दिन-विशेष-लेख-संत ज्ञानेश्वर संजीवन समाधी सोहळा-B

Started by Atul Kaviraje, December 11, 2023, 09:15:01 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje


                                      "दिन-विशेष-लेख"
                            "संत ज्ञानेश्वर संजीवन समाधी सोहळा"
                           ----------------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-11.12.2023-सोमवार आहे. ११ डिसेंबर, हा दिवस "संत ज्ञानेश्वर संजीवन समाधी सोहळा" म्हणूनही ओळखला जातो. वाचूया, तर या दिवसाचे महत्त्व, आजच्या या "दिन-विशेष-लेख" या शीर्षकI-अंतर्गत.

             अनुभवामृत / अमृतानुभव--

     त्यांचा दुसरा ग्रंथ 'अनुभवामृत' किंवा 'अमृतानुभव' होय. हा विशुद्ध तत्त्वज्ञानाचा, जीव-ब्रह्म ऐक्याचा ग्रंथ आहे. सुमारे ८०० ओव्या (दहा प्रकरणे) या ग्रंथात आहेत. तत्त्वज्ञानाच्या दृष्टीने हा श्रेष्ठ ग्रंथ आहे.

            चांगदेव पासष्टी--

     'चांगदेव पासष्टी' या ग्रंथाद्वारे त्यांनी चांगदेवांचे गर्वहरण करून त्यांना उपदेश केला. चांगदेव हे महान योगी १४०० वर्षे जगले असे मानले जाते. पण त्‍यांचा अहंकार गेला नव्हता. यासाठी संत ज्ञानेश्वरांनी उपदेशपर लिहिलेले ६५ ओव्यांचे पत्र म्हणजे चांगदेव पासष्टी हा ग्रंथ होय. यात अद्वैतसिद्धान्ताचे अप्रतिम दर्शन आहे. संत ज्ञानेश्वरांचा 'हरिपाठ' (अभंगात्मक,२८ अभंग) हा नामपाठ आहे. यात हरिनामाचे महत्त्व सांगितले आहे.

          संजीवन समाधी – संत ज्ञानेश्वर महाराज (sant dnyaneshwar maharaj samadhi)--

     संतश्रेष्ट ज्ञानेश्वरांचे समाधीस्थळ म्हणून आळंदी प्रसिद्ध आहे. याला देवाची आळंदी असेही म्हणतात. (चोराची आळंदी या नावाचेही एक गाव आहे.) पुण्यापासून आळंदी अवघ्या पंचवीस किलोमीटरवर आहे.

     वारकरी भक्तांसाठी तसेच समस्त मराठी जनांसाठी आळंदीला मोठे महत्त्व आहे. ज्ञानेश्वरांनी वयाच्या एकविसाव्या वर्षी येथे १२१८ साली जिवंत समाधी घेतली. त्यानंतर १५४० मध्ये भव्य समाधी मंदिर बांधण्यात आले.

     त्यांच्याशिवाय येथे विठ्ठल रखुमाई, राम, कृष्ण, मुक्ताई यांची मंदिरेही येथे आहेत. आषाढी व कार्तिकी एकादशीला येथे मोठी यात्रा भरते. आषाढात येथून ज्ञानेश्वरांची पालखी पंढरपूरला जाते. आळंदी ते पंढरपूर हे अंतर दीडशे किलोमीटर आहे. पण भक्तीरसात चिंब भिजलेले वारकरी पावसापाण्याची तमा न बाळगता पायी हे अंतर पार पाडतात.

     ज्ञानेश्वर महाराजांना आपल्या तपसामर्थ्याचा प्रभाव दाखविण्यासाठी वाघावरून आलेल्या चांगदेवाचे गर्वहरण करण्यासाठी ज्ञानेश्वर महाराजांनी भिंत चालवून दाखविल्याची आख्यायिका आहे. ती भिंत येथे आहे.

