एक सुंदर सायंकाळ

Started by Atul Kaviraje, September 26, 2024, 08:51:49 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्रांनो, पुन्हा एकदा वाचूया एका सुंदर सायंकाळचे कवितारूपी चित्रण--

अस्तास चालला दिनकर क्षितिजास पश्चिमेला
आभाळाला लालभडक तांबडा रंग आला
जणू चित्रकाराने चित्र चितारले कॅनवासवर,
उधळला रंग तैसा पश्चिम क्षितिजावर.

नयनमनोहर रंगांची जणू झालीय उधळण
जळात प्रतिंबीबीत होताहेत आभाळातील घन
तरंग आणतोय वाहून प्रतिबिंब किनारी,
लाल-तांबडा रंग आता झालाय सोनेरी.

अस्तास जात सूर्य माडांमधुनी डोकावतोय
सायंकाळचा गार वारा झावळ्यांस डोलवतोय
कृष्ण सावल्यांत बुडालीय सरळसोट आकृती,
विलीन होतेय अंधारात माडांची रेखाकृती.

पक्ष्यांचीही आताशी थांबलीय चाहूल, किलबिल
ऐकू येतेय माडांतून वाऱ्याचीच शीळ
प्रवाह मंदावलाय, सागर झालाय शांत,
बंद झालीय पूर्णपणे जळाची खळखळ.
 
पवन आणतोय वाहून दूरवरून गारवा
मध्येच स्वर देतोय कुठूनसा पारवा
लांब पसरू लागल्यात सायंकाळच्या सावल्या,
निस्तेज झालीत किरणे, सूर्यज्योती मंदावल्या.

अंधारात विरत चालली पर्वताची रांग
निरखून पाहताही लागत नाहीय थांग
घनही हळूहळू काळ्या रंगात रंगले,
कडांवर अजुनी तांबडे रंग स्थिरावले.

सूर्याचा गोळा हळूहळू बुडाला सागरात
मंदावत होती शेवटली किरणे नभात
हळूहळू तीही नाहीशी होतील अंधारात,
रात्रीचा रंग चढत जाईल आकाशात. 

एका सुंदर संध्याकाळचा झालाय अस्त
दिवसभर होते जीवन जिवंत, व्यस्त
मंदावलीय, सुस्तावलीय हालचाल अंतिम प्रहरी,
अंधाराच्या राणीचे येतेय साम्राज्य भूवरी.

--अतुल परब
--दिनांक-26.09.2024-गुरुवार.
===========================================