एका सुंदर संध्याकाळचे कवितारूपी चित्रण

Started by Atul Kaviraje, September 29, 2024, 09:13:32 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्रांनो, पुन्हा एकदा वाचूया एका सुंदर संध्याकाळचे कवितारूपी चित्रण--

आगळीच आहे आजची ही संध्याकाळ
विविध रंग उधळतेय आजची सायंकाळ
सूर्य नुकताच गेलाय क्षितिजी अस्तास,
भेट देऊन गेलाय रंगांची क्षितिजास.

सूर्यास्त तसा मी रोजच पहातो
सायंकाळचा नजारा काही नवीन नसतो
परि आज दृश्य भासतेय मनोहारी,
आजची सांयकाळ आहे अतिशय न्यारी. 

उंचावर माथा आभाळाचा रंगात रंगलाय
अजुनी किरणांचा साज आभाळाने ल्यालाय
पुंजक्यापुंजक्याने ढग विहरत आहेत अंबरी,
लाल-तांबड्या रंगाने रंगल्यात त्यांच्या किनारी.

थेट क्षितिजावरून जलद निघालेत प्रवासाला
वरवर आहेत चढत चुंबित अस्मानाला
प्रवास ढगांचा इथेच आहे संपला,
वर मोकळे आकाश भिडतेय अनंताला. 

तळ्याच्या पाण्याची पूर्णपणे थांबलीय खळखळ
आहे निवांत, शांत, नाहीय खळबळ
वारा मंदावलाय, एखादाच तरंग उठवतोय,
गार पाण्याला तळ्याच्या सोबत करतोय.

दुरवरली वनराई हिरवी, पुसट होतेय
हिरवाई हिरवीगार, काळ्या रंगात रंगतेय
तळ्यात अजुनी वृक्षांचे प्रतिबिंब डोकावतेय,
तिथेही हिरवाईला अंधाराची धार चढतेय.

आभाळातून पडतेय ढगांचे बिंब जळात
रंग तयांचा अजुनी सुस्पष्ट, तळ्यात
लाटा वाहून आणताहेत पडसाद किनारी,
अंधारात चाललीय बुडत निसर्गाची नगरी.

सूर्यास्ताचे रंग अजुनी टिकून क्षितिजावरी
अस्तित्त्व अपुले राखून शेवटले भूवरी
किरणे विरतील, पडतील म्लान पहाता-पहाता,
अंधार दाटेल सारीकडे बघता बघता.

सावल्या दाटू लागल्यात, झाल्यात लांब
पूर्वेकडून होतोय धीमेधीमे रात्रीस आरंभ
पक्षी केव्हाच परतलेत घरट्याकडे अपुल्या,
सळसळ थांबलीय, स्तब्ध झालाय कदंब.
 
आजची संध्याकाळ नक्कीच सुंदर आहे
आतासा संध्या-छायेचा खेळ सुरु आहे
मनास धुंद करतं, सांयकाळचे वातावरण,
शिकवून जातं, नवनवीन देतं उदाहरण.

प्रत्येक संध्याकाळ मला वेगळीच भासते
दररोजची तिची रया आगळीच असते
ताण-तणाव, निराशी-उदासी माझी आपल्याकडे घेते,
मनःशांती, नवोन्मेष सढळ हस्ते देते. 

देत असते संध्याकाळ उत्साहाचे आंदण
उल्हसीत, उधाणत असते मन कण-कण
जपून ठेवतो येथला प्रत्येक क्षण,
प्रत्येक क्षणाची करीत असतो साठवण.

--अतुल परब
--दिनांक-29.09.2024-रविवार. 
===========================================