धुक्यात विरले मी
भासात शोधले मी
पापणीत लपले मी
आसवात न्हाले मी
माझी न राहिले मी
म्रुतप्राय भासले मी
कात टाकली मी
ज्योत फुंकिली मी
अंधार प्यायले मी
वार्यात हरवले मी
अश्रुत भिजले मी
शब्दात साठले मी
रुप तुझेच मी
साज तुझाच मी
गाज तुझाच मी
श्वास तुझाच मी
आभास तुझाच मी
तुझीच जाहले मी
नुरले कुणीच मी
कल्पी जोशी १२/०६/२००९
...........................................
साथ तुझी हवी मला
साथ तुझी हवी मला
शाळेत प्रथम जाताना
अ आ लिहिताना
आई आई बोलताना
साथ तुझी हवी मला
जग डोळ्यात भरतांना
नवे स्पर्श घेतांना
स्पर्शात न्हाहुन निघतांना
साथ तुझी हवी मला
हसता हसता रडताना
डोळॆ गच्च मिटताना
फुलपाखरांशी खेळताना
साथ तुझी हवी मला
आईसाठी झुरताना
बाबांचा मार खातांना
तीचे "डोळॆ"बघताना
साथ तुझी हवी मला
पुस्तकात शिरतांना
गणित सोडवताना
आकड्यांशी खेळतांना
साथ तुझी हवी मला
डोंगर दर्या चढतांना
पावसात पळतांना
आसवाशी भांडतांना
साथ तुझी हवी मला
सुखात लोळ्तांना
चित्रात रंग भरतांना
स्वप्नात जगतांना
कल्पी जोशी 05/06/2009
..................................................
ओघळत्या अश्रुंची
किंमत काय मागता
निसटणार्या घासांशी
झटापट काय करता
पापणीच्या काठाशी
कोरड काय शोधता
घरघरणार्या घश्यात
प्राण कसे ओतता
वाळलेल्या झाडाला
हिरवळ कशी मागता
दुर डोंगराआड
सुर्य का न्याहाळता
वाट काट्यांचीच
नेहमी का चालायची
आशा आशा म्हणुन
जगतांना का थकायचे
कल्पी जोशी ०७/०८/२००९
............................................