"पत्रव्यवहाराने प्रेम करणे, हा प्रेमाचा आदर्श प्रकार आहे...! याचे प्रत्यंतर देणारी कादंबरी म्हणजे लेखक वामन देशपांडे यांनी लिहिलेली *सखी* हि एक आदर्श कादंबरी आहे....! ज्याचे कवितेवर प्रेम आहे त्यांच्यासाठी हि कादंबरी म्हणजे काव्याझुल्यावर झुलल्याचा आनंद लुटल्या सारखे आहे.
एक 'तो ' आणि एक 'ती ' दोघांचेही कवितेवर प्रेम ... 'तो ' लेखक तर 'ती' एक काव्य रसिक. "कविता" या एकाच समान धाग्यामुळे एकमेकांना प्रत्यक्ष न भेटलेली पण पत्रमैत्रीने झालेली ओळख त्या दोघांमध्ये त्यांच्याही नकळत काव्यमय नाते विणत गेली . या वीणेत एक एक वीण आतुर, व्याकुळ, भावविव्हल धाग्यांनी गुंफली होती ... त्यांची हि वीण इतकी घट्ट होती कि , एकमेकांच्या संवेदना त्यांना पत्रातील अक्षरांमधून हृदयाला भेदून जात होत्या ...!
दोघांचेही जीवन दुख:रुपी एकाच नावेत प्रवास करीत होते. सखीचे आयुष्य वसंत ऋतूच्या आगमनालाच शिशिर ऋतूची दृष्ट लागावी तसे फुल फुलल्या नंतरचे सुख तिला मिळालेच नाही.... तिचा सुगंध दरवळण्यापुर्वीच पाकळ्यांच्या कुपीत नियतीने तो बंद केला ...!
'त्याचे' आयुष्य दिशा हरवलेल्या तारुसारखे एकटेच भरकटत होते. अगदी पहिला सुरातला संसार असूनही त्याच्या सुरांमध्ये न गाणारा ..... शेवटी तोच त्यांच्यात बेसूर ठरला.. आणि वेगळा, अगदी एकटा ... एकटा पडला......!!
या अश्या काळात 'ती' व 'तो' यांची ओळख झाली .... हि नुसती अक्षर ओळख त्यांनी एकमेकांना लिहिलेल्या प्रत्येक पत्रातून अशी झिरपत झिरपत त्यांच्याही नकळत त्यांच्या अंत:करणात प्रेम होऊन व्यापून राहिली .....! प्रत्येक पत्रात त्यांनी आपल्या निशब्द भावनांचे वर्णन कधी कवी ग्रेस, पाडगांवकर , बोरकर, बालकवी , कवी महानोर,संगीता जोशी, नीता भिसे , मराठी गझलचे महामेरू कवी सुरेश भट यांच्या विविध भावनांनी ओथांबलेल्या काव्यानि केले आहे. आणि अशी काव्यात्मक कादंबरी वाचण्याचा आनंद आपल्याला अनुभवाच्या एका विशिष्ट उंचीवर नेउन ठेवतो.उदा:
जेंव्हा त्याचे दुख: तिला कळते ... त्याच्या दुख:ने ती खचून जाते .. त्याच्या दुख:त साथ देण्यासाठीच आश्वासन व्यक्त करते ते कवी ग्रेस यांच्या कवितेतून ....
" रात्र थांबवूनी असेच उठावे
तुझ्या पाशी यावे क्षणांसाठी
डोळीयांच्या व्हाव्या वेड्या गाठीभेठी
आणि दिठी दिठी शब्द यावे .....
तुही थेंब थेंब शब्दासाठी द्यावा
अर्थ ओला व्हावा माझ्यासाठी
आणि उजाडता पाठीवर ओझे
वाटे पाशी डोळे तुझे यावे.....!
किंवा याच संदर्भात नीता भिसे यांची गझल
" तुझ्या घराला तोरण, माझे बांधले दिवस
तुझ्या दाराशीच सारे , माझे थांबले दिवस
एक एक गोळा केला तुझ्याबरोबर क्षण
नको समजूस मनी तुझे सांडले दिवस
आता बोलणेही नाही आता भेटणेही नाही
खंत करण्यासाठीही कुठे राहिले दिवस ....?
काय घडून जे गेले , तुझ्या ध्यानी मनी नाही
मला कळण्यासाठीही किती लागले दिवस .....
