संत सेना महाराज-

Started by Atul Kaviraje, October 26, 2025, 10:22:55 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                        "संत चरित्र"
                        ------------

        संत सेना महाराज-

हिंदी साहित्याच्या अवघ्या इतिहासामध्ये संत सेनाजी हे उत्तर भारतातील स्वामी रामानंदांच्या शिष्यांच्या संप्रदायामधील मानले जातात. कबीर, पन्ना, रविदास, सेनाजी यांना अध्यात्मातील अनुग्रह स्वामी रामानंदांनी दिला होता. पंधराव्या शतकातील सेनाजी जातीने न्हावी होते व ते बांधवगडच्या राजाच्या पराको असत. असा निर्देश हिंदी साहित्यामध्ये आढळतो. (धीरेंद्र वर्मा हिंदी साहित्य) तसेच संत मीराबाईने आपल्या कवितेमध्ये पूर्वकालीन संतांचा उल्लेख केला आहे.

अगवद्भक्त सेनाजी' चे चरित्रकार भ० कृ० मोरे म्हणतात. आम्ही या गोष्टी विषयी बराच प्रवास केला. अनेक ग्रंथ व कागदपत्र पाहिले.

डॉ० रेवतीप्रसाद शर्मा यांचेही ग्रंथ पाहिले आणि आमची खातरी झाली की, भगवद्भक्त सेनाजी हे महाराष्ट्रात प्रवासी म्हणून आले असावेत आणि त्यांनी महाराष्ट्रीय साधूसंतांच्या गाठीभेटी घेतल्या असाव्यात. त्यापुढे जाऊन मोरे म्हणतात, 'भगवद्भक्त सेनाजी हे राजस्थानी होते की गुजराथी होते. वा महाराष्ट्रीयन होते हा वाद महत्त्वाचा नाही. ते ज्या काळात उदयास आले त्यांनी ज्या पद्धतीने आपली आत्मोन्नती करून घेतली ती बाब महत्त्वाची गणली गेली पाहिजे." (पृ० क्र० ५६,५७)

डॉ० अ० ना० देशपांडे यांनी (प्राचीन मराठी वाङ्मयाचा इतिहास, पृ० क्र० १३०) म्हणले आहे की, "आपल्या आयुष्याच्या पूर्वार्धात सेनाजींनी महाराष्ट्रात वास्तव्य केले असावे, ते वारकरी संप्रदायात सामील झाले असावेत आणि आयुष्याच्या उत्तरार्धात ते उत्तर भारतात गेले असावेत. तेथे त्यांना स्वामी रामानंदांचा सहवास घडला असावा. "

शं० पू० जोशी (पंजाबातील नामदेव) आपल्या ग्रंथात म्हणतात, "सैनभक्त" हा दाक्षिणात्य असला, तर त्याचा महाराष्ट्रात थोडातरी संप्रदाय अस्तित्वात असायला पाहिजे होता. दक्षिणेतील न्हाव्यांना सेनाभक्ताचे नावही माहीत नाही. तर राजपुतांना, पंजाब या प्रांतातील अबालवृद्ध न्हावी स्त्री-पुरुष रात्रंदिवस या भक्ताचे भजन-पूजन करण्यात दंग होऊन गेलेले मी प्रत्यक्ष पाहिले आहे.

रावबहादूर चिंतामणी वैद्य ग्वाल्हेर यांनी संत सेनाजींच्या संदर्भात अनेक कागदपत्रांच्या आधारे व्यापक संशोधन केले आहे. त्यांच्या मते "भगवद्भक्त सेनार्जींची अनेक अस्सल व बनावट कागदपत्रातून चरित्रे पाहिली. त्यांच्या निरीक्षणावरून संत सेनाजी महाराष्ट्रात विठ्ठलाच्या भेटीसाठी प्रवास करीत करीत महाराष्ट्रात आले; त्यांनी वारकरी संप्रदायातील समकालीन अनेक संतांच्या भेटी घेतलेल्या असाव्यात."

ह० भ० प० बाबामहाराज सातारकर आपल्या आशीर्वादामध्ये म्हणतात, मनुष्य जन्माला कुठे आला ? त्यापेक्षा जन्माला येऊन तो काय करतो, याला महत्त्व । आहे. म्हणूनच श्रीसंत सेनामहाराज यांचे जीवनचरित्र व सार्थ अभंगगाथा सर्व थरातील लोकांपर्यंत पोहोचणे अत्यंत आवश्यक आहे. (संत सेनामहाराज अभंगगाथा, गुळवणे-शिंदे, पृ० क्र० ६)

संत सेनाजी महाराष्ट्रातील की महाराष्ट्राबाहेरील या संदर्भात अनेकांनी आपापली मते वरीलप्रमाणे मांडलेली आहेत. सेनाजी महाराष्ट्रीय होते. याला एकमेव कारण, म्हणजे त्यांची अभंगरचना, ती सुद्धा अस्सल मराठी संस्काराची आहे. मराठी प्रांतातील माय मराठीतील बोलीभाषेमध्ये रूढ असणारे अनेक वाक्प्रचार सेनांच्या कवितेत पहावयास मिळतात. अस्सल मराठीपण अभंगा- अभंगामधून दिसते. अमराठी भाषिकाला अशा स्वरूपाचे शब्द वापरता येणे कठीण असते.

सेनाजीही नामदेवांप्रमाणे, महाराष्ट्राबाहेर प्रवासाच्या निमित्ताने गेलेले असावेत. राजस्थान, पंजाब, उत्तरप्रदेशामध्ये जाऊन संबंधित भाषेशी संबंध त्यांचा आला असावा. त्यामुळे बोटावर मोजण्याइतक्या रचना आणि पदे त्यांनी रचलेली असावीत.

--संकलन
--अतुल परब
--दिनांक-26.10.2025-रविवार.
===========================================