बधिरीकरणशास्त्र, चतुरस्त्र तरिही शापित!

Started by dr. shakil momin, July 01, 2012, 02:56:28 PM

Previous topic - Next topic

dr. shakil momin

16 ऑक्टोबर 1846 रोजी बधिरीकरणशास्त्र किंवा भुलशास्त्र या मानवाला मिळालेल्या वरदानाचा जन्म झाला असे मानले जाते, परंतु सुरवातीला भुल देणे तितकसे सुरक्षित समजले जात नव्हते. बेशुध्द होणे म्हणजे मृत्यूच्या अगदी जवळ जाणे, जणुकांही स्वर्गाचे दार ठोठावणे, अशीच परिस्थिती होती. अगदी शस्त्रक्रिया उद्या असेलतर आज मृत्यूपत्र करणे आवश्यकच आहे अशी पद्धत रुढ होती. भुलशास्त्रात नवनवीन औषधे, नवनवीन उपकरणे, तसेच नवनवीन पद्धतींचा वापर होउ लागला आणि भुलशास्त्राला एक विश्वासार्हता प्राप्त झाली. सध्या वापरात असलेले थायोपेन्टोन हे औषध साधारण 1935 साली उपलब्ध झाले. जागतिक महायुद्धातील सैनिकांच्या उपचारादरम्यान त्याचा वापर खुप मोठ्या प्रमाणात करण्यात आला. परंतु तेंव्हा या औषधाचा अभ्यास परिपुर्ण नव्हता व त्यामुळे प्रत्यक्ष युद्धापेक्षा या औषधानेंच जास्त सैनिक दगावले अशी परिस्थिती उदभवली. आज या औषधाचा अभ्यास पुर्ण आहे आणि धोक्याचे निवारण करणारी उपकरणे आणि ज्ञान उपलब्ध असल्याने भुलतज्ञ सर्रास याचा वापर करु शकतात आणि यशस्वी होतात.
   शस्त्रक्रियागृहात टेबलवर आरामात पहुडलेला रुग्ण, बोलता बोलता, हसत खेळत झोपी जातो आणि शस्त्रक्रियेनंतर रुग्णशय्येवर हसत हसत जागा होतो. त्याला कसल्याही वेदनेची जाणीव रहात नाही. हे चित्र आपणांस सर्रास पहावयास मिळते. खरेतर हे आश्चर्य वाटण्यासारखे चित्र आहे. संपुर्ण भुल देताना प्रथम रुग्णास पुर्णपणे झोपवले जाते. नंतर त्याचे सर्व स्नायु शिथील केले जातात, ज्यामुळे त्याचा श्वास बंद पडतो. बंद झालेला श्वास श्वासनलिकेत नळी घालुन कृत्रिमरित्त्या चालु ठेवला जातो. ह्र्दयावरील शस्त्रक्रियेत कधी कधी ह्रदयही बंद केले जाते. शस्त्रक्रियेनंतर या सर्व क्रिया पूर्वव्रत पुर्वस्थितीला आणल्या जातात. हे सर्व सोपे वाटते, परंतु हे तितकेस सोपे नसते. रुग्णाला झोपवून, कृत्रिम श्वासोच्छवासाच्या यंत्राला जोडुन भुलतज्ञ आरामात बसला आहे असे कदाचित प्रथमदर्शी वाटु शकते. परंतु हे तितकेसे खरे नाही. निरनिराळ्या यंत्राद्वारे रुग्णाच्या शरिरातील सर्व क्रियांची स्थिती भुलतज्ञ बारकाईने पहात असतो, आणि त्यातील होणारे बदल टिपून सुरक्षेची, योग्य ते उपचार करण्याची जबाबदारी त्याची असते. महाभारतातील युद्धप्रसंगी अर्जुनाला कृष्णाने केलेले सारथ्य आणि यशस्वी शस्त्रक्रियेसाठी शल्यविशारदाला भुलतज्ञाने केलेली मदत जवळजवळ सारखीच आहे.
