देताना पुढील तत्त्वे पाळतात : सुरूवातीची मंद प्रगती लक्षात घेऊन शिकविण्याचा वेग मंद ठेवावा, प्रत्येक बालकाच्या मंदत्वाचे योग्य निदान करावे, अध्यापक प्रशिक्षित असावेत, शक्यतो समान बुद्धिपातळीची मुले शिकविण्यासाठी एकत्र ठेवावीत. या मुलांच्या सुरूवातीच्या शिक्षणामध्ये आरोग्यशिक्षण, इतर मुलांबरोबर वागण्याचे शिक्षण, प्राथमिक भाषाशिक्षण, अंकज्ञान आणि किरकोळ कारक कौशल्ये यांचे शिक्षण तसेच नित्याच्या वस्तूंची ओळख या गोष्टींचा समावेश असावा.

     प्राथमिक शिक्षणामध्ये जीवन – कौशल्ये आणि शालेय विषय यांवर भर असतो. या दोन्ही बाबतींत सारखाच वेळ देणे जरूर असते; कारण दोहोंचे महत्त्व सारखेच असते. मात्र जीवन – कौशल्ये आणि शालेय विषय वेगवेगळे न शिकविता शालेय विषयांतून जीवन – कौशल्यांचा विकास असा दृष्टिकोन ठेवलेला असतो. वाचन आणि अंकज्ञान ही कौशल्ये मूलभूत मानली जातात. त्याचबरोबर संभाषण आणि लेखन यांचाही समावेश असतो. या वयात ही मुले तिसरी – चवथीच्या विद्यार्थ्यांच्या पातळीपर्यंत लेखन, वाचन आणि आकलन या गोष्टी करू शकतात; म्हणून त्यांच्या कुवतीच्या कमाल मर्यादेपर्यंत या गोष्टी त्यांना शिकवाव्यात. या शालेय विषयांमार्फत अंतर, वजन, कालमान आणि आर्थिक व्यवहार यांचे ज्ञान दिले जाते.

     या अभ्यासक्रमात भोवतालच्या वातावरणाशी शारीरिक, मानसिक आणि सामाजिक समायोजन करण्याचे शिक्षणही दिले जाते. या मुलांची भावनिक प्रकृती निकोप राहील, अशा तऱ्हेने वर्गातील वातावरण ठेवले जाते. या प्रकारची जी मुले माध्यमिक शाळेपर्यंत शिकतात, त्यांच्या बाबतीत शालेय विषय आणि सामाजिक कौशल्ये पक्की करणे आणि व्यावसायिक शिक्षण देणे यांवर भर असतो. या मुलांच्या बाबतीत अमूर्त आणि भाषेचा अतिरिक्त वापर असलेल्या अध्यापन पद्धती चालत नाहीत. त्याऐवजी व्यवस्थितपणे आखलेल्या आणि टप्प्याटप्प्याने विकसित होणाऱ्या पद्धती प्रभावी ठरतात. औपपत्तिक अभ्यासाऐवजी शिकलेल्या गोष्टींच्या व्यवहारातील उपयोगावर अधिक भर असतो. कौशल्ये शिकविता येण्याजोग्या मतिमंद मुलांच्या शिक्षणात, ही मुले शक्यतो स्वावलंबी व्हावीत आणि समाजाला उपयुक्त ठरावीत, ही उद्दिष्टे ठेवलेली असतात.

    या मुलांना अतिशय मर्यादित बुद्धिमत्ता असते, हे शिक्षणक्रम आखताना लक्षात घ्यावे लागते. या मुलांच्या सुरूवातीच्या शिक्षणामध्ये आरोग्य, सुरक्षितता आणि स्वावलंबन यांविषयीच्या सवयीचे शिक्षण असते. ही मुले सुरूवातीस सांगितलेले ऐकणे, स्वतःच्या गरजांची काळजी घेणे, वस्तूंतील फरक ओळखणे आणि इतरांबरोबर जमवून घेणे या गोष्टी शिकतात. प्राथमिक आणि नंतरच्या अवस्थेत घरात उपयोगी पडणे, वाहनाचा उपयोग करणे, स्वतःची सुरक्षितता राखणे, अशा प्रकारचे शिक्षण द्यावे लागते, काही मुलांच्या बाबतींत ती मुले वयाने वाढल्यानंतर त्यांना हातापायांचा उपयोग करून करावयाची कौशल्ये शिकवली जातात आणि ती ती मुले शिकूही शकतात. सुतारकाम, गवंडीकाम, लोहारकाम अशा ठिकाणी मदत; झाडांना पाणी घालणे, जमिनीची मशागत करणे यांसारखी कामे; घरगुती कामे करणे, निरोप पोहोचविणे इ. किरकोळ कौशल्ये तसेच सुरक्षिततेला धोका नसलेली साधी यंत्रे चालविणे इत्यादींचे शिक्षण त्यांना दिले जाते. अतिमतिमंद मुलांना कोणतेही शिक्षण देता येत नाही. जागतिक अपंग वर्षापासून मतिमंदांच्या शिक्षणाकडे सर्वसामान्यांचे लक्ष चांगल्या प्रमाणात वेधले आहे. त्यांच्या शिक्षणासाठी दिल्ली, मुंबई, पुणे यांसारख्या मठ्या शहरांतून शासकीय व खाजगी संस्थांच्या शाळा सुरू केलेल्या आहेत. त्यांमध्ये फिल्डरेशन फॉर द वेलफेअर ऑफ मेंटली रिटार्डेड, नवी दिल्ली; होम फॉर मेंटली डेफिशन्ट चिल्ड्रेन, मानखुर्द, मुंबई तसेच पुण्यातील कामायनी (स्था. १९६४) व सेवासदन या संस्थेच्या मतिमंद मुलांच्या उल्लेखनीय आहेत.

                       (साभार आणि सौजन्य-संदर्भ-विकासपीडिया.इन)
                      -------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-08.12.2023-शुक्रवार.
========================================