आयुष्याच्या मध्यान्ही!
आयुष्याच्या मध्यान्ही,एकदा मागं वळायला हवं!
कोण आहे किती पाण्यात,आता मात्र कळायला हवं!
बालपण तरूणपण,उधळलेले बेभान क्षण!
आणाभाका खोट्या शपथा,मोडलेलं कुणाचं मन!
हिशोबाचं बाड आता, चाळायला हवं!
एकदा मागं वळायला हवं! जोडलेली मनं,तोडलेली नाती,
मनातली भीती,कटवलेली खाती!
सभ्यतेचं झापड आता,ढळायला हवं!
एकदा मागं वळायला हवं! आयुष्याची वणवण,पॆशांची चणचण,
खोटं खोटं वागणं,मुर्दाडाचं जगणं!
भविष्यातलं चुकणं आता,टाळायला हवं!
एकदा मागं वळायला हवं! भोगलेलं जगणं,सोसलेलं दुखणं,
दाबलेलं रडणं,भंगलेलं स्वप्न!
डोळ्यातलं पाणी आता,गळायला हवं!
एकदा मागं वळायला हवं!
आयुष्याच्या मध्यान्ही,एकदा मागं वळायला हवं!
कोण आहे किती पाण्यात,आता मात्र कळायला हवं!
प्रल्हाद दुधाळ.
......काही असे काही तसे!