विसर्जन गणपती बाप्पाचे

Started by Atul Kaviraje, September 19, 2024, 04:58:51 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्रांनो, गणपती बाप्पांच्या विसर्जना नंतरची वाचूया एक भावपूर्ण कविता--

बाप्पा गेलेत निघून आपल्या गावाला
पुन्हा-पुन्हा पाहतेय मी रिक्त मखराला
कानी आरतीचा आवाज अजूनही घुमतोय,
आशीर्वादासाठी बाप्पा तुझा हात उंचावतोय.

दुर्वांकुराचा, फुलांचा हार गळा घातलाय
मोदकांचा नैवेद्य तुझ्यापुढे मी ठेवलाय
तुझा चेहरा समईच्या प्रकाशात उजळलाय,
अगरबत्तीचा, धुपाचा सुवास घरभर दरवळलाय .

मोदकांचा तुला घास भरवतेय प्रेमाने
स्वीकार करतोयस, पाहतोस माझ्याकडे प्रेमाने
चरणी झुकता, आशीर्वाद देतोयस मजला,
तुझा मंगल आशिष मिळालाय मला.

सारे चित्र झर्रकन डोळ्यांपुढून सरकते
आठवण तुझी मनात घर करते
छान होते दिवस तुझ्या उत्सवाचे,
आगमनापासून ते तुझ्या विसर्जना पर्यंतचे.

कसे भर्रकन निघून गेले दिवस
तू निघूनही गेलास आपल्या गावास
वाटतंय, अजुनी तू आहेसच माझ्याबरोबर,
तुझ्या अस्तित्त्वाने भरलंय सारं घर.

कालच तुला मी दिलाय निरोप
डोळ्यांत भरून घेतलंय पावन स्वरूप
पावले तिथेच माझी रेंगाळत होती,
तुझ्या नसण्याची जाणीव होत होती.

उदास वाटतंय, मनही झालंय खिन्न
गोड नाहीय लागत पाणी अन अन्न
शून्य डोळ्यांनी मी मखरास न्याहाळतेय,
तुझे अस्तित्व अजुनी आभास देतेय.

घराची सारी निघूनच गेलीय रया
तुझी होती घरावर माया आणि छाया
भकास, उदास झाल्यात घराच्या भिंती,
मंद होऊ लागलीय कोनाड्यातील पणती.

उत्साह होता प्रवाहत तुझ्या रूपाने
मन माझे गलबलले होते आनंदाने
तू गेलास, उत्साहावर पाणी पडले,
जणू घरातले चैतन्यच नाहीसे झाले.

दरवर्षी असंच होतं, हेच घडतं
तुझे विसर्जन मनाला चटका लावतं
ये पुढल्या वर्षी लवकरात लवकर,
तुझ्या स्वागता पुन्हा राहीन तत्पर.

--अतुल परब
--दिनांक-19.09.2024-गुरुवार.
===========================================