       ग्रंथ – संत ज्ञानेश्वर महाराज (sant dnyaneshwar maharaj granth)--

अमृतानुभव
चागदेव पासष्टी
भावार्थदीपिका – ज्ञानेश्वरी– या ग्रंथाचा शेवट पसायदान या नावाने ओळखला जातो.
स्फुटकाव्ये (अभंग, विराण्याआदि.)
हरिपाठ (श्री ज्ञानदेव हरिपाठ)

     ज्ञानदेव म्हणजे माय मराठीचे हृदय ! निसर्ग हाच श्रीकृष्ण, जाणीव हाच अर्जुन, यांच्या संवादातला मर्माभ्यास ही ज्ञानेश्वरी. जाणिवेच्या पातळीवरील सखोल चिंतन ही चांगदेव पासष्टी. मननाचा मन:पूत महोत्सव हाच अमृतानुभव. मानसिक शुद्ध स्नान म्हणजे हरिपाठ. सगुण अनुभवाची कोजागिरी म्हणजे ज्ञानदेवांची भजने होत', अशा समृद्ध शब्दांत ज्येष्ठ अभ्यासक यशवंत पाठक संत ज्ञानेश्वरांचे व त्यांच्या साहित्याचे वर्णन करतात.

     'जो जे वांछिल, तो ते लाहो' असे म्हणत अखिल विश्वाची जणू काळजी वाहणार्‍या संत ज्ञानेश्वरांना वारकरी संप्रदायासह सर्वच भक्त प्रेमाने 'माउली' म्हणतात. त्यांनी धर्मातील क्लिष्ट अवडंबरे काढून धर्माला कर्तव्याचा वेगळा अर्थ दिला. वाङ्मय निर्मितीबरोबरच त्यांनी आध्यात्मिक लोकशाहीचे बीज रोवण्याचा यशस्वी प्रयत्न चंद्रभागेच्या वाळवंटात केला. भागवत धर्माचा तथा वारकरी संप्रदायाचा पाया रचण्याचे अभूतपूर्व कार्य त्यांनी केले. संत नामदेव, संत गोरोबा कुंभार, संत सावतामाळी, संत नरहरी सोनार, संत चोखामेळा या समकालीन संत प्रभावळीचे अनौपचारीक नेतृत्व करत, संत ज्ञानेश्वरांनी अध्यात्माच्या क्षेत्रात समानता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला.

      समाधी – संत ज्ञानेश्वर महाराज (sant dnyaneshwar maharaj granth)--

     'अमृतानुभव' या ग्रंथाच्या लेखनानंतर संत ज्ञानेश्वरांनी तीर्थयात्रा केली. संत नामदेव महाराजांच्या 'तीर्थावली' मध्ये या तीर्थयात्रेचा उल्लेख आढळतो. या यात्रेनंतर माउलींनी समाधी घेण्याचा निर्णय घेतला. संत नामदेवांच्या 'समाधीच्या अभंगां'मध्ये तत्कालीन संदर्भ सापडतात. अन्य संतांची मानसिक स्थिती, त्यांच्यासह समाजाला झालेले दु:ख, खुद्द नामदेव महाराजांच्या वेदना, ज्ञानेश्वरांचा संयम आणि निग्रह – या सर्व गोष्टींचे प्रतिबिंब समाधीच्या अभंगांत आढळते.

     संतवर्य ज्ञानदेवांनी वयाच्या अवघ्या २१ व्या वर्षी, आळंदी येथे इंद्रायणी नदीच्या पावन तीरावर संजीवन समाधी घेतली (कार्तिक वद्य त्रयोदशी, शके १२१८, दूर्मुखनाम संवत्सर, इ.स.१२९६, गुरुवार). हा 'ज्ञानसूर्य' मावळल्यानंतर अवघ्या वर्षभरात निवृत्ती, सोपान व मुक्ताबाई या त्यांच्या भावंडांनी आपली इहलोकीची यात्रा संपवली.

                        (साभार आणि सौजन्य-संदर्भ-संतसाहित्य.इन)
                       ----------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-11.12.2023-सोमवार.
========================================