सखी

Started by shashaank, February 09, 2012, 08:52:13 AM

Previous topic - Next topic

shashaank



सखी

सावळ गालावरी उमलली प्राजक्तासम मृदू फुले
नभि नक्षत्रे जशी उगवली मुखावरी ते हास्य खुले
सावळ तरिही सतेज कांती जाईची जणु वेल झुले
पदन्यास तो दिसे मनोरम रसिकाला करतोच खुळे

रेखिव भिवई किंचित उडवुन नजरेला ती नजर मिळे
हृदयी वाजे सतार झिणझिण नजर फिरूनी तेथ खिळे
मनी उमटती शब्द कितितरी ओठावरती अडखळले
विलग अधर होताच तरी ते नि:श्वासी संपुन गेले

केश रेशमी भालावरती क्षणभर जरि का भुरभुरले
अंगुलि-विभ्रम दिसे लाघवी जंव तू त्याते सावरले
सखी दिसशी तू रम्य उपवनी सघन, मनोरम, नितळ तळे
मंद मंद हास्याच्या लहरी निवविती तप्तसे मनोमळे

- पुरंदरे शशांक.