   भुलशास्त्र ही वैद्यकीय क्षेत्राची एक परिपुर्ण शाखा आहे. यामध्ये रुग्णाच्या शरिराचा संपुर्ण अभ्यास समाविष्ट आहे. सर्व वयोगटातील, सर्व प्रकारच्या रुग्णासाठी भुलेची गरज आसते. शरिरातील सर्व प्रकारच्या क्रिया भुलशास्त्राशी निगडित असतात, किंबहुना रुग्णाच्या संपुर्ण शरिरावर शस्त्रक्रियेदरम्यान नियंत्रण ठेवणे भुलतज्ञासाठी आवश्यकच असते. म्हणुनच आम्ही म्हणतो की आमचे शास्त्र हे पुर्ण शास्त्र आहे, एक परिपुर्ण शाखा आहे. इतर कोणत्याही वैद्यकीय शाखेत औषधोपचार करुन त्याच्या परिणामाची वाट पहावी लागते. परंतु भुलेच्या औषधाचा गुण हा तत्काळ पहावयास मिळतो. एक औषध नाही चालले आता दुसरे घेउन बघा असे भुलतज्ञास म्हणुन चालत नाही. योग्य ते औषध देउन त्याचा परिणाम लगोलग दाखवणे शिवाय पर्याय नसतो. केवळ यामुळेच धोका जास्त असतो. एखाद्या वाहनाचा वेग जितका जास्त तितकाच अपघाताचा धोका जास्त. तत्सम परिणामकारक औषधे वापरणार, म्हणजे धोक्यापासुन सुटका नाही. परंतु भुलशास्त्रात झालेल्या प्रगतीमुळे हा धोका बराच कमी झाला आहे. आज बधिरीकरणशास्त्र हे एक चतुरस्त्र शास्त्र म्हणुन प्रगति करित आहे.
   तरिही 100% सुरक्षा शक्य नाही. जगातील सर्वोत्कृष्ठ शस्त्रक्रियागृहात, ज्याठिकाणी सर्व उपकरणे उपलब्ध आहेत, तेथेही भुलेदरम्यान अनपेक्षित मृत्यूचे प्रमाण साधारणपणे 1 लाखास 1 असे आहे. परंतु भारतासारख्या विकसनशील देशात हे प्रमाण जास्त आहे. कारण आपल्याकडे खर्चाकडे जास्त लक्ष दिले जाते. उपकरणाची उपलब्धता खर्चाच्या आणि उत्पनाच्या प्रमाणावर आधारित असते. एकंदरितच आरोग्यावर आपल्या देशात नगण्य खर्च केला जातो, त्यामुळे आपल्याकडे उपलब्ध आकडेवारीनुसार मृत्यूदर हा साधारणपणे 10 000 शस्त्रक्रियेमागे 1 असा आहे. जनसामान्यांनी ही परिस्थिती समजुन घेतली पाहिजे. हे प्रमाण कमी करण्याचे प्रयत्न सुरुच आहेत. जर रुग्णासाठी करावयाचा खर्च वाढला तर रुग्णालयातील सुविधात वाढ होईल आणि हा मृत्यूदर नक्कीच कमी होईल.
   अगदी एखाद्या साध्या इंजेक्शनची रिअँक्शन येउन रुग्ण दगावू शकतो, किंवा संपूर्ण काळजी घेवून, सर्वोत्कृष्ठ योजनेद्वारे अवकाशयान पाठविले जाते, तरिही आपण कल्पना चावला सारख्या अवकाशवीर भारतकन्येस गमावितोच. भुल देणे हे जवळजवळ विमाणोड्डाणासारखेच आहे, ज्यामध्ये उड्डाणाच्या वेळी, उतरण्याच्या वेळी विशेष धोका असतो, तसेच मधल्या काळात पायलटला सर्व उपकरणावर नजर ठेवत बसावे लागते. धोका केंव्हाही, कोठुनही होऊ शकतो.
   भुलशास्त्र एक चतुरस्त्र शास्त्र आहे. जीवनरक्षक प्रथमोपचार हा भुलशास्त्राचा अविभाज्य भाग आहे. अतिदक्षता विभाग, नवजात अभ्रकाचे पुनर्जीवन, वेदनारहित प्रसुति, दुर्दम्य वेदनाशमन आणि आपत्ती व्यवस्थापन या सर्वाशी भुलशास्त्राची नाळ जोडली गेली आहे. जरि संपूर्णपणे चतुरस्त्र उपयोग असलेली ही वैद्यकीय शाखा असली तरि ती एकप्रकारे शापितच आहे. यांचे जवळजवळ सर्व काम शस्त्रक्रियागृहाच्या चार भिंतीआड चालते. जणू कांही पडद्यापाठीमागे असलेल्या कलाकारासारखी ही जमात आहे. परंतु एखादे अघटित घडलेतर लगेच पडदा वर होतो आणि भुलतज्ञास समाजाच्या रोषास करणीभुत व्हावे लागते. या चतुरस्त्र शास्त्रास त्याचे योग्य ते वरदान मिळत नाही, परंतु शापित आस्तित्वास निश्चितच प्रत्याडित केले जाते.