सांज होताच माझ्या मागे पळतात प्रश्न
उत्तरांना जसं पिळलं, तसें गळतात प्रश्न
पावलं सरळ चालली, तरी मन चुकतचं
तुझ्या घराच्या वळणावर, वळतात प्रश्न
माझे भरलेले डोळे, तुलाच दिसत नाहीत
"कसा आहेस" विचारल्यावर, चिघळतात प्रश्न
ह्या नात्याचा एकदाचा, सोक्ष-मोक्ष लावावा,
पण तू समोर येताच, सारे अडखळतात प्रश्न
तू जिवनात नाहीस, हे फारच छान आहे
वास्तवाच्या सरणावर, स्वप्नाचे जळतात प्रश्न
मुखवटा उतरवून जेव्हां जेव्हा,ं ठेवतो बाजूस
या भामट्या दूनियेचे, हमखास टळतात प्रश्न
प्रश्नांच्या गर्भातून जरी, जन्म घेतात प्रश्न नवे
निर्माण झालेल्या प्रश्नचिन्हेतून, का कळतात प्रश्न
@ सनिल पांगे