सकाळीच भेटलेल्या सुंदर युवतीचे सौंदर्य वर्णन

Started by Atul Kaviraje, September 27, 2024, 10:03:24 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्रांनो, आज सकाळीच नेहमीप्रमाणे मी MORNING WALK साठी जात होतो. अवचित माझ्यासमोर एक लावण्यवती सुंदरी येऊन उभी राहिली. वाचूया मला तिच्या सौंदर्याबद्दल काय वाटलं, ते या कवितेतून--

सकाळचे वातावरण आहे आज धुंद
त्यात तुझे रूप आनंदी, स्वच्छंद
ओठ जरी मिटलेले, आहेत बंद,
हसत आहेस माधुरी, तू मंद-मंद.

काय आहे मनी, जाणिले कुणी ?
नयनांतून तुझ्या मस्त वाहतेय वारुणी
नशा देऊन गेली मज सकाळीच,
अनोळखी सुंदरी, कोण तू पाहुणी ?

चन्द्र गेलाय पश्चिमेस केव्हाचा अस्तास 
तुझ्या रूपाने पुनश्च आला उदयास
चंद्र तुझा चेहरा, रुप्याची रुपाली,
चंदेरी आभा रूपाची सकाळीच पखरली.

सुस्मित, सस्मित, स्मितहास्य तुझे मधुरे
कारण तुझ्या सौंदर्याचे हेच खरे
निःशब्द, मनातले भाव सारे सजणे,
सांगून गेलीस बरंच काही मूकपणे.

नाहीय ढळत नजर चेहऱ्यावरून तुझ्या
पाकळ्या जणू विखुरल्यात गाली गुलाबाच्या
गोड हसता, मधुरस जणू झरले,
तुझ्या हास्यात मधुघटची जणू भरले.

सौंदर्याची तू पुतळा, रूपाची कामिनी
लावण्य रसरसलेलं नजरेत भरतंय यामिनी
जणू पाडतेस भुरळ, घालतेस मोहिनी,
अक्षय, अखंड रुपसंपदा तुजपाशी मंदाकिनी.

गौर वर्ण तुझा निघालाय उजळून
चंद्रकळा कमनीय देहावर दिसतेय शोभून
शेव पदराचा दोन्ही खांद्यांवर विरामला,
हस्त नाजूक गोरा, मांडीवर विश्रामला.

अदा तुझी मोहनीय, ऐटही लाजवाब
कुणीही होईल घायाळ, पाहुनी रुबाब
हतप्रभ झालोय मी, नाहीय जबाब,
असामान्य, अद्वितीय, आरसपानी तुझे शबाब.

वर्णनातीत रूप तुझे, यौवन बहरलेले
सढळ निसर्गाने दान तुला दिलेले
पहातच रहावे, असेच आहे तुझ्यात,
पाहताक्षणीच कुणीही पडेल तुझ्या प्रेमात.

बऱ्याच दिसांत असे सौंदर्य पाहीले
पाऊल माझे जागीच खिळून राहीले
इतरांचीही दशा असेल निःसंशय माझ्यासारखीच,
तुझे लावण्यच आहे ललने मंतरलेले.

सौंदर्य मजला करून गेले निःशब्द
वर्णन करता तुझे, संपलेत शब्द
अजुनी आहेस हसत, राहूनी स्तब्ध,
प्रीत जागतेय, झालोय तुझ्यावरी लुब्ध. 

--अतुल परब
--दिनांक-27.09.2024-शुक्रवार. 
===========================================