डोंबाऱ्याचा खेळ

Started by atulmbhosale, September 09, 2012, 02:48:24 AM

Previous topic - Next topic

atulmbhosale

        गावागावात पूर्वी जत्रा,  उत्सवात डोंबाऱ्यांचे खेळ हमखास  चालायचे. आता मनोरंजनाची साधनं वाढल्यामुळे या खेळांचं प्रमाण लक्षणीय कमी झालं आहे. आता हे खेळ क्वचितच पहायला मिळतात. पण त्या जातीचे लोक अजूनही आपला खेळ संधी मिळेल तिथे पोटासाठी करत असतातच .          
असाच एका गावात त्यांचा खेळ बघितला. उपस्थित जनसमुदायातील कांहीजन त्यांच्या खेळाकडे एक कला म्हणून न बघता  एका  वेगळ्याच दृष्टीकोनातून  बघत  असल्याचे जाणवले .मनाला खटकले  सुद्धा.माणसाच्या हाती कितीही पैसा आला तरी त्यानं आपली मर्यादा कधीही ओलांडली नाही पाहिजे याची हि जाणीव मला तेथे झाली .  तिथल्या एकंदरीत प्रसंगाचं  वर्णन  मी माझ्या कवितेत केलं आहे. ...
  डोंबाऱ्याचा खेळ
ती दोरीवरती सावरताना तोल
तो ढमढम बडवीत होता खाली ढोल
ते पोर तयांचे हाती खळ खळ नाणी
ती खळखळ नाणी ? कि   नयनातील पाणी ?

ती लवते जणू का लवचिक रबरी कुडी
कुणी बघतो खुशाल किंचित छाती उघडी
अन म्हणतो 'व्वा रे '!  पाहून उघडी पाठ
डोंबारी असून किती छानसा घाट

तो ढमढम बडवीत होता वेगे  ढोल
मग पोर तयांची गिरक्या घेते गोल
कुणी चपळ विजेचे दृश्य पाहुनी -गातो -
'तुझा झगा झगा गं वारयावरती उडतो '

ते पोर तयांचे मागत फिरते  नाणी
पांगली बघ्यांची गर्दी परक्यावानी
ढम ढमा वाजुनी शांत जाहला ढोल
अन दिशा गरागर त्यांच्या  भवती गोल

हा खेळ करुनी अखेर इथल्या गावी
चालले रिकामे खिन्न उपाशी पायी
'ती' मनात चिंती कसे मिळावे पोटा
कुणी म्हणे -''आजची रात थांब! -घे नोटा ''

त्या दोघानाही कळे काय ते ठीक
ती म्हणली, " भाऊ, नको आम्हाला भिक
डोंबारी असलो जरी उपाशी आज
कधी पोटासाठी सोडेन मी ना लाज "

डोळ्यातील आसू भिजवीत होते भाळ
हरवला कुठे तो जुना पुराना काळ?
हा डोंबाऱ्याचा कि दैवाचा खेळ ?
अन कशी नशिबी चालून येते वेळ ?
                     अतुल भोसले

केदार मेहेंदळे


atulmbhosale