माझिया ग अंगणात
आली इवली पाहुणी
खुदू खुदू हसते ग
छोटे माझे बाळ गुणी
माझिया ग अंगणात
येते एक चिऊताई
बाळाच्या इवल्या ओठांत
घास इवलासा देई
माझिया ग अंगणात
बाळ दुडूदुडू धावे
वाटे तिच्या सोबतीने
गावी स्वप्नांच्या जावे
माझिया ग अंगणात
हळू पाळणा हालतो
नभी ढगांच्या आडून
चंद्र बाळाशी खेळतो