Author Topic: || श्रीकृष्णाचा नामकरण सोहळा : दोलोत्सव ||  (Read 668 times)

Offline madhura

  • Jr. Member
  • **
  • Posts: 271
  • Gender: Female
  • I am Simple

माझी ही काव्यरचना पुणे आकाशवाणी केंद्रावरून प्रसारित झाली आहे. माझ्या काव्यसंग्रहामध्ये समाविष्ट आहे.
{चाल : राम जन्मला गं सखे राम जन्मला }


श्रावण मांसी, कृष्ण पक्षी, तिथि अष्टमी,
शुभवार्ता सांगताना, होय दंग मी,
सकल वृंद, घ्या आनंद, दिव्य क्षणाचा,
दोलोत्सव पाहू चला, कृष्णदेवाचा || ध्रु ||

विष्णुदेव घे प्रवेश, देवकी उदरा,
आठवा अवतार म्हणुनी, जन्मे या धरा,
विष्णुमय होई विश्व, योग मायेचा .......|| १ ||

नंद यशोदा उभय, हर्षले मनी,
विश्वाच्या चालकाचे, जाहले धनी,
भास्कर हा भासे कुणा, चंद्र नभीचा.. ..|| २ ||

सावळा हा येई गृहा, आज गोकुळा,
दैवाने दैवयोग, लाभला कुळा,
राम हाचि, हाचि कृष्ण, कुंजवनीचा ... || ३ ||

नंद मंदिरास केली, भव्य आरास,
मनमोहक चांदवे ते, शोभे छतास,
मोतियांच्या झालरिला, रंग सोन्याचा .. || ४ ||

"भाळी ह्याच्या पुण्य राशी, बहुत अमित,
विश्ववंद्य होईल हा", ऐसे भाकित,
गर्गमुनिंची ही वाणी, मंगल वाचा.... || ५ ||

यशोदेच्या मांङीवरी, सावळा हरी,
पीतवस्त्र ओढ़णी ती, ल्याली त्यावरी,
रुमझुम तो नाद होई, पैंजणांचा .... || ६ ||

रोहिणी, गवळणी आल्या, नंदसदनी,
निज नेत्री पाहती तो, चंद्रवदनी,
वर्षावही त्या करिती, बाळलेण्यांचा..|| ७ ||

नंदराजा, गोपप्रजा, प्रेमे पुजती,
यशोदेला गवळणीही, वाणं अर्पिती,
नंदानेही आरंभिला, यज्ञ दानाचा ... || ८ ||

नजर न लागो, कधीही, ह्यास कुणाची,
होईल बहु चर्चा जरी, दैवी गुणाची,
हा अनंत भाग्यवंत, स्वर्ग लोकिचा..|| ९ ||

धन्य वसुदेव आणि धन्य देवकी,
उदरी ज्यांच्या जन्मला हा, वासुदेव की,
शुभघडीला, हो आरंभ, कृष्णयुगाचा.. || १० ||

नंद यशोदेच्या घरी, बाळ सुखावे,
देवकी वसुदेव तया, का हो मुकावे ?
संचित हे का हो असे, दोष कुणाचा..|| ११ ||

मंगल वाद्ये मधुर, मंदिरी वाजे,
रत्नजडित पाळण्यात, बाळ विराजे,
"कृष्ण कृष्ण" जल्लोष, होई नामाचा. || १२ ||

दोलोत्सव पाहिला हो, कृष्ण देवाचा. ssss

© गीतकार : उपेंद्र चिंचोरे
Email. chinchoreupendra@yahoo.com