आई -वडिलांची साथ

Started by shardul, October 29, 2011, 04:06:05 PM

Previous topic - Next topic

shardul

एका गावात एक बाई आपल्या छोट्या मुलाबरोबर एका छोट्या झोपडीत राहात होती. आपल्या मुलाला काही कमी पडू नयेम्हणून दिवसरात्र एक करून ती काम करत असे; पण त्या छोट्या मुलाला मात्र, आपली आई अजिबात आवडत नाही. तो तिचा तिरस्कार करत असतो; कारण तिला एक डोळा नसल्यामुळे ती भेसूर दिसत असते. आईला तो शाळेतही येऊ देत नसतो.

एकदा एका कार्यक्रमासाठी आईला शाळेत जावे लागते; पण तिला बघून कुठे तोंड लपवावे हे मुलाला कळत नाही . रागाचा एककटाक्ष टाकून तो तिथून पळून जातो. घरी आल्यावर तो आईला प्रचंड बोलतो.""कशाला आली होतीस शाळेत? आता माझे मित्र मला चिडवतील? मी उद्या शाळेत कसा जाऊ? तुला एक डोळा का नाही?मला तू अजिबात आवडत नाहीस.'' वगैरे वगैरे. आई काहीही बोलत नाही. आपण आईला खूप बोललो, याचे मुलालाही काही वाटत नाही. रागाने तो नुसता धुमसत असतो. आईशी काहीही न बोलता जेवतो आणि झोपतो. रात्री कधीतरी त्याला जाग येते; तर आपल्या मुलाची झोपमोड होऊ नये अशा दबक्‍या आवाजात त्याची आई रडत असते. पण त्याचेही त्याला काही वाटत नाही. एका डोळ्याच्या आपल्या आईचा त्याला अधिकच तिरस्कार वाटायला लागतो.

त्या क्षणी तो निर्णय घेतो, शिकून खूपमोठे व्हायचे आणि इथून बाहेर पडायचे.
त्याप्रमाणे तो खूप अभ्यास करतो. उच्च शिक्षणासाठी मोठ्या शहरात येतो.नामवंत विद्यापीठातून पदवी मिळवतो. मोठ्या कंपनीत मोठ्या हुद्‌द्‌यावर काम करू लागतो. एका सुंदर मुलीशी त्याचे लग्न होते. त्याला एक मुलगा, एक मुलगी होते. आता त्याचे कुटुंब पूर्ण होते; कारण हे सुंदर चित्र बिघडवणारी एका डोळ्याची त्याची आई तिथे नसते. तो तिला जवळजवळ विसरून गेलेला असतो. अतिशय सुखात असतो.

एक दिवस त्याच्या घराचे दार वाजते. दारात एका माणसाबरोबर त्याची तीच एकाडोळ्याची आई उभी असते. तिला बघून त्याची मुलगी घाबरून आत पळून जाते. तोआधी चक्रावतो आणि मग स्वतःला सावरत तिला म्हणतो, ""कोण आहेस तू? इथे का आलीस? बघ माझी मुलगी तुला घाबरली.''
""मी बहुतेक चुकीच्या पत्त्यावर आले,'' असे काहीसे पुटपुटत आई निघून जाते. तिने आपल्याला ओळखले नाही, अशा समाधानात (?) मुलगा दार लावून घेतो.
काही दिवसांनी, माजी विद्यार्थी संमेलनासाठी त्याला त्याच्या शाळेतून पत्र येते. परत त्या गावात जाऊ नये असे वाटत असतानाही तो संमेलनाला जाण्याचा निर्णय घेतो. ऑफिसच्या कामासाठी जातोय, असे बायकोला खोटेच सांगतो.
संमेलन पार पडते. कुठल्यातरी अनामिक ओढीने त्याची पावले त्याच्याही नकळत झोपडीकडे वळतात. दाराला कुलूप असते. शेजारची बाई त्याला ओळखते आणि एक पत्र देते. ते पत्र त्याच्या आईचे असते.
तो वाचू लागतो,

""... मी खूप आयुष्य जगले. तुझ्याकडे आता मी परत कधीही येणार नाही; पण तू कधीतरी येऊन मला भेटावेस अशी माझी खूप इच्छा आहे. शाळेच्या संमेलनाला तू येणार हे कळले होते; पण तिथे येऊन तुला भेटायचे नाही असे मी नक्की ठरवले. कारण मला माहिती आहे, एका डोळ्याची ही तुझी आई तुला आवडत नाही. मला एकच डोळा का, असेही तू मला एकदा विचारले होतेस. तेव्हा तू खूपच लहान होतास म्हणून मी काही उत्तर दिले नाही; पण आज सांगते. बाळा, तू लहान असताना एक अपघात झाला. त्या अपघातात तू तुझा एक डोळा गमावलास. एका डोळ्याने तू संपूर्ण आयुष्य कसे जगणार या विचाराने मी हैराण झाले आणि माझा एक डोळा तुला दिला. मला तुझा खूप अभिमान आहे. तू मला जे बोललास किंवा माझ्याशी जसा वागलास त्यासाठी मी तुझ्यावर अजिबात रागावलेले नाही."तुझे माझ्यावर खूप प्रेम आहे,' असाच विचार मी करते. कधी काळी माझ्या भोवतीभोवती खेळणारा तू मला नेहमी आठवतोस...''

पत्र वाचून मुलगा ढसढसा रडू लागला.. जी व्यक्ती केवळ त्याच्यासाठी जगली, स्वतःचा सर्वात महत्त्वाचा अवयव जिनं त्याला सहजपणे देऊन टाकला, तिच्याशी आपण किती निर्दयपणे वागलो. त्याला प्रचंड पश्‍चात्ताप झाला, तो आईला मोठमोठ्याने हाका मारू लागला; पण आता त्याचा काय उपयोग होता??

मित्रानो आई-वडिलांसाठी कोणतीही गोष्ट सोडा.
पण..
कोणत्याही गोष्टीसाठी आई-वडिलांना सोडू नका;
कारण जीवनात
एक वेळ कोणतीही गोष्ट आपली साथ सोडेल;
... पण

आई -वडिलांची साथ ही नेहमीच तुमच्या बरोबर आयुष्यभर असेल !

Pravin5000

khupach chan lekh aahe...... pani aale dolyatun vachtana.... :( :( :(