पाने वाळली जातात, खोड वठली जातात
हिरवेगार राहतात कसे आतले दिवस .....!
अश्या अनेक कविता कादंबरीभर प्राजक्ताचा सडा पडावा तश्या उधळल्या आहेत.....!
'ती' आणि 'तो' सुद्धा या काव्यमय झुल्यावर झुलत स्वप्नांचे , कल्पनांचे इमले बांधत त्यावर त्यांना मिळालेल्या आनंदाची तोरणे बांधत नव्या जीवनाला ते नव्या दिशेने नेत होते ....! त्याच्या प्रेमकहाणीत सखीने रंग भरले .... त्याच्याच रंगात रंगून आपल्यापुढे तिने सुंदर रांगोळी काढली .. त्या रांगोळीत त्याचेच रंग भरून त्याची वाट पाहत राहिली...!
दोघेही भेटण्यासाठी आतुर व्याकुळ होते... पण तरीही ती आणि तो शेवटपर्यंत एकमेकांना प्रत्यक्ष भेटलेच नाहीत... ती तशीच आपल्या उंबरठ्यापाशी त्याची वाट पाहत ... त्याच्या दु:खात दु:खाप्रमाणे साथ देण्याचे आश्वासन देत आपल्या मांडीवर त्याचे डोके ठेवून त्याला जोजावन्याचेही तिने सांगितले पण ....... तो नाही आला .....!
'तोही व्याकुळ आणि असहाय्य होता ....! ह्या पूर्ण कादंबरीचे वाचन करतांना आपण त्यात इतके गुंतले जातो कि ,'ती' व 'तो' आपण आपल्यातच जगायला लागतो ...!त्यांचे उत्कट प्रेम आपले मन व्यापून जाते...! ह्या कादंबरीचे शेवटचे विवेचन वाचतांना हृदयात एक कळ उठते ..... त्यांचे प्राक्तन त्यांना एकमेकांना अखेरपर्यंत नाही भेटू देत...! दोन प्रेमिजीवांमधील शत्रू त्यांचे प्राक्तन... नियती ठरते...!
कादंबरीचा शेवट .... "त्याच्या शेवटच्या पत्रातल्या दोन ओळीतून सुटलेल्या जागेत त्याची अखेरची व्याकूळता , असहायता दिसत होती...! ह्या पत्रात त्याची खाली सही नव्हती ... तर अश्रूत विरघळेलेले अक्षरांचे पुंजके .....!
त्या पुंजक्यांचा अर्थ लावला ... तर तो अत्यंत वेदनामय असा होता...! पत्रात सोडलेल्या दोन ओळीतील जागेत त्याची व्याकुळता,विरहवेदना , दु:ख दिसत होते...! ज्या रात्री पत्र लिहिले रात्री नदीत दिवे सोडावेत तसे त्याने स्वत:ला झोकून दिले होते ...! त्या दिव्याबरोबर वाहत वाहत तो पलीकडच्या तीरावर गेला जिथे गोकुळातील त्याची सखी (मनु ) राधा त्याची वाट पाहत होती.... आणि वैकुंठातल्या घंटा त्याला ऐकू येत होत्या...! "तिला तिचे प्राक्तन कळले होते ....."राहिले ....दूर...घर....सख्याचे....!
ही काव्यमय कादंबरी प्रत्यक्ष वाचणे हा एक अत्यंत सुंदर अनुभव ठरावा...! कधीही न कोमेजणारी..... प्रत्येकाला आपले मन हिरवेगार ठेवणारी भावना म्हणजे "प्रेम" याचा अनुभव देणारी हि कादंबरी आहे ...! आयुष्याच्या वैशाख वणव्यातही वसंत ऋतूचा आनंद देणारी अशी हि कादंबरी आहे...!
माझ्या सहवाचन कट्ट्या वरील सर्व मित्र मैत्रीणीनी हि कादंबरी जरूर जरूर वाचावी आणि काव्यमय झुल्याचा प्रत्यक्ष अनुभव घ्यावा ..... आणि आपला स्वत:चा वेगळया अनुभवाचा अन्वयार्थ लावावा ......!!!!!
कादंबरीचे नाव: *सखी*
लेखक : वामन देशपांडे
प्रकाशिका : सौ. सुरेखा करंदीकर
प्रथम आवृत्ती : ३० ओगस्ट , १९९३.
by "SAMIDHA"