१९६० च्या सुमारास दलित साहित्याचा उगम झाला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रेरणेतून दलित साहित्याचा व चळवळीचा भक्कम पाया रोवला गेला. अण्णाभाऊ साठे, शंकरराव खरात, बाबुराव बागुल, नारायण सुर्वे साहित्यिकांनी दलित साहित्यात मोलाची भर घातली. स्वातंत्र्य समता व बंधुता हे मुख्य उद्दीष्ट मानून दलित साहित्याची वाटचाल सुरू झाली. याच वाटचालीतील एक महत्त्वपूर्ण कलाकृती म्हणजे रणजित देसाईंची 'समिधा' होय.
'अस्पृश्यता'हा हिंदू धर्माला लागलेला कलंक. त्यामुळे दलितांवर नेहमीच अपमानीत जीवन जगण्याची वेळ आली. शहरापेक्षा ग्रामीण भागातील दलितांना अधिक अडचणींना तोंड द्यावे लागले. परंपरागत अन्याय - अत्याचाराला विरोध करणार्या दलितांना कोणत्या प्रकारच्या संकटांना सामोरे जावे लागते याचे प्रभावी चित्रण समिधामध्ये आढळते.
देवा महार, त्याचा मुलगा तुका व मुलगी मुक्ता या कथेतील प्रमुख व्यक्तीरेखा. देवा गरीब, लाचार, सहनशील, भित्रा, कर्तव्यदक्ष आणि हळूवार स्वभावाचा आहे. तर तुका अन्यायाची चीड असणारा, लढाऊ वृत्तीचा निर्भय तरूण आहे. आंबेडकरांवर त्याची असीम श्र्द्धा आहे. मुक्ता ही कष्टाळू, सोशीक व जिद्दी आहे व मनानं खंबीर आहे. या तिघांच्या जीवनकहाणीतून जागृत दलित समाजाचे हक्क आणि माणुसकीसाठी सुरू असलेला लढा पराभूत झालेला दाखवला असला तरी या पराभवातही उद्याच्या भविष्याची स्वप्ने दडलेली आहेत याची जाणीव ही कादंबरी वाचून होते.