काय म्हणावे सांगा पांचालीच्या र्दुभाग्याला

Started by gparimal_v, April 09, 2011, 08:28:57 AM

Previous topic - Next topic

gparimal_v


द्रौपदी स्वयंवराकरिता अति अवघड पण रचलेला।वेधेल अचुक लक्ष्याला वरणार याज्ञसेनी त्याला |
सुकुमारी ती सजलेली जणू रती मदनाची अवतरलेली।जशी कुमुदिनी फुले पाण्यात खळी गालावर फुललेली।

भारतवर्षीचे राजे होते त्या सभेत जमलेले।बनविण्या तिज अर्धाँगी काही जण आसुसलेले।
परी बिकट तो मत्स्यवेध ना कुणास जमला | लाविता प्रत्यंचा धनुला दम कित्येकांचा फुलला।

वांझ ठरे का वीर प्रसवा भारतभूमी | की या धरेवर दुष्काळ वीरांचा पडला |
पाहुन दृश्य समोरी द्रुपद ही चिंतीत बनला। जिंकील जो पणात असा का नरसिंह भारती नुरला।

तितक्यात उठे पदरव सामोरा ये नरपुंगव। दानवीर म्हणती ज्याला तो कवचधारी सुर्यकुलोद्भव
सुवर्णासम ज्याची कांती वज्रासम ज्याचे बाहु।कुंडले शोभती  ज्याला तो सव्यसाची अजानुबाहु।

उचलुनी धनुष्य हाती अंगराज शरसंधाना सिध्द होई।तितक्यात कटु स्वर एक कानी कर्णाच्या येई।
भर सभेत गर्जे द्रुपदकन्या वरणार न मी सुतपुत्राला। मृत्तिकेत न शोभे मोती हंसिनी न मिळे कावळ्याला।

सूतपुत्र कि राजकुमार जन्म तर दैवाने मिळतो |कुणा नशिबी फुलांच्या पायघड्या अन कुणा वनवास  मिळतो |
परिस्थितीच्या ऐरणीवर अडचणींचे जो घाव झेलतो  |संकटाच्या मुशीतूनच तर तो खरा  नरवीर जन्मा येतो |

पुरुषार्थ म्हणती कशाला ना ठावे खुळ्या द्रौपदीला।सुतपुत्र म्हणत जिने अव्हेरले सुर्यपुत्राला |
दुराभिमानापोटी जिने लाथाडिले सौभाग्याला। काय म्हणावे सांगा पांचालीच्या र्दुभाग्याला।

©परिमल विश्वास गजेंद्रगडकर
०२/०४/२०११ |

amoul


santoshi.world